दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम
अवघ्या दोन दिवसांनी लाडक्या बाप्पाचे आगमन घरोघरी होणार आहे. कोकणात तर या गणेशोत्सवाची मोठी धूम असते आणि वर्षानुवर्षे ती कमी होण्यापेक्षा अधिकच वाढताना दिसत आहेत. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्येच सुमारे दीड लाख घरांमध्ये गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. कुठे दीड दिवस, तर कुठे पाच दिवस, तर कुठे सात दिवस आणि दहा दिवस बाप्पाचे लाड केले जाणार आहेत. कोकणी माणसाचे शिमगोत्सावाप्रमाणेच गणेशोत्सवावर सुद्धा तितकेच प्रेम! शिमग्यात सुद्धा गावागावातील ग्रामदेवता त्या त्या गावातल्या घरोघरी भेट देतात, तर गणेशोत्सवामध्ये खुद्द बाप्पा वेगवेगळ्या रूपाने पण तितक्याच ओढीने घरोघरी येतो. या दोन्ही सणांमध्ये देव घरी येण्याची जी ओढ कोकणकरांना असते त्यातच खरे अप्रूप असते.
कोकण लाल तांबड्या मातीचा, कोकण सह्याद्रीच्या कणखरतेचा, कोकण सागरासारखा विशाल हृदयाचा, मुसळधार पावसासारखा, कोकण ज्ञानाचा, साहित्याचा, प्रथा परंपरांचा. काजू, आंबे, मासे आणि थोडीफार शेती यावर गुजराण करणारा, प्रत्येक संकटांचा खंबीरपणे सामना करणारा कोकण या शिमगा आणि गणेशोत्सव यासाठी वेडा होतोच. त्याची बाप्पावर तर विशेष भक्ती. १९ सप्टेंबरपासून बाप्पा घरी येणार आहेत. त्या दिवसापासून कोकणाचे रूप आणि रंग दोन्हीही बदलणार आहे. घराघरात भक्तिमय वातावरण असेल. बाप्पाची आरास करण्यासाठीच आजपासून दोन दिवस घाई गडबडीला सुरुवात होईल. चाकरमानी घराघरात आले की कोकणातील गावे गजबजून जातील. लगबग सुरू होईल. गणपती आगमन आणि गणपती विसर्जन या दोन्ही दिवसांना महत्त्व असतं.
बाप्पाला वाजत-गाजत आगमन केले जाते, तर त्याला निरोप सुद्धा तितक्याच जल्लोषात केले जाते. या मधल्या कालावधीत घराघरांमध्ये आरत्या, भजने यांची रंगत वाढेल. बाप्पासाठी रुचकर भोजन बनेल. कोकणात या कालावधीत श्रीसत्यनारायाणाच्या महापूजेचे आयोजन केले जाते. गौरीचा सण हा गणेशोत्सवातला आणखी एक लोकप्रिय सण. जणू पार्वती ही गौरी बनून आपल्या माहेरी येते. तिचं स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते. तिच्यासाठी खास गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. माहेरवाशीणीचे लाड कसे केले पाहिजेत, ते या सणामधून दाखवले जाते. गौरी किंवा गौराई घरी येते तेव्हा तिचा आगमन सोहळा पाहणे एक वेगळा अनुभव असतो. अनेक ठिकाणी गौरीचे मुखवटे घालून तिला सजवले जाते. तिची पूजा असते, तिच्यासाठी खास प्रसाद असतो, तर तिसऱ्या दिवशी गौरी आणि गणपतीला निरोप दिला जातो. कोकणात गौरी गणपतीचे अप्रूप जास्त असते, तर अनंत चतुर्दशीपर्यंत हा गणेशोत्सव असतो.
केवळ घरगुतीच नाही, तर सार्वजनिक गणेशोत्सव सुद्धा मंडळांमध्ये साजरे केले जातात. त्यानिमित्ताने सामाजिक उपक्रम साजरे केले जातात, तर अनेक घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सजावट केली जाते. असा हा गणेशोत्सव मंगळवारपासून कोकणात सुरू होत आहे. यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशभक्तांच्या स्वागतासाठी विविध सोयी-सुविधा दिल्या जात आहेत. त्यांच्या आरोग्याची, सुखकर प्रवासाची काळजी घेतली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गची एक लाइन तरी सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विविध पद्धतीने हा उत्सव आनंदाने साजरा व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यंत्रणा राबू लागल्या आहेत.
यंदा बाप्पा येतोय, पण यंदाचा हंगाम मात्र थोडा चिंतेचा आहे. आंब्याने यंदा कोकणकरांना नाराज केले आहे, तर पाऊस नसल्याने शेतीही म्हणावी तशी पोसावली नाहीय. अजूनही पाऊस पडावा आणि किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा आणि येणारा उन्हाळा सुसह्य व्हावा, अशी प्रार्थना प्रत्येकजण करत आहेच. आता हे विघ्न बाप्पा दूर करेल, अशी आशा कोकणकरांना आहे. बाप्पावर कोकाशणवासीयांची खूप श्रद्धा आहे. तो साऱ्या विघ्नांतून बाहेर काढेल, हा सकारात्मक विचार घेऊन यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार हे नक्की! गणपती बाप्पा मोरया!
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…