नांदेड : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळत नसल्याने चिंतेत असलेल्या नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावातल्या एका तरुणाने आत्महत्या केली आहे. सुदर्शन देवराये असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ हिमायतनगर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तर, या बंदला स्थानिक व्यापा-यांनी पाठिंबा देत बाजारपेठ बंद ठेवले आहे.
शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याची त्याने चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
दरम्यान, काही लोकांचा जमाव सध्या पोलीस ठाण्याच्या समोर जमा झाला असून, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सुदर्शन देवराये या तरुणाने अनेक आंदोलनात सहभाग घेतला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याने गावात साखळी उपोषण देखील सुरु केले होते. मात्र, आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने सुदर्शने हताश होऊन आत्महत्या केली. ही घटना समोर आल्यावर परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आज सकाळी हिमायतनगर शहर बंदची हाक देण्यात आली. तर, मोर्चा देखील काढण्यात आला. दरम्यान याचवेळी काही तरुणांनी टायर देखील पेटवून दिला होता. तर काही लोकांचा जमाव सध्या पोलीस ठाण्यात असल्याचे समजते. मात्र, सध्या शहरात पूर्णपणे शांतता असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, कोणीही अफवा पसरवू नयेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. सरकारने एक महिन्याचा वेळ मागून घेतल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र, याचवेळी जरांगे यांनी राज्यात कुठेच उग्र आणि हिंसक आंदोलन करु नये असे आवाहन केले आहे. सोबतच शासकीय मालमत्तेचे नुकसान होईल असे पाऊल उचलू नका, असेही म्हटले आहे.