‘३ का ड्रीम’ या गाण्याद्वारे व्हीडिओ केला शेअर
आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या नव्या जर्सीचे अनावरण बुधवारी करण्यात आले. टीम इंडियाचा किट प्रायोजक आदिदासने ‘३ का ड्रीम’ या गाण्याद्वारे व्हीडिओ शेअर करत जर्सी लाँच केली. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली, उपकर्णधार हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराजसह इतर खेळाडू दिसत आहेत.
आदिदासने वर्ल्डकपच्या या जर्सीमध्ये काही बदल केले आहेत. टीम इंडियाच्या सध्याच्या जर्सीत खांद्यावर तीन पांढऱ्या पट्ट्या आहेत. परंतु नव्या जर्सीत त्या जागी तिरंग्याच्या तीन रंगांचा समावेश केला आहे. छातीच्या डाव्या बाजूला बीसीसीआयच्या लोगोवर आता दोन स्टार आहेत, जे भारताच्या एकदिवसीय विश्वचषक विजयाचे प्रतीक आहे. ते दोन स्टार म्हणजे १९८३ आणि २०११चा विश्वचषक विजयाची खूण आहे.
प्रसिद्ध गायक रफ्तार यांनी गायलेल्या ‘३ का ड्रीम’ या गाण्याद्वारे टीम इंडियाच्या या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे. ‘ड्रिम ऑफ ३’ म्हणजेच भारताने १९८३ आणि २०११ मध्ये वर्ल्डकप जिंकला आहे. त्यानंतर यंदा भारताने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकावा अशी चाहत्यांची इच्छा असल्याचे या गाण्यातून सांगण्यात आले आहे.