कोलंबो: मोहम्मद सिराजने घेतलेल्या ६ विकेटच्या जोरावर भारताने श्रीलंकेला आशिया चषकच्या फायनलमध्ये केवळ ५० धावांवर रोखले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र त्यांना तो चांगलाच महागात पडला.
भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजने या सामन्यात अर्धा डझन विकेट घेत श्रीलंकेचे कंबरडेच मोडले. सिराजने ६ विकेट घेतल्या तर हार्दिक पांड्याने ३ विकेट घेतल्या त्यामुळे संपूर्ण श्रीलंकेला केवळ अर्धशतक ठोकता आले. आशिया चषकातील श्रीलंकेची ही सगळ्यात खराब कामगिरी आहे.
आशिया चषक स्पर्धेची फायनल चांगलीच रंगणार असे साऱ्यांनाच वाटत होते. भारत आणि श्रीलंका दोन्ही संघ यासाठी सज्ज झाले होते. मात्र श्रीलंकेचा संघ इतक्या कमी धावसंख्येवर ढेपाळेल हे कोणालाच वाटले नव्हते.
भारताचा मोहम्मद सिराज श्रीलंकेच्या संघासाठी धोकादायक ठरला. त्याने ७ षटके टाकताना तब्बल अर्धा डझन विकेट काढल्या. श्रीलंकेच्या केवळ दोन फलंदाजांना दोन अंकी संख्या उभारता आली. काही फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत.