मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
मराठीच्या लढाईतील एक अग्रणी शिलेदार म्हणजे दत्ता पवार. मराठी शाळा नि महाविद्यालयातील मराठी विभाग जगावेत म्हणून दत्ता पवार यांनी कृतिशील पावले उचलली. सुखासीन विश्वात रमणाऱ्या प्राध्यापकांपेक्षा सरांची जातकुळी वेगळीच.
मुंबईतील लाला लजपतराय महाविद्यालयात प्राध्यापकी करताना मराठी विषयाच्या प्रश्नांशी सर सहज जोडले गेले.मराठी भाषा परिषदेचे काम, वर्तमानपत्रात सातत्यपूर्ण लेखन, शिवाजी राजांवरील संशोधन, चांदण्यातल्या गजाली हा ललितलेखसंग्रह, कोपरखळ्या हा ललितलेख संग्रह असे विविधांगी लेखन सरांनी केले आहे. ‘मराठी भाषा उपेक्षा आणि अपेक्षा’ हा सरांचा निबंधसंग्रह मराठीशी निगडित पैलूंची चर्चा करतो. गिरणी कामगाराच्या कुटुंबात जन्माला आलेल्या दत्ता पवारांना नेहमीच सभोवतालच्या वास्तवाचे स्पष्ट भान आले. पित्याचे छत्र हरवल्याने गरिबीचे चटके अटळच!
गिरगावातील शिरोडकर हायस्कूलमध्ये मराठी माध्यमात शिकलेल्या पवार सरांना कवितेचे वरदान! सरांची कविता त्यांच्या स्वतंत्र शैलीतली आहे.
‘मला ऐकू येतात ते फक्त प्रलाप
मी केलेला आक्रोश मात्र कुणालाच ऐकू येत नाही.
कारण इथे कुणालाच कान नसतात…’
या त्यांच्या शब्दांतून ते संपत चाललेल्या माणूसपणाकडे निर्देश करतात.
माणसाला पाऊस नेहमीच इशारे देत असतो. सर म्हणतात;
‘पाऊस मोठा तालेवार
पीकपाणी देतो फार
माणूस झाला मस्तवाल
पाऊस म्हणाला, खस्ता खाल!’
आणखी एका कवितेत ते म्हणतात,
‘पैसा झाला मोठा
माणूस झाला खोटा
माझे घर झाले एसी
पाऊस गेला परदेशी’
माणसाने निसर्गापासून किती धडा घेतला हा प्रश्नच आहे. सरांच्या कवितेत निसर्ग व माणूस यांचे नाते शोधण्याचा प्रयास आहे.
‘रोज रोज उठताना
मनाचा झाला भुगा
जगता जगता किती झाला
आजवर त्रागा!’
जगताना होत असलेल्या त्रासाचे पैलू सरांच्या कवितेत मुखर झाले आहेत. माणसाच्या मानसिक, सांस्कृतिक, सामाजिक ताणतणावांचे अनुभव सरांच्या कवितेतून साकारतात. या सर्वापलीकडे जाऊन आशेचे हुंकार सरांची कविता जिवंत ठेवते. सरांसारखी माणसे अत्यंत प्रेरणादायी आहेत. जिथे जिथे मराठीशी निगडित उपक्रम असतील, तिथे तिथे सर आवर्जून पोहोचताना सरांना मी पाहिलेले आहे. कळकळीने नव्या कार्यकर्त्यांना बळ देताना पाहिले आहे. कवीमनाचा माणूस संवेदनशील असतो, पण मुख्य म्हणजे तो अनेकांना वाट दाखवणारा ‘दीपस्तंभ’ असतो.