नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Pm narendra modi) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन(jo biden) यांना २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. भारतात अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी बुधवारी ही माहिती दिली.
त्यांनी सांगितले की दिल्लीमध्ये जी-२० शिखर परिषदेतील इतर द्विपक्षीय बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.
भारत करणार क्वाड शिखर परिषदेचे यजमानपद
क्वाडमध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. पुढील वर्षी क्वाड शिखर संमेलनात यजमानपद करण्याचा भारताची वेळ आहे. चर्चा अशी आहे की भारत प्रजासत्ताक दिनी सामील होणाऱ्या क्वाड देशांच्या नेत्यांना आमंत्रित करण्याचा विचार करत आहे.
जगभरातील नेत्यांना दिले जाते आमंत्रण
या वर्षी प्रजासत्ताक दिनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सिसी हे प्रमुख पाहुणे होते. दरवर्षी भारत जगभरातील नेत्यांना प्रजासत्ताक दिनी सामील होण्यासाठी आमंत्रित करत असतो. कोरोनाच्या महामारीमुळे २०२१ आणि २०२२मध्ये कोणालाही प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले नव्हते.
हे नेते होते प्रमुख पाहुणे
याआधी २०२०मध्ये ब्राझीलचे तत्कालीन राष्ट्रपती जायर बोल्सोनारो प्रमुख पाहुणे होते. २०१९मध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा तर २०१८मध्ये १० आसियान देशांचे नेते या सोहळ्यासाठी उपस्थित होते. २०१७मध्ये अबूधाबूचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते तर २०१६मध्ये तत्कालीन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी या सोहळ्याची शोभा वाढवली होती.