उपविजेत्याला मिळणार १६ कोटी, आयसीसीने जाहीर केली बक्षीसाची रक्कम
आगामी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील विजेत्यांवर बक्षीसाची अक्षरश: बरसात होणार आहे. विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला ३३.१८ कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला १६.५९ कोटी रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. आयसीसीने विजेते, उपविजेते, उपांत्य फेरीतील आणि गट टप्प्यातील सर्व संघांना बक्षीस रक्कम नुकतीच जाहीर केली.
विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघांना प्रत्येकी ६ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. त्याचबरोबर ग्रुप स्टेजपर्यंत पोहचलेल्या संघांना प्रत्येकी ८२ लाख रुपये बक्षीसरुपी दिले जातील.आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल.
भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत एकूण संघ सहभागी होणार आहेत. यजमान भारतासह न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स यांच्यात अंतिम विजेतेपद पटकवण्यासाठी क्रिकेटच्या मैदानातील युद्ध पहायला मिळेल.