
- प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
सिविक्स सेन्स म्हणजे नागरी भावना आपल्यापैकी कितीजण किती वेळा पाळतो, हे प्रत्येकाने आठवून पाहावे. ट्रेनमधून प्रवास करताना ट्रेनच्या बाहेर ज्या पद्धतीने कचरा लोक टाकतात ते पाहून तिडीक येते. अशात कितीजणांना समजावून सांगायचे, तेच कळत नाही.
काल ग्राहक पेठेतून कोकम सरबताची बाटली विकत घेतली. त्यांच्या प्रथेप्रमाणे त्यांनी ती बाटली कागदाच्या पिशवीत टाकून माझ्या हातात दिली. मी रंगबेरंगी सजलेल्या ग्राहकपेठेत इतरही वस्तूंवर नजर फिरवत बाहेर पडले. संध्याकाळची वेळ होती. बराच वेळ थांबले, पण एकही रिक्षा मिळेना. शेवटी पुढच्या चौकात कदाचित रिक्षा मिळू शकेल, या उद्देशाने चालत पुढे गेले. तेथेही बराच वेळ रिक्षा मिळू शकली नाही. मग दहा मिनिटाच्या अंतरावर असलेल्या घरी चालत जाऊ, अशा विचाराने चालायला सुरुवात केली. हातात पातळ कागदी पिशवी होती. त्या पिशवीच्या मानाने काचेची बाटली जड होती. काही कळायच्या आत पिशवी खालून फाटली आणि बाटली खाली पडली. अचानक खळकन् झालेल्या आवाजाने मी स्तंभित झाले. हातात रिकामी पिशवी आणि खाली पडलेली आणि फुटलेली बाटली पाहत राहिले. काचा आणि त्याच्यामधून लाल रंगाचं कोकम सरबत इकडेतिकडे पसरले. मला काही सुचण्याच्या आधीच रस्त्यावरून जाणारा एक माणूस पटकन खाली वाकला आणि त्याने शांतपणे काचेच्या बाटलीचे तुटलेले तुकडे उचलले आणि मला म्हणाला की, ‘द्या ती रिकामी पिशवी.’ मी त्याच्या हातात पिशवी देताच ते काचेचे तुकडे त्यांनी त्या पिशवीवर ठेवले आणि आसपास पाहात एका दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या कचराकुंडीत तो ते तुकडे टाकून आला. हातात पिशवी होतीच, मग ती पिशवी त्याने त्या रस्त्यावर सांडलेल्या कोकम सरबतावर टाकली. पातळ कागदी पिशवीने बरेच कोकम सरबत एका मिनिटाच्या आत शोषून घेतले. तो माणूस माझ्याकडे पाहून म्हणाला की, ‘आता कोणाला काच लागणार नाही आणि कोणी या चिकट रसावरून घसरून पडणार नाही.’
हे सगळे घडून गेल्यावर मी त्या माणसाकडे नीट पाहिले. अत्यंत व्यवस्थित शर्ट, पॅन्ट, शूज, हातात लेदर बॅग घातलेला तो माणूस होता. त्याच्यासोबत कोणीतरी स्त्री होती. बायको, मैत्रीण किंवा ऑफिसची कलीग असावी. तिने मला विचारले की, ‘ताई, तुम्हाला कुठे लागले नाही ना? मी ‘नाही’ म्हटल्यावर त्यांना ‘धन्यवाद’ म्हणायच्या आतच दोघेही चालू लागले. घरी येताना मी या घटनेचा विचार करू लागले. मला एक घटना आठवली. माझी मैत्रीण सत्तावीस-अठ्ठावीस वर्षांची असावी. साधारण तीन वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते आणि ती पाच महिन्यांची गर्भवती होती. घाटकोपरवरून सीएसटीला रोज ट्रेनने ऑफिससाठी जायची. एके दिवशी सकाळी घाटकोपर स्टेशनवर चालत असताना एका केळीच्या सालावरून पाय घसरून पडली. त्यानंतरचे तिला काही आठवत नाही. कोणीतरी तिला हॉस्पिटलमध्ये भरती केले आणि ती शुद्धीवर आल्यावर तिचे मूल पोटातच दगावल्याचे तिला कळले. तिच्यासहित तिच्या सर्व कुटुंबीयांना खूपच वाईट वाटले. ती बरी झाली आणि कामाला जायला तिने सुरुवात केली; परंतु या घटनेनंतर ती कधीच गर्भवती राहू शकली नाही. आज तिचे वय पंचावन्नच्या आसपासचे आहे. आयुष्यभराचे दुःख तिला या घटनेने दिले. या घटनेला कारणीभूत कोणीतरी निष्काळजीपणे टाकलेले एक ‘केळ्याचे साल’ ठरले.
आज जेव्हा केव्हा मी कोणत्याही रस्त्याने जावो, मग ते मॉर्निंग वॉकसाठी असो किंवा एखादा लग्न समारंभासाठी आणि कितीही घाईत असो... मला रस्त्यात केळ्याचे साल दिसले, तर ते मी ओलांडून जाऊच शकत नाही. एखादी रिफ्लेक्स अॅक्शन असावी त्याप्रमाणे मी पटकन खाली वाकून ते साल उचलते आणि ज्याच्यावर चालणाऱ्या माणसांचा पाय पडणार नाही, अशा ठिकाणी ते टाकल्याशिवाय पुढे जात नाही. केळ्याची साल दिसल्यावर माझी मैत्रीण आणि तिचे आयुष्य माझ्या डोळ्यांसमोर येते.
सिविक्स सेन्स म्हणजे नागरी भावना आपल्यापैकी कितीजण किती वेळा पाळतो, हे प्रत्येकाने आठवून पाहावे. ट्रेनमधून प्रवास करताना ट्रेनच्या बाहेर ज्या पद्धतीने कोणतेही प्लास्टिक, कचरा, खाद्यपदार्थ लोक टाकतात ते पाहून तिडीक येते. किती जणांना किती वेळा काय समजावून सांगायचे तेच कळत नाही. आपल्या सोबतीच्या व्यक्तीला जरी आपण हे सांगितले तरी त्याला ते आवडत नाही. बाहेरगावी जाणाऱ्या ट्रेनच्या प्रत्येक डब्याला व्यवस्थित कचराकुंडी असते, प्रत्येक बागेत, प्रत्येक मॉलमध्ये आणि रस्त्यावर जागोजागी कचराकुंड्या असतात, त्याचा कितीजण व्यवस्थित वापर करतात?
सिंगापूरला गेल्यावर एका बागेमध्ये एक पाटी वाचली की, ‘तुम्ही कचरा रस्त्यावर टाकलात, तर तुम्हाला कोणतीही रक्कम भरून सुटका करून घेता येणार नाही, तर आठवडाभर तोच रस्ता तुम्हाला झाडावा लागेल!’ त्यामुळे तिथे असताना बसमधून उतरल्यावर साधे बस तिकीट असो आणखी काही, जीव तोडून घट्ट धरून तो कचरा आपण व्यवस्थित कचराकुंडीमध्ये टाकतो. तोच माणूस जेव्हा इथे भारतात फिरतो, तेव्हा त्याला कचरा कुठेही टाकायची जणू मुभा मिळालेली असते किंवा तो कोणत्यातरी हक्काने ती मिळवतो? कोणत्याही बागेत, रस्त्यावर, ट्रेन-बसमध्ये किंवा आणखी कुठेही ज्या प्रमाणात कचरा दिसतो ते सर्व कचऱ्यांचे ढीग केव्हा संपुष्टात येणार, याचा विचार मनाला वेदना देतो. या पार्श्वभूमीवर कोणालाही काच लागू नये किंवा त्या ओल्या चिकट द्रवावरून कोणीही माणूस घसरू नये याची काळजी घेणारा तो काल भेटलेला माणूस आणि तुम्हाला लागलं, तर नाही ना अशी विचारणारी त्याची सोबतीची व्यक्ती यांच्याविषयी आजच्या या लेखातून ऋण व्यक्त करते.
‘जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल!’ कोणत्यातरी सत्पुरुषाचे, असे वाक्य कुठेतरी वाचल्याचे स्मरणात आहे, त्याची फक्त आठवण मी स्वतःला आणि या लेखाच्या निमित्ताने आपल्याला करून देते!