Wednesday, July 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजShree Ganesh : आधी वंदू श्रीगणेशासी; दे सद्बुद्धी आम्हासी!

Shree Ganesh : आधी वंदू श्रीगणेशासी; दे सद्बुद्धी आम्हासी!

  • विशेष : ह.भ.प. डॉ. वीणा त्यागराज खाडिलकर

गणपती बाप्पा म्हटले की, डोळ्यांसमोर येतो ते १४ विद्या आणि ६४ कला यांचा स्वामी. या संख्येत असलेल्या विद्या आणि कला यांचे अधिपती असलेली देवता आपल्याला लाभली आहे. त्याच्या कृपेचा लाभ कसा करून घ्यायचा? हे आपल्यावर आहे. भक्ती, शक्ती आणि ज्ञान या सर्व क्षेत्रांत त्याला विशेष महत्त्व आहे. या देवतेकडे १४ विद्या आणि ६४ कला यांचे अधिपत्य आहे. पण ‘अहं’ नावाला नाही. अशा या बाप्पाला वंदन करून, ‘अहं’चा स्पर्श न होता, त्याच्या कृपेने जे मिळाले आहे, त्यात समाधानी राहण्याची व दुसऱ्याचे वाईट न चिंतण्याची सद्बुद्धी आम्हा साऱ्यांना दे, हे मागणे मागूया…!

कुठलेही संत वाङ्मय घ्या, त्यात गणेशाच्या स्तुतीपर साहित्य सापडेलच..! श्रीगणेश आराध्यदेवता नसताना सुद्धा संत एकनाथ महाराजांनी गणेशाला वंदन करून ते म्हणतात, “अर्पुनिया देवा भावाचे मोदक। भावे विनायक पूजा करू। नित्य दुर्वा-दळ अरपुनी चरणी। गेले हरपुनी काया वाचा मन॥” तसेच संत ज्ञानेश्वरांनी देखील श्रीगणेशाचे वर्णन केले आहे; “ॐ नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या॥ जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा ॥१॥ देवा तूंचि गणेशु। सकळमति प्रकाशु॥ म्हणे निवृत्ति दासु। अवधारिजो जी॥२॥ अकार चरण युगूल। उकार उदर विशाल॥ मकार महामंडल। मस्तकाकारें॥३॥ हे तिन्ही एकवटले। तेथें शब्दब्रह्म कवळलें॥ ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें। आदिबीज॥४॥’ ज्ञानेश्वर माऊलींनी देखील सकलमती प्रकाशू असे निक्षून सांगितले आहे. म्हणून मलाही म्हणावेसे वाटते की…

गणपती असे ही विद्येची देवता
भजता मनोभावे पावे तो सर्वथा॥
आनंदी जग झाले गणपती येता
कल्याण होई तो आशीर्वाद देता॥
श्री गणेश म्हटले की, डोळ्यांसमोर येतो ते १४ विद्या आणि ६४ कला यांचा स्वामी. या संख्येत असलेल्या विद्या आणि कला यांचे अाधिपती असलेली देवता आपल्याला लाभली आहे. त्याच्या कृपेचा लाभ कसा करून घ्यायचा? हे आपल्यावर आहे. कारण त्याच्याकडे तर विविध विद्या आणि कला यांचे भांडार आहे.

पुरातन काळापासून गणपतीला भक्ती, शक्ती आणि ज्ञान या सर्व क्षेत्रांत विशेष महत्त्व आहे. अशा या पूज्य देवतेविषयी माझ्या अल्प मतीने मी काय लिहिणार! पण बालपणापासून ज्या देवतेचे आकर्षण, प्रेम वाटले ती म्हणजे गणपती बाप्पा मोरया!

आपण पाहतो की, इतरांपेक्षा चांगली नोकरी असल्यावर काहीजणांचा रुबाब बदलतो. मग त्यात इतरांना कमी लेखणे, त्यांना दोष देणे, त्यांचे कपडे-राहणीमान यांविषयी चर्चा करणे इत्यादी. येथे लक्षात घेण्याचा भाग म्हणजे माणसाला चांगली नोकरी आहे. पण तो काय करत आहे? तर दुसऱ्याच्या उठाठेवी. देवाच्या कृपेने जे मिळाले आहे त्यात समाधानी न राहता दुसऱ्यावर चिखलफेक करण्यात धन्यता मानणे निश्चितच चांगले नाही. याविषयी प्रत्येकजण विचार करून पाहू शकतो की, आपण तर कळत नकळत असे करत नाही ना? जर करत असू, तर तातडीने ते थांबवणे आवश्यक आहे. देवाने प्रत्येकाला त्याच्या पूर्व कर्म आणि वर्तमान कर्म यांनुसार भौतिक, मानसिक, आर्थिक आदी गोष्टी दिल्या आहेत. आपण म्हणतही असतो ‘प्रयत्नांती परमेश्वर.’ असे असताना देवाच्या कार्यात उठाठेवी करून करत असलेला हस्तक्षेप चुकीचा आहे, हे लक्षात येत आहे का?

याची आठवण करून द्यावीशी वाटली; कारण आपण विविध देवतांची भक्ती करतो. पण ती करताना देवाला जे आवडत नाही तेही करतो. त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो की, मी इतकी वर्षे पूजा-भक्ती करत आहे. पण माझ्यात बदल का होत नाही? उलट इतरांनी बदलावे ही अपेक्षा माझ्यात तीव्र आहे. आपण स्वतःला बदलू शकतो. कारण ते आपल्याला शक्य आहे. अर्थातच त्यासाठीही प्रयत्न करावेच लागणार. तेव्हा लक्षात येईल की, मी दुसऱ्याकडून जी अपेक्षा करत होतो, ती किती व्यर्थ होती. स्वतःला स्वतःच्या चुकीची जाणीव होणे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आपण त्याविषयी अंतर्मुख होत विचार करणार. पण आता बहिर्मुख राहिले जात असल्याने इतरांकडे सर्वाधिक लक्ष असते. यात किती ऊर्जा वाया जाते? याचा विचार करावासा वाटत नाही.

याचे स्मरण यासाठी केले की, सुखकर्ता – दुखःहर्ता – बुद्धिदाता असलेली देवता म्हणजे श्री गणेश. या देवतेकडे १४ विद्या आणि ६४ कला यांचे अधिपत्य आहे. पण अहं नावाला नाही आणि माणसाला जरा कुठे यशाची शिखरे दिसू लागली की, त्याला बाकी सर्व पाण्यातच दिसू लागतात. देवता या आपल्यासाठी आदर्शवत असतात. उदा. प्रभू श्री राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, श्री हनुमान म्हणजे दास्यभक्ती, आज्ञाधारकता, नम्रता आदींचे उत्तम उदहारण. देवतांकडून शिकावे तितके अल्पच आहे. असे असताना आपण शिकण्यात कुठे कमी पडतो? याचे चिंतन केले, तर त्या त्या देवताच योग्य दिशा दाखवण्यासाठी साहाय्य करत आहेत, याची प्रचिती आल्याविना रहाणार नाही.

श्री गणेश बुद्धीचीही देवता आहे. तिच्याकडे स्वतःतील दोष घालवण्यासाठी कृती करण्यासाठी साहाय्य मागा. विचार सात्त्विक असतील, तरच कृतीही सात्त्विक असणार. परिणामी हळूहळू आपल्यात सात्त्विकता येण्यास साहाय्य होणार. त्यामुळे अनावश्यक विचार कमी कमी होत आहेत हे अनुभवता येईल. देवाकडे व्यावहारिक प्रगतीसाठी बऱ्याच विनवण्या केल्या जातात. पण स्वतःतील दुर्गुण घालवण्यासाठी विनवण्या केल्या, तर ते नक्कीच श्री गणेशाला अधिक आवडेल.

आपण आतापर्यंत जीवनात कोणाकोणाला दुखावले, लुटले, ओरबाडले इत्यादी प्रकारे त्रास दिला याचा लेखाजोखा देवाकडे असतो. त्यामुळे ‘देवाने जी बुद्धी दिलेली आहे तिचा उपयोग माझ्याकडून सन्मार्गावर चालण्यासाठी होऊ दे.’ असे वारंवार सांगणे करणे आवश्यक आहे. बुद्धीची देवता श्रीगणेश भक्ताची आर्त हाक ऐकतोच. प्रत्येक देवता भक्तांची हाक ऐकतात.

या विश्वात विविध क्षेत्र आहेत. उदा. कृषी – कला – विज्ञान – तंत्रज्ञान – कायदा – पर्यावरण – अर्थ इत्यादी. प्रत्येक क्षेत्राचे सखोल ज्ञान कोणालाच नाही. तरीही जे काही ज्ञान आहे त्या जोरावर काही वेळी किती मिजास दाखवली जाते? ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे’ म्हणतात ते हेच. ज्ञानी असलो तरी अहंकारी नसावे. नम्र – शांत – विनयशील असावे, तर तुम्ही सर्वांना हवेहवेसे वाटणार. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. स्वतःचे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वतःच्या चांगल्या-वाईट स्वभावाचा आरसा असतो. अर्थातच स्वभावात, वागणुकीत ओढून-ताणून आणलेला दिखावा अजिबात नको. कारण हे सोंग-ढोंग पुढे उघडे पडल्यावर तोंडावर आपटायला होते. नियतीच्या नियमानुसार खोटं फार काळ टिकत नाही. सत्य त्याला उघडे पाडतेच. चांगुलपणाचे खोटे मुखवटे तात्पुरतेच टिकणारे असतात. श्रीगणेशाला मनोभावे शरण जात त्याच्याकडे ‘मला अहंकाराचा स्पर्शही होऊ देऊ नको.’ हे मागणे मागूया!

श्री गणेशाचे वास्तव्य अकरा दिवसांसाठी अनुभवण्यासाठी यंदाही संधी मिळत आहे. जशी ती प्रतिवर्षी प्राप्त होत असते. या अकरा दिवसांत श्रीगणेशाच्या शक्तीचा लाभ कसा करून घ्यायचा आणि स्वतःला शुद्ध-निर्मळ कसे करून घ्यायचे याचाही विचार करूया. देव भावाचा भुकेला आहे. त्याला भव्य आरास नको की कोणाशी चढाओढ नको. त्याला हवी ती केवळ आपली निस्वार्थ भक्ती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -