Tuesday, July 23, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखगंगासागर बेट नष्ट होण्याचा धोका

गंगासागर बेट नष्ट होण्याचा धोका

भास्कर खंडागळे

गंगा नदी अडीच हजार किलोमीटरहून अधिक प्रवाही क्षेत्रातच प्रदूषित झालेली नाही, तर बंगालच्या उपसागरात समुद्राला मिळते, तिथेही तिच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे. हवामानबदलाचा सर्वाधिक फटका बंगालच्या उपसागराला बसत असून त्यामुळे गंगासागर बेट नष्ट होण्याची शक्यता वाढली आहे. हे नेमके का आणि कसे घडत आहे? ते कसे टाळता येईल?

गंगासागर हे कोलकात्यापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सुंदरबन द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे. या बेटाची लोकसंख्या वाढत असली तरी क्षेत्रफळ कमी होत आहे. त्याचा फटका संपूर्ण परिसराला बसला आहे. १९६९ मध्ये गंगासागर बेटाचे क्षेत्रफळ २५५ चौरस किलोमीटर होते. मात्र दहा वर्षांनंतर ते २४६.७९ चौरस किलोमीटर इतके कमी झाले. २००९ मध्ये ते आणखी कमी होऊन २४२.९८ चौरस किलोमीटर इतके झाले. २०१९ मध्ये ते २३०.९८ चौरस किलोमीटरपर्यंत कमी झाले. २०२२ मध्ये त्याचे क्षेत्रफळ आणखी कमी होऊन २२४.३० चौरस किलोमीटर झाले. गेल्या ५२ वर्षांमध्ये गंगासागरची ३१ चौरस किलोमीटर जमीन समुद्रात बुडाली आहे. चेन्नईस्थित ‘नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट’ पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या डेटावरून असे दिसून आले आहे की, पश्चिम बंगालमधील समुद्राची सीमा ५३४.४५ किलोमीटर आहे. सुंदरबनमधील सुमारे १०२ बेटांना धोका निर्माण झाला आहे. घोरमारा बेटावर धूप वाढल्यानंतर लोकसंख्या गंगासागरकडे स्थलांतरित होऊ लागली. तसेच शिकारीअभावी गोसाबा बेटावरील रॉयल बंगाल टायगर्स गावागावात घुसून नरभक्षक बनत आहेत, तेव्हा या बेटावरून पळून जाणाऱ्या लोकांसाठी सागर बेट हे एकमेव आश्रयस्थान आहे. गंगासागर बेट हे सरकार आणि समाजाच्या देखरेखीखाली असल्याने येथे स्थायिक झाल्यास आपले प्राण वाचतील असे लोकांना वाटते. मात्र बेटावर धूप वाढत आहे. १४३७ मध्ये स्थापन झालेले कपिल मुनी मंदिर अनेक दशकांपूर्वी समुद्रात बुडाले होते. त्यानंतर गेल्या शतकात १९७० च्या दशकात समुद्रापासून २० किलोमीटर अंतरावर दुसरे मंदिर बांधले, त्याला जलसमाधी मिळाली. तिथल्या मूर्तीची नवीन मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली होती. पण त्या मंदिराचे समुद्र किनाऱ्यापासूनचे अंतर आता केवळ ३००-३५० मीटर राहिले आहे.

हिमनद्या वितळल्यामुळे तापमान वाढत असून समुद्राची पातळी वाढत असल्याने गंगासागरची जमीन सरकत आहे. येथील पाणीपातळीत दरवर्षी सरासरी २.६ मिलीमीटर वाढ नोंदवण्यात आली आहे. पर्यावरण-केंद्रित आंतरराष्ट्रीय संशोधनपर वाहिलेल्या ‘जर्नल स्प्रिंगर नेचर’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, सागर बेटाच्या दक्षिणेकडील सिबपूर-धबलत, बंकिमनगर-सुमतीनगर आणि बेगुआखली-महिष्मारी या दक्षिणेकडील भागात आणि संपूर्ण बेटाच्या १५.३३ टक्के लोकसंख्येला उच्च श्रेणीचा धोका आहे आणि त्यांना मातीची तीव्र धूप आणि हवामान बदलांचा सामना करावा लागत आहे.

गंगासागराच्या आजूबाजूची बेडफोर्ड, लोहाचारा, खासीमारा आणि सुपारीवांगा ही चार बेटे गेल्या काही दशकांमध्ये किनारपट्टीच्या धूपामुळे नाहीशी झाली आहेत. सागर बेटातील बिशालक्कीपूर भाग पाण्याखाली गेला असून अति धूप झाल्याने सागर भागही राहण्यायोग्य राहिलेला नाही. घोरामारा बेटही लवकरच पाण्याखाली जाणार आहे. गंगासागरावर चक्रीवादळ वाढण्याचा धोका आहे. समुद्राच्या तापमानात ०.१ अंश वाढ म्हणजे चक्रीवादळांना अतिरिक्त ऊर्जा मिळते. येत्या काही दिवसांमध्ये चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता वाढणार आहे. आयआयटी मद्रासच्या एका गटाने सरकारला सुचवले होते, की गंगासागरभोवती सिमेंटचा बांध बांधला जावा. त्यामुळे तीन-चार दशकांपर्यंत जमिनीची धूप रोखता येईल. मात्र सरकारने ते मान्य केले नाही.

गंगासागरचा किनारी भाग अतिक्रमणमुक्त करून खारफुटीचा विस्तार करण्याची गरज आहे. समुद्रात जाणाऱ्या गंगा नदीच्या प्रवाहाच्या अतिक्रमणामुळे आणि वाळूमुळे अरुंद मार्ग रुंद करणे, येथील लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे, पॉलिथीन, साबणाचा वापर करणे आवश्यक आहे. धार्मिक विधींमध्ये रासायनिक पदार्थांवर बंदी घालावी आणि कचरा व्यवस्थापन कडक करावे, असे सुचवण्यात आले होते. ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे होणारे हवामानबदल वेळीच रोखले नाही, तर जीवन देणारी गंगा पूर आणून विनाश करेल. जगातील अन्न उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याने उपासमारीची समस्या तीव्र होणार आहे. ब्रिटनच्या एक्सेटर विद्यापीठाच्या संशोधकांनी हा दावा केला आहे. त्यांच्या अहवालानुसार तापमानात दोन अंशांनी वाढ झाल्यास गंगेचा प्रवाह दुप्पट होईल. भारतातील लोकांसाठी जीवनदायी असलेल्या शुद्ध गंगेबाबत उत्तराखंडच्या ‘वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी’ने मोठे संशोधन केले आहे. या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे की, भविष्यात हवामानबदल असाच चालू राहिल्यास गंगा नदीदेखील सरस्वती नदीप्रमाणे नामशेष होईल. याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक तापमानवाढीमुळे गंगोत्री हिमनदी वेगाने वितळू लागली आहे. गंगा नदी भारताची जीवनरेखा आहे. येथील प्रत्येक नागरिक मोठ्या अभिमानाने सांगतो की गंगा नदी भगीरथाने शेकडो वर्षांच्या तपश्चर्येनंतर आपल्या पूर्वजांना मुक्त करण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर आणली होती.

गंगा नदी देशाच्या जलसंपत्तीचे प्रतीक मानले जाते. जीवनरेखा असलेल्या त्याच गंगेचा जीव धोक्यात आला आहे. गंगोत्री हिमनदी वितळण्याचा वेग वाढत आहे. गंगोत्री हे गंगा नदीचे उगमस्थान आहे. गेल्या ८७ वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमनग घसरले आहेत. ते चिंताजनक आहे. १९३५ ते २०२२ पर्यंत गंगोत्री हिमनदीच्या तोंडाचा भाग सुमारे अडीच किलोमीटरपर्यंत वितळला आहे. अतिवृष्टीमुळे केवळ डझनभर हिमनद्यांचा अभ्यास केला जात आहे. उत्तराखंडमधील गंगोत्री ग्लेशियर ही हिमालयातील सर्वात मोठी हिमनदी आहे. त्याची लांबी सुमारे ३० किलोमीटर, रुंदी ०.५ ते २.५ किलोमीटर आणि क्षेत्रफळ सुमारे १४३ चौरस किलोमीटर आहे. ३,९५० मीटर उंचीवर गायमुखच्या मुखाशी उगम पावणाऱ्या या हिमनदीतील वितळलेले पाणी हा भगीरथी नदीचा प्रमुख स्त्रोत आहे. ही नदी देवप्रयाग येथे अलकनंदा नदीत जाऊन गंगा बनते. हिमालयात ९,५७५ हिमनद्या आहेत. त्यापैकी ९६८ एकट्या उत्तराखंडमध्ये आहेत. सध्या शास्त्रज्ञ आणि संशोधक राज्यातील गंगोत्री, चोराबारी, दुनागिरी, डोकरीयानी आणि पिंडारी आदी दोन डझनहून कमी हिमनद्यांचे निरीक्षण करत आहेत. हवामानातील बदल आणि काळा कार्बन हे घटक हिमनदी वितळण्यास कारणीभूत ठरतात. हिमालय सध्या दोन प्रकारच्या प्रदूषणामुळे प्रभावित आहे. त्यात बायोमास प्रदूषण, म्हणजे कार्बन डाय ऑक्साईड आणि घटक प्रदूषण, म्हणजेच घटक-आधारित प्रदूषण मुख्य आहेत. ‘ग्लोबल वार्मिंग’मुळे होणारे हवामानबदल या प्रकारच्या प्रदूषकांना गती देतात आणि दोन्हीमुळे काळ्या कार्बनची निर्मिती होते. त्यामुळे हिमनदीच्या जीवनाला धोका निर्माण होतो.

प्रामुख्याने हिमालयात जमा होणारा काळा कार्बन आणि तापमानात सतत होणारी वाढ यामुळे हिमनद्या वेगाने वितळत आहेत. तीन वर्षांपूर्वी ‘सायन्स ॲडव्हान्सेस’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात म्हटले आहे की भारतासह संपूर्ण हिमालयीन प्रदेशात वाढत्या तापमानामुळे दरवर्षी सरासरी ०.२५ मीटर हिमनद्या वितळत आहेत, तर २००० पासून दरवर्षी अर्धा मीटर हिमनद्या वितळत आहेत. २००० पासून १९७५ ते २००० दरम्यान वितळलेल्या बर्फाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. या अभ्यासात भारत, चीन, नेपाळ आणि भूतान या हिमालयीन प्रदेशातील ४० वर्षांच्या उपग्रह प्रतिमांचे विश्लेषण करण्यात आले. यासाठी संशोधकांनी सुमारे ६५० हिमनगांच्या उपग्रह प्रतिमांचे पुनरावलोकन केले. हिमनद्या वितळण्याचे कारण म्हणजे हिमवर्षाव आणि तापमानात झालेली वाढ. या सर्व कारणांसाठी आपण सर्वजण कुठे तरी दोषी आहोत, कारण कार्बन फुटप्रिंट वाढत जाते तसतशी तापमानवाढ होते. त्यामुळे हवामानबदल होतो. हिमनदी सध्याच्या वेगाने वितळत राहिल्यास गंगोत्री हिमनदी सुमारे दीड हजार वर्षांमध्ये पूर्णपणे वितळू शकते. यामुळे ओढ्याखाली येणारी शेते आणि कोठारे नष्ट होतील. हवामानबदलामुळे जगभरात काही ठिकाणी दुष्काळ आणि पुरामुळे तीव्र अन्नटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अन्नसुरक्षा धोक्यात येत असताना जगाच्या विविध भागांमध्ये हवामानबदलाचे वेगवेगळे परिणाम होतील. काही ठिकाणी प्रचंड पूर येईल, तर काही ठिकाणी भीषण दुष्काळ पडेल. अनियमित हवामानामुळे स्वच्छ पाण्याची उपलब्धता हे आताच्या तुलनेत मोठे आव्हान बनणार आहे. त्यामुळे मोठ्या लोकसंख्येसाठी पुरेसे पौष्टिक अन्न पिकवणे कठीण होईल.

सध्या जगातील अंदाजे आठ कोटी लोकांना नियमित अन्न मिळत नाही. येथे ग्लोबल वॉर्मिंग दोन अंशांनी वाढले तर गंगा नदीचा प्रवाह दुप्पट होईल. पॅरिस हवामान करारानुसार ग्लोबल वॉर्मिंग १.५ अंशापर्यंत थांबवता आल्यास परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात राहील; परंतु या शतकाच्या अखेरीस तापमानातली वाढ दोन अंशांपर्यंत पोहोचल्यास सुमारे ७६ टक्के विकसनशील देशांना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -