Saturday, September 21, 2024
Homeताज्या घडामोडीNipah : केरळनंतर कर्नाटक आणि आता महाराष्ट्रात?

Nipah : केरळनंतर कर्नाटक आणि आता महाराष्ट्रात?

मुंबई : केरळमध्ये निपाहच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कर्नाटक राज्य सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. केरळमधील निपाह रुग्णांची वाढती संख्या पाहून कर्नाटक सरकारने एक पत्रक जारी केले आहे. नागरिकांनी केरळमधील निपाह प्रभावित भागांमध्ये गरज नसताना प्रवास करू नये, असा सल्ला दिला आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने केरळच्या सीमा भागातील जिल्ह्यांना म्हणजेच कोडागु, दक्षिण कन्नड, चामराजनगर आणि म्हैसूरमध्ये अलर्ट जारी केला आहे. कर्नाटकमधून केरळमध्ये प्रवेश करणा-या टोल नाक्यांवरील तपासणी वाढवण्यात आली आहे.

केरळमधील कोझिकोड जिल्ह्यामधील निपाह विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शिक्षण संस्था आणि क्लासेसला १६ सप्टेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. मात्र विद्यापीठांच्या माध्यमातून घेण्यात येणा-या परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. निपाह संसर्ग झालेल्यांवर उपचार करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर वापरलं जाणारं ‘मनोक्लोनक अँटीबॉडी’ हे औषध इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माध्यमातून केरळमध्ये पाठवण्यात आलं.

कोझिकोडमध्ये निपाहचा संसर्ग झाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे तर अन्य तिघांच्या चाचण्यांचे नमुने सकारात्मक आढळून आले आहेत. संसर्ग झालेल्या एका ९ वर्षाच्या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार केरळात शासनातर्फे ‘कंटेन्मेंट झोन’ही तयार करण्यात आले असून, जवळपास ७०० नागरिकांची एक यादी तयार करण्यात आली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या या नागरिकांपैकी ७७ जणांवर विशेष लक्ष दिलं जात आहे. या रुग्णांना अतीधोकादायक वर्गात गणलं जात आहे. निपाह विषाणूच्या संसर्गामध्ये ७० टक्के रुग्णांचा मृत्यू होत असल्याची सरासरी आकडेवारी असल्यामुळं सध्या ही चिंता आणखी वाढताना दिसत आहे.

कोझिकोड जिल्ह्यामध्ये २०१८ आणि २०२१ मध्येही निपाह व्हायरसमुळे लोकांचा मृत्यू झाल्याची प्रकरण समोर आली होती. दक्षिण भारतामध्ये निपाह विषाणूच्या संसर्गाचं पहिलं प्रकरण १९ मे २०१८ रोजी समोर आलं होतं. जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर त्याला खूप ताप, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, घसा खवखवणे, अॅटिपिकल न्यूमोनिया यांसारखी लक्षणं दिसतात. परिस्थिती अधिक गंभीर असल्यास, व्यक्ती २४ ते ४८ तासांच्या आत एन्सेफलायटीसची शिकार होऊ शकते आणि कोमात जाऊ शकते. निपाह व्हायरसची लक्षणं ५ ते १४ दिवसात दिसू शकतात. परंतु काही प्रकरणांमध्ये हा काळ ४५ दिवसांपर्यंत वाढू शकतो. इतक्या काळात आपण इतक्या लोकांना भेटती की, किती जणांना संक्रमित केलं आहे हे समजणारही नाही. काही प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीला अजिबात लक्षणं दिसत नाही असंही होऊ शकतं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -