Thursday, July 25, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलGaneshotsav : गणेशोत्सव

Ganeshotsav : गणेशोत्सव

  • कथा : रमेश तांबे

“बालमित्रांनो, या वर्षीचा गणेशोत्सव आपण जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करूया. गणपती ही विद्येची देवता मग आपण या दहा दिवसांत जास्तीत-जास्त ज्ञान आणि माहिती मिळवून गणपतीची पूजा करूया.” देशपांडे काका सर्व मुलांना सांगत होते.

कॉलनीत नवीनच राहायला आलेले देशपांडे काका सर्व मुलांना सांगत होते, “बालमित्रांनो, यावर्षीचा गणेशोत्सव आपण जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करूया. बघा ना गणपती आला की मंडप बांधा, त्याची सजावट करा, आरत्या म्हणा, स्पर्धा घ्या, सांस्कृतिक कार्यक्रम करा की संपला गणपती उत्सव. मग वाट बघायची वर्षभर तो परत येण्याची. पण या वर्षी आपण जरा वेगळ्या पद्धतीने गणपती उत्सव साजरा केला, तर चालेल ना तुम्हाला.”

“हो, हो काका” सगळी मुलं एका सुरात म्हणाली!

“हे बघा मुलांनो गणपती ही विद्येची देवता मग आपण या दहा दिवसांत जास्तीत जास्त ज्ञान आणि माहिती मिळवून गणपतीची पूजा करूया. मी तुमच्यासाठी काही पुस्तके आणली आहेत. ती तुम्ही घ्या आणि दहा दिवसांत वाचून काढा. शेवटच्या दिवशी तुम्ही काय वाचलं, यावर प्रत्येकाने थोडे बोलायचे. आणि मग जे जे बोलतील त्या सगळ्यांनाच मी बक्षिसे देणार, माझ्यातर्फे ठरलं.” “हो हो आमचंही ठरलं” सगळी मुलं पुन्हा एकदा म्हणाली!

मग मुलांनी आपल्या आवडीची पुस्तके शोधून घेतली आणि मुलं आपापल्या घरी गेली. मंडपात काम करणारी इतर मंडळी लांंबून बघत होती, ऐकत होती. सगळ्यांनाच ही कल्पना खूप आवडली. “बुद्धीच्या देवतेची ज्ञानाने पूजा करायची!” मग पुढील दहा दिवस सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडले. आरत्या झाल्या, सांस्कृतिक कार्यक्रम झाले, विविध स्पर्धा झाल्या. मुलांनी सर्व कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. पण त्या काळात मुलांनी वाचनसुद्धा केलं. अखेेर तो शेवटचा दिवस उजाडला. आपलं मनोगत व्यक्त करण्याचा! आणि मग प्रत्येकजण कोणी दोन मिनिटांत, कोणी तीन मिनिटांत, तर कोणी सराईतपणे आपले मनोगत व्यक्त करू लागला.

सर्व मुलांची मनोगते झाली. कुणी एक पुस्तक, कोणी दोन दोन, तर कुणी तीन तीन पुस्तके वाचली होती. या अनोख्या उपक्रमाचा आम्हाला खूप फायदा झाला. आमच्या ज्ञानात आणि माहितीत भर पडली. अशी मते मुलांनी व्यक्त केली. सर्वच मुलांनी एक गोष्ट मात्र मोठ्या आनंदाने सांगितली की, “या वेळचा आमचा गणपती उत्सव एकदम अनोखा झाला, एकदम वेगळा झाला, खऱ्या अर्थाने गणपती उत्सव साजरा झाला.”

सगळेेच छान बोलले. आपली नात, आपली मुलगी-मुलगा आपले बहीण-भाऊ कसं बोलतात, काय बोलतात, कसे विचार मांडतात हे ऐकायला आई-वडील, आजी-आजोबा आणि घरातल्या साऱ्यांंनी चांगलीच गर्दी केली होती. सातव्या इयत्तेत शिकणारी श्रुती तर खूपच छान बोलली. देशपांडे काकांचे सुरुवातीलाच आभार मानून ती म्हणाली, “हा उपक्रम आता आम्ही सर्वजण वर्षभर राबवणार. वर्षभर खूप पुस्तके वाचणार आणि खऱ्या अर्थाने विद्येच्या देवतेचे म्हणजेच गणपतीचे भक्त होणार. पुस्तकं वाचून मला आता खूप मोठं झाल्यासारखं वाटतंय, आणि एकदम भारीसुद्धा वाटतंय!” तिच्या मनोगताला सगळ्यांनीच जोरदार टाळ्या वाजवल्या. श्रुतीचे बोलणे ऐकून देशपांडे काकांनाही खूप समाधान वाटले.

कॉलनीतल्या सगळ्या मोठ्या लोकांनीदेखील देशपांडे काकांचे खूप आभार मानले आणि मुलांना गणेशोत्सव साजरा करण्याचा एक नवीन, आगळा-वेगळा मार्ग दाखवून दिल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद दिले!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -