Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखज्ञानलालसा वाढो हेच गणरायाकडे मागणे

ज्ञानलालसा वाढो हेच गणरायाकडे मागणे

डॉ. उदय निरगुडकर: ज्येष्ठ अभ्यासक

आजच्या काळात ज्ञानाला प्रेम आणि पैशापेक्षा जास्त महत्त्व आले आहे. पैशांमुळे सुख पायाशी लोळण घेते. पण घराचं भविष्य ज्ञानलालसेमध्ये आहे. ज्ञान जोपासण्यासाठी, प्रगतीचा आलेख सतत उंचावर ठेवण्यासाठी घरातील ज्ञानाचा आलेख उंचावलेला हवा. ज्ञानाची देवता असलेल्या गणरायाचे आगमन होत असताना आपले घर ‘नॉलेज होम’ व्हावे यासाठी जागरूक होणे हीच खरी जागृती आणि या बुद्धिदेवतेची अर्चना.

मागच्या आठवड्यात मोटारीने ठाणे ते कोल्हापूर आणि ठाणे ते औरंगाबाद असा प्रवास केला. प्रवासादरम्यान ठळकपणे जाणवलेली गोष्ट म्हणजे दुतर्फा मोठ्या प्रमाणावर जाहिरातींचे फलक होते. त्यात गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींच्या फलकांची संख्या लक्षणीय होती. अर्थात या रस्त्यावरून प्रवास करणारा वाढता मध्यमवर्ग हे टार्गेट कस्टमर असावेत. पूर्वी डोक्यावरील छप्परासाठी माणसं आयुष्य वेचायची आणि पन्नाशीला कुठे तरी उपनगरात ‘श्रमसाफल्य’ किंवा ‘कृथार्त’ या नावाने डोक्यावर छप्पर यायचे. आज मात्र नव्या पिढीचे चाळीशीच्या आतच सेकंड होम आणि फार्म हाऊस सर्रास दिसू लागले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राहते घर हे निव्वळ राहायची जागा नव्हे, तर प्रदर्शनी वस्तू बनले आहे. मग त्याच्या आकर्षक जाहिराती रस्त्यावरच्या जाहिरात फलकांवर दिसणारच. साध्या कंझ्युमर मार्केटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या क्लृप्त्या आज गृहसंकुलांच्या मार्केटिंगमध्ये सर्रास वापरल्या जात आहेत. शिरवळजवळच्या एका गृहनिर्माण प्रकल्पाची जाहिरात करून आमच्या एका मराठी अभिनेत्या पठ्ठ्याने तिथे दोन बीएचके फ्लॅट घेतला. नवश्रीमंतांचा रेटा हा शहरी अर्थकारणाला असा वाढवतोय आणि नव्या जीवनशैलीची गरज अधोरेखित करतोय. त्यामुळेच आज घरांच्या जाहिराती, त्यातल्या सोयी-सुविधांवर भर दिलेला असतो आणि तेच घर कसे वेगळे आणि हाच प्रोजेक्ट कसा बेस्ट हे ठासून मांडलेले असते. एका ठिकाणी तर चक्क घर घेण्यासाठी लकी ड्रॉ आणि त्यातल्या विजेत्यांना घराबरोबर मालदिवची फ्री ट्रीप अशी आकर्षक ऑफर होती. ‘ऑन द स्पॉट लोन’ आणि ‘स्टॅम्प डयुटी रजिस्ट्रेशन माफ’ या सवलती तर आता विशेष राहिलेल्या नाहीत. थोडक्यात काय, तर गृहनिर्माण ही एक अतिस्पर्धात्मक इंडस्ट्री बनली आहे.

अशी घरे घेणाऱ्या काही ग्राहकांशी बोलायची संधी मिळाली, तेव्हा त्यांच्या तोंडी वन एचके, टूबीएचके, टू अँड हाफ बीएचके, बिल्टअप, सुपर बिल्टअप, गार्डन फेसिंग फ्लॅट असे शब्द सर्रास येत होते. काय शोधताय, असे विचारले असता प्रत्येकजण मनाजोगे घर शोधत होता, असे आढळले. म्हणजे नेमके काय असा प्रश्न विचारता सर्वसाधारणपणे उत्तर ‘राहायची जागा आणि सुखसोयी’ असेच उत्तर मिळाले. तरीदेखील माझा घर म्हणजे नेमके काय? याचा शोध सुरुच राहिला. घर म्हणजे फक्त हॉल, बेडरूम, बाथरूम, किचन, टेरेस, बाल्कनी आणि त्यात खच्चून भरलेल्या वस्तू एवढेच म्हणायचे का? तर कवीमनाच्या मित्रांनी या प्रश्नाचे उत्तर, नातेसंबंध, मायेचे छप्पर, मनामध्ये भिंत नसते, मायेचा ओलावा असतो असे काहीही काव्यात्मक सांगितले. म्हणजे एक तर घराकडे वस्तू किंवा कायदेशीर बाब म्हणून बघतो किंवा काव्यात्मक स्वप्नपूर्ती म्हणून बघतो, अशीच उत्तरे आली. खरे म्हणजे घर ही समजाचे संरक्षण करणारी संस्था. आम्हाला स्थिरावरणारी. पण जीवनातील सारेच संदर्भ बदलत असताना आणि बदलांचा रेटा तीव्र होत असताना सगळे अस्थिर होत चाललेय आणि त्यामुळे घराकडे पाहायचा दृष्टिकोनही बदलत चालला आहे.

उद्योगांमध्ये आणि घरांमध्ये काही गोष्टी समान आहेत. दोन्हीही आजारी पडतात. उद्योगात हे लवकर लक्षात न आल्यास तोटा वाढत जातो. उद्योग आजारी पडतो आणि नामशेष होतो. अशी शेकडो उदाहरणे आहेत. ओगले ग्लास वर्क, साठे बिस्किट्स अँड चॉकलेट्स, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल असे अनेक उद्योग उत्तम स्थितीत, तंदुरुस्त होते आणि काळाच्या ओघात आजारी पडले आणि संपलेदेखील; घराचेही तसेच असते. काल, परवापर्यंत सगळे उत्तम असते. पुढे बघता-बघता गोष्टी बिघडत जातात. एका अपयशातून दुसरे अपयश आणि बघता-बघता घरे आजारी पडतात. उद्योग आजारी पडला, तर आर्थिक ताळेबंदातून ओळखता येतो. घरे आजारी पडली, तर कशी ओळखणार? प्रश्न आर्थिक असतील, तर उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो. त्यासाठी घरातील वस्तू आणि मालमत्ता विकावी लागते. पण घरातल्या माणसांच्या गुणवत्तेला वाव देणारे वातावरण नसणे. घरातील एखाद्याच्या स्वप्नांशी आणि धडपडीशी इतर सदस्यांचा संबंध नसणे, कोण काय करतेय याचा एकमेकाला पत्ता नसणे, कुटुंब म्हणून समाजात काय प्रतिमा असावी याविषयी घरात संभ्रम असणे, परंपस्परांचे संबंध तणाव आणि संशयाचे असणे अशा अनेक बाबी घर आजारी पडते, तेव्हा समोर येतात. असे अंतर्गत कलह घर आजारी पडायला कारणीभूत असतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणणे पैसे आणि भावना या पलीकडे जाऊन ज्ञान या संकल्पनेला घरात प्राधान्य आहे का, घराचे घरपण कशात आहे, उबदारपणाइतकेच ते सुरक्षितही आहे का?असे मुद्दे समोर येतात.

आजच्या काळात प्रेम आणि पैशाइतकेच किंबहुना, त्यापेक्षा अधिक महत्त्व ज्ञानाला आले आहे. आयुष्यातील अनेक वजाबाक्या आणि भागाकाराचे उत्तर ज्ञान हेच आहे. प्रेमामुळे समाधान मिळते, पैशांमुळे सुख पायाशी लोळण घेते. पण घराचं भविष्य घरात जोपासलेल्या ज्ञानलालसेमध्ये आहे. घरातील पैशामुळे कदाचित तुम्ही काय आहात, याची जाणीव तुम्हाला आणि इतरांना होईल. पण तुम्ही काय बनू शकता? हे तुमच्या घरात ज्ञानाची जोपासना कशी होत आहे, यावर अवलंबून असणार आहे. ज्ञानाची निर्मिती होत नसलेल्या घरांना एक वेळ उज्ज्वल भूतकाळ असेल, समृद्ध वर्तमान असेल, पण देदीप्यमान भविष्य निश्चितच असणार नाही. घरे आजारी पडतात यामागे हीच परिस्थिती अर्थात ज्ञानाचा अभाव कारणीभूत असतो.

अफगाण प्रांतामधील गजनीच्या महम्मदाने भारतावर २१ वेळा स्वाऱ्या केल्या. सगळे काही लुटले. हिरे, माणिके, सोने, संपत्ती असे सर्व काही लुटून नेले. या घटनेला काही शतके उलटून गेली. २००० मध्ये एका भारतीय विमानाचे अपहरण करून त्याच अफगाण प्रांतात कंदहारला नेले गेले. मात्र तिथे ओलीस ठेवलेल्या प्रवाशांना शुद्ध बाटलीबंद पाणी त्या देशाला देता आले नाही. कारण सर्वत्र अराजक आणि टोळीयुद्ध… आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. स्वाऱ्या करून संपत्ती लुटता येते; ज्ञान लुटता येत नाही. विद्यापीठे आणि वाचनालये नष्ट करता येतात पण माणसांच्या हाडीमांशी भिनलेली ज्ञानलालसा कशी हिरावून घेणार! संपत्ती लुटणारा, ज्ञानाचा नाश करू पाहणारा अफगाणस्तान आज विनाशाच्या उंबरठ्यावर आहे आणि २१ वेळा लुटल्या गेलेल्या बेचिराख भारताने चंद्रावर आपल्या तंत्रज्ञानाचा आविष्कार घडवला आहे. भारत एका उज्ज्वल भवितव्याच्या उंबरठ्यावर आहे.

अफगाणिस्तानचा हा प्रसंग आणि भारताचे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर सुरक्षित उतरणे हे प्रसंग काय सांगतात? तुमची ज्ञानलालसा किती आहे यावर तुमची प्रगती ठरणार आहे. तुमच्याकडे पैसे, शक्ती आणि सत्ता किती यावर ते अवलंबून नाही. निव्वळ प्रेम आणि पैसे पुरवून पुढच्या पिढीला स्पर्धात्मक बनवता येणार नाही. ज्ञान हे त्यावरचे उत्तर आहे. ‘घर म्हणजे नेमके काय’ या प्रश्नाच्या उत्तरासाठी सुरू असलेला माझा शोध ‘ज्ञान’ या शब्दावर थांबला. ज्ञान जोपासण्यासाठी घरासारखी उत्तम जागा नाही. प्रगतीचा आलेख सतत उंचावर ठेवायचा असेल, तर घरातील ज्ञानाचा आलेख उंचावलेला हवा. पुस्तकाच्या कपाटाविना असलेले घर हे घरच असणार नाही. एकमेकांच्या ज्ञानवृद्धीसाठी आपल्या घरातील चर्चा किती वेळा असतात, अन्य वायफळ गोष्टींसाठी किती वेळा असतात याचा विचार करा. मग तुम्हाला अनेक गोष्टींचा उलगडा होईल.

आज घराघरांत ज्ञानाची देवता असलेल्या गणरायाचे आगमन होत आहे. या बुद्धीच्या देवतेसमोर नतमस्तक होताना आपले घर ‘नॉलेज होम’ व्हावे यासाठी अधिक जागरूक होऊ या. ही खरी जागृती आणि या बुद्धिदेवतेची अर्चना. गणरायाच्या आशीर्वादाने आपली सर्व संकटे दूर होऊन मनोकामना पूर्ण होवोत आणि आपले घर हे ज्ञानगृह बनो हीच प्रार्थना.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -