भारतात रेल्वेचे मोठ्या प्रमाणात जाळे पसरले आहे, जे जगभरात दुसऱ्या क्रमांकाचे मानले जाते. केवळ हे जाळेच निर्माण झाले नाही तर रेल्वे गाड्यांच्या निर्मितीबरोबरच सेवांचाही विस्तार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रेल्वेच्या विकासाला अधिक गती मिळाली, हे मान्यच केले पाहिजे. अर्थात अन्य सरकारांच्या काळात काहीही झाले नाही, असेही म्हणता येणार नाही. काँग्रेस पक्षाचा कार्यकाळ देशातील सत्तेवर सर्वाधिक राहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या काळात अनेक योजना आखण्यात आल्या. त्या कालांतराने पूर्ण होत आहेत. कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर आपल्या कल्पनेनुसार आणि नियोजनानुसार काम करीत असते. २०१४ पासून देशाची सत्तासूत्रे नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारच्या हातात असून विकास पुरुष या उपाधीप्रमाणे सगळ्यांचा विकास होताच आहे. शिवाय आपल्या विकास पुरुष या उपाधीला साजेसे असेच काम पंतप्रधान मोदी करीत आहेत. मुंबई सारख्या महानगरात मोनो रेल आली. त्यापाठोपाठ मेट्रो रेल्वे सुरू झाली. या मेट्रो रेल्वेचा मुंबईत मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुणे आणि नागपूर या शहरात मेट्रो सुरू झाली. पुढे औरंगाबाद, नाशिक शहरात अशी मेट्रो सुरू झाल्यास नवल वाटू नये, असो.
दिवसेंदिवस रेल्वेचा विस्तार आणि विकासही होत आहे, ही एक भारतीयांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. देशभरात जवळपास ७५ ‘वंदे भारत’ सुरू करण्याचे धोरण मोदी सरकारने आखलेले आहे. त्यापैकी जवळपास १५ वंदे भारत गाड्या देशभरात सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रात सध्या मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर आणि मुंबईहून कोकणात ही गाडी सुरू करण्यात येऊन प्रवाशांना चांगली आरामदायी सेवा दिली जात आहे. ‘वंदे भारत’प्रमाणे अशा प्रकरच्या अन्य नावाने गाड्या धावत आहेत, हे भारताच्या दृष्टीने प्रगतीचे पाऊल आहे, असेच म्हटले पाहिजे. अशीच एक गाडी जी परदेशी पर्यटक आणि भारतीय पर्यटकांसाठी सुरू आहे. दरम्यानच्या काळात या नूतनीकरण कामासाठी या गाडीची सेवा खंडित होती.
आता पूर्णपणे नूतनीकरण करण्यात येऊन अत्यंत आधुनिक आणि परदेशी गाड्यांना टक्कर देईल, अशी ‘डेक्कन ओडिशी’ या गाडीची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. अत्याधुनिक आणि पंचतारांकित सोई-सुविधायुक्त अशी आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिशी ट्रेन २.० नव्या रूपात धावण्यास सुरू झाली आहे. डेक्कन ओडिसी २.० या गाडीचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फलाट क्रमांक १८ येथून गुरुवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता विधानसभेचे अध्यक्ष ॲॅड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, भारतीय रेल्वेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाला. मान्यवरांना घेऊन या गाडीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे असा प्रवास केला.
देशातील प्रसिद्ध ४ शाही रेल्वेपैकी एक असणारी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन २.० ही नव्या रूपात पुन्हा पर्यटकांसाठी खुली झाली आहे. या गाडीमध्ये उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा देण्यात येतात. सन २००४ ते २०२० पर्यंत या अालिशान व आरामदायी ट्रेनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मात्र, सध्या डेक्कन ओडिसी ट्रेन अत्याधुनिक सोयी-सुविधांनी पुन्हा पर्यटकांच्या सेवेकरिता सुरू झाली आहे. या नूतनीकरण करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसी सहलींमध्ये महाराष्ट्र व्यतिरिक्त देशातल्या अन्य राज्यामधील पर्यटन स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे. या गाडीमुळे पर्यटनाच्या माध्यमातून रेल्वेला महसूल तर मिळणारच आहे. शिवाय परदेशी पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. देशभरात पर्यटनाची मोठी स्थळे आहेत.
आग्र्याचा ताजमहल, दिल्लीचा कुतुबमिनार आणि लाल किल्ला, नवे संसद भवन आणि दिल्ली राजधानीचे महत्त्व म्हणून सगळ्यांना आकर्षण आहेच. बिहारमधील बौद्धगया, लुंबिनी, सारनाथ, उत्तर प्रदेशातील बनारस, लखनऊ, प्रयागराज, अयोध्या आदी ठिकाणे, उत्तराखंड, औरंगाबादचे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आणि कैलाश लेणे, बिबी का मकबरा, देवगिरीचा किल्ला अशी भारतात कितीतरी ठिकाणे जी पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत. या सर्व पर्यटन स्थळांना डेक्कन ओडिशी या पर्यटक गाडीतून प्रवास करून पर्यटकांना पर्यटनाचा आनंद मिळवता येणार आहे. एकूणच भारतीय रेल्वे परदेशी रेल्वेप्रमाणे अत्याधुनिक स्वरूपात तयार करण्यात येत असून उच्च दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यात येत असल्याने भारतीय रेल्वेचा अधिक विकास होत आहे, यात कोणतीही शंका नाही. रेल्वेच्या विकासाबरोबरच देशाची प्रगती होत आहे, ही मोठीच समाधानाची बाब आहे.