रायगड: गणेशोत्सवासाठी(ganeshostav) चाकरमनी मुंबईहून कोकणच्या दिशेने रवाना होऊ लागले आहेत. दरम्यान, यातच एक दुख:द घटना समोर आली आहे. मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात असलेल्या एसटी बसला अपघात(bus accident) झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर २० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ही एसटी बस मुंबईहून राजापूरच्या दिशेने जात असताना रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसची ट्रकला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर २० प्रवासी जखमी झाले. विनोद पांडुरंग तागडे या व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाला.
या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच या अपघाताप्रकऱणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
१ सप्टेंबरपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी असतानाही या मार्गावर अवजड वाहने कशी नेली जातात यावरून आता सवाल केले जात आहेत.