मुंबई : ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकरच या, अशा जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पांना बुधवारी भक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात निरोप दिला.
गणेश विसर्जन शांततेत व्हावे यासाठी पोलिसांनी तर सुव्यवस्थित व्हावे यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली होती. मुंबईत सुमारे दीड लाख घरगुती गणपती प्रतिष्ठापना झाली असून त्यातील दीड दिवसाच्या ७५ हजार गणपतींचे विसर्जन झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
महापालिकेने प्रतिवर्षाप्रमाणे बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबईत शंभरहून अधिक ठिकाणी विसर्जनाची सोय केली आहे. त्यात ६९ नैसर्गिक स्थळांवर तर ३२ कृत्रिम तलावांचा समावेश आहे. गणेशोत्सवासाठी सुमारे साडेसात हजार अधिकारी व कर्मचारी तैनात केले आहेत.
विसर्जन स्थळांवर जीवरक्षक, रुग्णवाहिका, प्रथमोपचार केंद्र, ध्वनिक्षेपक, मोटरबोट, स्वागत कक्ष, चौकशी व नियंत्रण कक्ष, स्टील प्लेट, तात्पुरती शौचालये, निर्माल्य कलश, निरीक्षण मनोरे, फ्लड लाइट, सर्च लाइट, डंपर, जर्मन तराफे, विद्युत व्यवस्था, मनुष्यबळ, हॅम रेडिओ, अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्थेत दहा टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस दलही सज्ज आहे. सुमारे पाच हजार सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक हालचालीवर सुरक्षा यंत्रणेचा बारीक वॉच राहणार आहे. शिवाय शहरांत वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे.
तसेच सशस्त्र पोलीस, क्युआरटी, एसआरपीएफ, दंगल नियंत्रण प्लाटून, बीडीडीएस, जलद प्रतिसाद पथक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहे. शिवाय पोलिसांच्या मदतीला होमगार्ड, नागरी संरक्षण दलाचे जवान तसेच एनएसएस, आरएसपी, एनसीसीचे स्वयंसेवक तैनात ठेवले आहेत.
तीन हजार वाहतूक पोलीस, ५०० ट्राफिक वॉर्डन वाहतूक व्यवस्था सांभाळणार आहेत. गरज भासल्यास या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातूनदेखील नजर ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.
तर ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रासह ग्रामीण जिल्ह्यातील ४१ हजार दीड दिवसांच्या घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचे विसर्जन बुधवारी सायंकाळी साश्रू नयनांनी करण्यात आले. रायलादेवी, उपवन, आंबेघोसाळे, टिकुजीनिवाडी, बाळकूम, खारेगाव आदी ठिकाणी कृत्रिम तलावांची पालिकेने निर्मिती केली होती. त्याचप्रमाणे तलाव परिसरात ठिकठिकाणी निर्माल्य कलशही उभारण्यात आले होते. तसेच वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, विद्युत व्यवस्था, खाणपान सेवा, ध्वनिक्षेपण यंत्रणा आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात सार्वजनिक आणि खाजगी असे मिळून ४० हजार गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी नऊ हजार दीडशे गणेशमूर्तींचे विसर्जन दीड दिवसांनी करण्यात आले.
कल्याण-डोंबिवली शहरातून सुमारे ११ हजार ९५० दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. कल्याण परिसरात साडेतीन हजार तर डोंबिवली परिसरात आठ हजार ४५० अशा दीड दिवसांच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. ढोलताशांच्या गजरात व गुलाल उधळत बच्चे कंपनीसह थोरामोठ्यांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिस ठाणे हद्दीतील ४५० गणेशमूर्तीचे काटेमानिवली गणेशघाट, तिसगाव तलाव, चिंचपाडा खदाण, नांदिवली तलाव आणि उल्हासनदी या ठिकाणी विसर्जन करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील अडीच हजार तर बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५५० गणेशमूर्तीचे गणेशघाट, मोहने येथील उल्हासनदी, गौरपाडा तलाव, दुर्गाडी गणेशघाट, रेतीबंदर खाडी तर डोंबिवली ग्रामीण परिसरातील तीन हजार ३०० गणेशमूर्तीचे तर विष्णुनगर परिसरातील चार हजार गणेशमूर्तीचे रेतीबंदर खाडी, कोपर गाव, जुनी डोंबिवली खाडीत विसर्जन झाले. गर्दी होऊ नये, कचरा इतरत्र टाकू नये, यासाठी महापालिकेने जय्यत तयारी ठेवली होती.