परस्त्रीच्या नादाला लागल्यामुळे ‘त्या’ दोघांची भांडणं न्यायालयापर्यंत गेली आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मुलांची वाटणी झाली. मुलगी वडिलांसोबत राहू लागली, पण तिथे तिचे हाल होऊ लागले. हे समजल्यावर तिने मुलीला आपल्यासोबत आणलं, पण…
भावना आणि सोहम एका शाळेत शिकत होते. त्यामुळे त्यांची लहानपणापासून एकमेकांशी ओळख होती. मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालं. एकमेकांशी लग्न करायचे ठरवले. पण त्यांच्या लग्नाला भावनांच्या घरातून विरोध होता, कारण सोहम हा वेगळा जाती-धर्माचा होता. भावनाने या गोष्टीला न जुमानता सोहमबरोबर पळून जाऊन लग्न केलं. सोहमच्या जाती-धर्माशी व घरातील नातेवाइकांशी जुळून घ्यायला तिला फार वेळ लागला. सोहमाचाही स्वभाव तिला आता हळूहळू समजू लागला होता. भावनाला आपली आणि आपल्या सासरच्या लोकांची संस्कृती किती वेगळी आहे, याची जाणीव होऊ लागली होती. आपले आई-वडील किती योग्य बोलत होते, हे तिला आता समजू लागलं होतं. पण आता वेळ निघून गेलेली होती. तिच्या व सोहमच्या संसारवेलीवर दोन मुलगे आणि एक मुलगी अशी फुले उमली होती. तिचा संसार सुरू झालेला होता. संसार करताना तिला अनेक गोष्टीची तडजोड करावी लागत होती.
सोहमचे हळूहळू भावनावरील लक्ष कमी होऊन, त्याचं प्रेम आता एका बारमध्ये काम करणाऱ्या बारबालेवर जडले होतो. कामधंदे सोडून तो दिवस-रात्र त्या बारबालेसोबत असायचा. भावनाला तीन मुलांना सांभाळणं आणि घरातलं आर्थिक बाजू सांभाळणं कठीण होऊ लागलं होतं. म्हणून ती लोकांकडे घरकामाची कामे करू लागली. सोहम तिला मारझोड करून ती कमवत असलेले पैसे घेऊन बारबालेला देऊ लागला. आपण कमवतोय आणि सोहम व ती बारबाला मजा करते, या गोष्टीचे दुःख भावनाला सतत होत होते. या गोष्टीवरून सोहम आणि भावनांमध्ये वाद होऊ लागले. दोघांची भांडणे न्यायालयापर्यंत गेली आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
मोठा मुलगा व मुलगी ही सोहमकडे व एक लहान मुलगा भावनाकडे अशी आई-वडिलांना मुलांच्या वाटण्या करून जबाबदाऱ्या देण्यात आल्या. मुलगी आपल्या वडिलांसोबत म्हणजे सोहमसोबत राहू लागली, पण तिथे तिचे हाल होऊ लागले आणि त्या मुलीने घर सोडून रात्रभर रेल्वे स्टेशनला दिवस काढले आणि ही गोष्ट भावनाला समजल्यावर तिने आपल्या मुलीला आपल्यासोबत आणलं, पण दोन-दोन मुलांना पोसायचं कसं? हा विचार करून मुलीला तिने एका आश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला. लहान मुलगा भावनासोबत राहू लागला; परंतु आई-वडिलांचा विभक्तपणा, त्यांची भांडणे त्याने लहानपणापासून पाहिल्यामुळे त्याचाही स्वभाव उद्धट, ऐकून न घेणे, विचित्र वागणे अशा प्रकारचा बनला. लहान वयातच मोठे जसे वागतात, तसा तो वागू लागला आणि या गोष्टीचा त्रास हा भावनाला होऊ लागला. आपला पती आपल्या हातातून गेला तसाही मुलगा वाया जातो की काय असं तिला वाटू लागला. म्हणून ती याही मुलासाठी आश्रम शोधू लागली आहे की, तिथे जाऊन तिथे काहीतरी हा मुलगा शिकेल व व्यवस्थित वागेल आणि स्वतःच्या पायावर उभा राहील, या आशेवरती आश्रमाची शोधाशोध घेत आहे.
मोठा मुलगा वडिलांच्या सोबत राहून जसे वडील वागतात त्याचप्रमाणे तो वागत आहे, याचं दुःख भावनाला आहे. आपली दोन्ही मुलं जे आपल्याकडे आहेत, ती तरी व्यवस्थित राहावी, त्यांचं भविष्य चांगलं व्हावं, असं भावनाला मनापासून वाटत आहे. त्यामुळे तिने आपल्याकडे राहून आपली मुलं बिघडू नयेत म्हणून त्यांना आश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला. कारण आपण घरकाम करून जी कमाई होईल त्यात मुलांचं भविष्य घडणार नाही. आपल्या आयुष्यात जशी वाताहत झाली, तशी मुलांची होऊ नये, ही तळमळ तिला आहे.
आई-वडिलांच्या भांडणांमध्ये किंवा वडिलांच्या अरेरावीपणामुळे किंवा बाहेरख्यालीमुळे मुलांची अक्षरश: लहानपणापासून वाताहत होते. सोहम याने बारबालेच्या नादाला लागून आपला संसार अक्षरशः मोडून टाकला. ज्या भावनाने त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या आई-वडिलांचे घर सोडून त्याच्याशी लग्न केलं होतं, तिच्या मनाचाही त्याने विचार केला नाही. एवढेच नाही, तर आपल्याला सोन्यासारखी तीन मुलं आहेत, त्यांच्या भविष्याचाही सोहमने विचार केला नाही. सोहम परस्त्रीच्या नादाला लागल्यामुळे आपल्या पत्नीसोबत आपल्या मुलांची वाताहत केली.
(सत्यघटनेवर आधारित)
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…