दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
गणपती बाप्पा हे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाचं लाडकं दैवत. बाप्पाच्या आगमनाची आतुरता प्रत्येकाला असते. त्याच्या आगमनासाठी आरास करणे, गोडधोड पदार्थ बनविणे यामध्ये अवघे कुटुंब दंग होऊन जाते. आपल्या या बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. बाप्पाला २१ मोदकांचा नैवैद्य दाखविल्यानंतर तो प्रसाद ग्रहण करण्याचा आनंदच विरळा. त्यात पौष्टिक मोदकाची मजाच न्यारी. मात्र शहरामध्ये असे मोदक मिळणे म्हणजे पर्वणीच म्हणावी लागेल. शहरी जीवनशैलीचा विचार करून गणपतीसाठी स्पेशल काजू आणि खोबऱ्याचे जे गूळ, वेलची आणि जायफळयुक्त असे मोदक एका डॉक्टरने तयार केले आहेत. यंदा गणेशोत्सवात वजन वाढण्याचं टेन्शन नाही, बिनधास्त हे मोदक खाऊ शकता. या पौष्टिक मोदकांसोबत ज्वारी, गहू, नाचणी यापासून बनविलेले कुकीज भारत आणि भारताबाहेर देखील प्रसिद्ध आहेत. दिवाळीतील बेक फराळ यांची खासियत तर आहेच, पण हे सर्व गिफ्टिंग स्वरूपातही उपलब्ध आहे. आरोग्य जपणाऱ्या खाद्यपदार्थाची निर्मिती करणाऱ्या या डॉक्टर म्हणजे ‘जस्ट इट फूड्स’च्या डॉ. विद्या क्षीरसागर.
विद्या मूळची दादरची. लक्ष्मण सखाराम पवार, उर्मिला लक्ष्मण पवार यांची कन्या विद्या. रूपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर एमबीबीएस कॉलेजचे शिक्षण ग्रँड मेडिकल कॉलेज, जेजे हॉस्पिटलमधून केले. ललित क्षीरसागर यांच्यासोबत विवाहानंतर विद्या नवी मुंबईला स्थलांतरित झाली. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवी मिळवून निमशासकिय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरी केली. त्यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि वयाच्या पन्नाशीच्या जवळ असताना तिनं स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
आई-वडील नोकरीच करत होते, त्यामुळे व्यवसायामध्ये येणारी विद्या पहिलीच उद्योजिका. तेसुद्धा मूळ शिक्षणाला बाजूला ठेवून. आहाराशी निगडित ज्ञान असल्यामुळे पौष्टिक घटकांचा उपयोग करून हा व्यवसाय सुरू केला. ही संकल्पना सुरू करण्याचे कारण एवढेच होते की, गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशामध्ये मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार याचे रुग्ण वाढत चालले आहेत. हे आपल्याला आटोक्यात आणायचे असेल, तर आहार हा मुख्य विषय असतो. आपली जीवनशैली बदलायला पाहिजे. खासगी संस्था, शैक्षणिक क्षेत्रात जीवनशैली व्यवस्थापनाची कार्यशाळा घेत होती, तेव्हा तिच्या लक्षात आले की, सकस खाण्याचे पर्याय मिळत नाही आहे. यावर आपण काम केले पाहिजे, असे विद्याला त्यावेळी वाटले. तिने तिचे पॅशन आणि ध्येय एकत्र करून काहीतरी करायचे ठरवले. उत्पादन प्रक्रिया या विषयाचे थोडे आकर्षण होते आणि स्वतःचे काहीतरी करायचे, स्वतःचा उद्योग असावा या उद्देशाने सकस आहार देणारा ‘जस्ट इट फूड्स’ ब्रँड सुरू झाला. मैदा आणि तेलाचा वापर न करता तयार केलेले पदार्थ हे याचे वैशिष्ट्य.
विद्या यांनी या क्षेत्रातील ज्ञान घेण्यासाठी विविध संस्थांमधून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर स्वतःचे युनिट मुरबाडमध्ये सुरू केलं. काही वर्षे तेथेच ग्रामीण भागात काम त्या करत होत्या. प्रॉडक्ट मार्केटिंग शमध्ये अडचणी येऊ लागल्या. त्यानंतर त्यांनी युनिट नवी मुंबईमध्ये हलवले. युनिटमध्ये जास्तीत-जास्त महिला काम करतात. “ग्रामीण भागातील महिलांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा, असा प्रयत्न नेहमीच होता. आम्हीच सर्व मिळून पाककृतीबद्दल माहिती घेतो, अभ्यास करतो, मग प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून मग उत्पादन निश्चित करतो. मूळ उद्देश हा होता की, आपले पारंपरिक पदार्थ पूर्वी ज्या पद्धतीने तयार केले जायचे ती पद्धत वापरायची. आता व्यावसायिक स्वरूप आल्याने मैदा, साखर, डालडा हे सगळं वापरून तयार केलेले पदार्थ बाजारात सहज उपलब्ध होतात. पण आपण आख्खे धान्य वापरून, गायीचे लोणी, तूप वापरून जे सकस आहार देतील, असे पदार्थ तयार करायला सुरवात केली. हेल्दी स्नॅक्स, एनर्जी बार, जे आरोग्यासाठी हितकारक असतात त्याची निर्मिती करायला सुरुवात केली”, डॉ.विद्या सांगतात.
भारताच्या बाहेरील देशांमध्ये त्यांच्या धावपळीच्या आयुष्यात पटकन काहीतरी खाण्यासाठी एनर्जी बार खूप प्रसिद्ध झाले आहेत. आपण भारतात सुद्धा काय करू शकतो, या विचाराने एनर्जी बारची निर्मिती केली. आपल्याकडील धान्याचा वापर करून ड्रायफ्रूट, भरड धान्य वापरून एनर्जी बार तयार केले. गणपतीच्या दिवसांमध्ये आमचे मोदक खूपच प्रसिद्ध आहेत. आताच्या काळात दुधाची भेसळ, माव्याची भेसळ ही हमखास आपल्याला आढळून येते. त्यामुळे गणपतीसाठी स्पेशल काजू आणि खोबऱ्याचे जे गूळ, वेलची आणि जायफळयुक्त मोदक तयार केले. हे मोदक पौष्टिक तर आहेतच आणि एक महिना टिकण्याची खात्री सुद्धा आपण देतो. या मोदकाची मागणी भारतासोबत भारतबाहेर देखील आहे. गहू, ज्वारी आणि नाचणीयुक्त कुकीज तयार केले. आता या कुकीजला खूप मागणी आहे. हे सर्व पौष्टिक खाद्यपदार्थ ‘जस्ट इट फूड्स’च्या वेबसाइटवर, अमेझाॅन, बिग बास्केटवर उपलब्ध आहेत, डॉ. विद्या सांगतात.
“जस्ट इट हा ब्रँड सुरू करताना काही अनुभव नव्हता. शून्यातून सुरवात केल्याने सुरवातीला अनेक अडचणी आल्या. निर्मिती उद्योग किंवा उत्पादन उद्योगात अनेक आव्हानं असतात. ज्याच्यामध्ये मॅन, मनी आणि मटेरियल अर्थात मनुष्यबळ, पैसा आणि वस्तू या तिन्ही मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली असल्यामुळे सरकारी अनुदानाने कमी आणि स्वखर्चाने हा व्यवसाय उभारला आहे. यामध्ये मनुष्यबळाची कुशलता, त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांच्यावर स्वच्छतेविषयी सतत संस्कार करावे लागत होते. आपण कोणत्या प्रकारची यंत्रे घ्यायला पाहिजे, आपण कुठे चुकलो, कुठे अजून चांगल्या पद्धतीची घेता आली असती हे अनुभवाने कळत गेले.” विद्या आपल्या अनुभवाचा प्रवास सांगतात. कुटुंबाची आणि आपल्या कारखान्यातील महिलांची साथ नसती, तर आपला हा उद्योजकीय प्रवास अवघड होता, असे विद्या क्षीरसागर मान्य करतात.
गणेशोत्सवाच्या काळात कोणतेही मोदक बाप्पाला देण्यापेक्षा यंदा पौष्टिक मोदक द्या. आपला हा लाडका लंबोदर नक्कीच सुखावेल. आपल्या नागरिकांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून सरकारी नोकरी सोडून आहार क्षेत्रातील स्वत:चा व्यवसाय उभारणाऱ्या डॉक्टर विद्या क्षीरसागर ‘लेडी बॉस’ शब्द सार्थ ठरवतात.
[email protected]