Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीगणेशचा रणसंग्राम पुन्हा पेटला...

गणेशचा रणसंग्राम पुन्हा पेटला…

 कर्जमुक्त म्हणता, तर मग ७२ कोटी कशाचे मागता ? चेअरमन सुधीर लहारे यांचा प्रहार

गणेश कारखाना कर्जमुक्त झाला आहे, असे माजी अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ म्हणत असतील तर, प्रवरा कारखाना ७२ कोटी रुपये कशाचे मागत आहेत ? असा प्रश्न उपस्थित करत बहात्तर कोटी रुपये द्या नाहीतर गणेशची प्रॉपर्टी अटॅच करून द्या, अशी मागणी त्यांनी साखर आयुक्तांकडे केली असल्याचे सांगत माजी अध्यक्षांना फक्त शिक्क्यांचा अधिकार होता, सह्यांचा नाही. त्यामुळे कदाचित या सगळ्या बाबी त्यांना अवगत नसतील, असा हल्लाबोल गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे यांनी चढवला आहे.

दरम्यान, गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देतांना विद्यमान चेअरमन सुधीर लहारे म्हणाले की, सदाफळ यांनी संचालक मंडळावर केलेले आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत. कोणताही साखर कारखाना वित्तीय संस्थांच्या सहकार्याने चालतो, गणेश चालवायला घेतला तेव्हा सुद्धा प्रवरा कारखान्याने गणेश कारखाना गहाण ठेवून कर्ज काढलेले होते. याची कदाचित माजी अध्यक्षांना कल्पना नसेल. आज शासनाच्या सहकार खात्याच्या यंत्रणेला खोटेनाटे पत्र देऊन गणेश सहकारी साखर कारखान्याला वित्तीय पुरवठा होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण केले जात आहेत. गणेश कारखान्याच्या संचालक मंडळाने मांडलेली भूमिका ही व्यक्तिगत विरोधातून नाही तर, कामगार आणि सभासदांचे प्रपंच फुलावे यासाठी आहे, असेही ते म्हणाले. राहिला प्रश्न ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या सहकार्याचा. त्यांच्याच सहकार्यातून गणेश कारखान्यात परिवर्तन घडले आणि गणेश कारखान्याची पुढची वाटचालही चांगली सुरू आहे. गेल्या दहा वर्षात गणेश सहकारी साखर कारखाना चालवताना ज्या पद्धतीचा कारभार झाला, त्याचे धिंडवडे आम्हाला वेशीवर टांगायला लावू नका.

करार संपल्यानंतर मुकुंदराव सदाफळ यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन संचालक मंडळाच्या ताब्यात कारखाना देण्यात आला होता. त्या संचालक मंडळांने चांगले लक्ष दिले असते, रेकॉर्ड तपासून घेतले असते तर आज ज्या खोट्यानाट्या रकमा गणेश कारखान्याच्या नावे लावून कारखान्याला हडपण्याचा प्रवरेचा जो डाव सुरू आहे, तो झाला नसता. तत्कालीन संचालक मंडळाला आम्ही आवाहन करतो की,आपण दहशत झुगारून गणेश सहकारी साखर कारखान्याच्या चांगल्या भविष्यासाठी पाठीशी उभे राहा. जो भ्रष्ट कारभार गेल्या दहा वर्षात झाला आहे, त्याचा भांडाफोड करण्यासाठी साक्षीदार व्हा, गणेश परिसर आपले हे उपकार आयुष्यभर लक्षात ठेवेल. असेही लहारे म्हणाले.

कामगार आणि शेतकरी हा विधानसभेचाही मतदार आहे. प्रवरा सहकारी साखर कारखाना आणि त्यांच्या नेतृत्वाने हे लक्षात घ्यायला हवे, की गणेश कारखान्याचा सभासद, कामगार, शेतकरी हे विधानसभेचे मतदारसुद्धा आहेत. गणेश परिसरातील शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या अन्नात माती कालवणाचे पाप कोणीही करू नये. अन्यथा येत्या निवडणुकीत आम्ही सर्व हा छळकपट लक्षात ठेवू,असेही सुधीर लहारे यांनी सांगितले.

हा छळ त्यांनाही मान्य नसेल!
‘गणेश सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त झाला आहे, असे सांगणाऱ्यांना कारखान्याचे रेकॉर्ड तरी माहित आहे का? तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाळात गणेश कारखान्याचा तोटा ७० कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. प्रवरा कारखान्याने आता ७२ कोटी रुपयांची मागणी केली आहे. माजी अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. गणेशसोबत प्रवरा सह. साखर कारखान्याने आणि त्यांच्या नेतृत्वाने चालवलेला छळकपट मनातून त्यांनाही मान्य नसेल. निव्वळ नेत्याची बाजू घेण्यापेक्षा दहशत झुगारून गणेश कारखान्याच्या भविष्यासाठी सत्य बोला, हा गणेश परिसर आणि राहाता तालुका आपले उपकार आयुष्यभर लक्षात ठेवेल.’ -सुधीर लहारे, चेअरमन, गणेश सह. साखर कारखाना

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -