
खानिवली ग्रामपंचायतीतर्फे पर्यावरणपूरक गणपती विसर्जन
खानिवली ग्रामपंचायतीने पर्यावरणपूरक कृत्रिम तलावामध्ये गणपती विसर्जन करून तालुक्याला वेगळा संदेश दिला आहे. बुधवारी(दि. २० सप्टेंबर) ग्रामपंचायत खानिवली येथे माझी वसुंधरा ४.० अभियानांतर्गत सण-उत्सवाच्या वेळी होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक कृत्रिम तलावांची निर्मिती केली.
यावेळी गावातील गणेशभक्तांना आवाहन करण्यात आले होते की, आपला गणपती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करावा, ग्रामपंचायतीच्या या आवाहनाला गावकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच गणपतीच्या मूर्तीसोबत जे निर्माल्य आणले जाते ते नदीमध्ये टाकल्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते, त्यामुळे ते निर्माल्य संकलित करण्यासाठी गणेश घाटावर ड्रम ठेवले होते. सर्व निर्माल्य ड्रममध्ये संकलित केल्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण रोखले गेले. मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे ते खानिवली ग्रामपंचायतीने करून दाखविले आहे, त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच भरत हजारे यांनी दिली.
ग्रामपंचायतीने पर्यावरणाला घातक असलेली परंपरा बदलण्याच्या दृष्टीने आज पहिले पाऊल टाकले आहे, त्यामुळे या उपक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानत इतर सर्व ग्रामपंचायतींनी ही संकल्पना राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विसर्जित केलेल्या मूर्तींचे विघटन करून तयार झालेल्या लगद्याचे शाळेतील मुलांना वाटप करून त्याच्यापासून अनेक प्रकारच्या कलाकृती करून घेतल्या जाणार आहेत. तसेच जे निर्माल्य गोळा केले आहे त्याच्यापासून खत तयार केले जाणार आहे. अशा प्रकारचा एक पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करणारी खानिवली ग्रामपंचायत ही तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत असल्यामुळे सर्व प्रशासकीय स्तरावरून या ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.
संपूर्ण गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ती पर्यावरण दुतांनी. गावातील कॉलेजला जाणारी मुलांची पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. या दूतांची अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये ग्रामपंचायतीला मदत होत आहे. मिरवणुकीमध्ये ट्रॅफिकचे नियोजन करणे, विसर्जनस्थळी निर्माल्य गोळा करून ते ड्रममध्ये टाकणे, गणपती विसर्जन करण्यासाठी मदत करणे हे सर्व काम पर्यावरण दूत अगदी कळकळीने निभावितांना दिसून आले. ग्रामपंचायतीचे हेल्पिंग हॅन्ड म्हणून आज या पर्यावरण दूतांकडे बघितले जात आहे.