
- ऐकलंत का! : दीपक परब
अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्याने ओपनिंग-डेला बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. ‘जवान’ हा अॅक्शन थ्रिलरपट भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. ‘जवान’ने पहिल्या दिवशी भारतात जवळपास ७५ कोटी रुपयांची आणि जगभरात १२५ कोटी रुपयांची कमाई केली. ‘जवान’ या चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी ८१ कोटींची कमाई केली. मात्र रविवारनंतर चित्रपटाच्या कमाईत घट झाली.
वीक डेजला जवान चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण झाली आहे. ‘जवान’ चित्रपटाची सात दिवसांची एकूण कमाई आता ३६७.५८ कोटींवर पोहोचली आहे. लवकरच हा चित्रपट ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असे चित्र आहे. ‘जवान’ हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा विजय सेतुपती, संजीता भट्टाचार्य, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक आणि आलिया कुरेशी, रिद्धी डोगरा, सुनील ग्रोवर, मुकेश छाबरा, योगी बाबू आणि एजाज खान यांनीही काम केलं आहे. दीपिका पदुकोण आणि संजय दत्त यांचा या चित्रपटात कॅमिओ आहे. ‘जवान’ चित्रपटात शाहरुखचा डबल रोल आहे. या चित्रपटानंतर शाहरुखचा ‘डंकी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ‘जवान’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांप्रमाणेच शाहरुखचा ‘डंकी’ हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.