एखाद्या काव्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, कलाकृती उत्तमच व्हावी यासाठी आवश्यक असणारी निष्ठा, सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि कितीही कष्ट करायची तयारी या कौशल्यांच्या आधारावर प्रत्येक कलाकृती अजरामर करणाऱ्या आशा भोसले यांनी नुकतेच नव्वदीमध्ये पदार्पण केले. वयाच्या दहाव्या वर्षांपासून साथ देणारी त्यांची सांगीतिक कारकीर्द ऐंशीव्या वर्षांत पदार्पण करत आहे. मात्र तरीही आशाताईंमधील विद्यार्थिनी मोठी झालेली नाही!
कलावंत आणि संघर्ष यांचे अतूट नाते आहे. आयुष्याच्या वाटचालीमध्ये जिद्दीला आपलेसे करणारा कलावंतच हे नाते निभावू शकतो. आशाताईंच्या जीवनलेखाकडे बघताना याची प्रचिती येत राहते. त्यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षानेच गुंफलेले आहे. पण त्यातून सकारात्मकतेने मार्ग काढत असताना आशाताईंना गानकोकिळेची विलक्षण साथसंगत लाभली आणि सुरू झाला एका पर्वाचा प्रवास! वयाच्या दहाव्या वर्षी आशाताईंनी गायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना घरातच एक मोठे आव्हान होते. स्वरसम्राज्ञी लतादीदी या त्यांच्या मोठ्या भगिनी होत्या. तसेच त्या काळी इतरही अनेक ताकदीच्या गायकांची मांदियाळीच होती. नूरजहाँ, शमशाद बेगम यांच्यासारख्या गायिका तेव्हा कारकिर्दीच्या बहरात होत्या. अशा काळात विविध कारणांमुळे घराच्या बाहेर पडलेली १६ वर्षांची छोटीशी आशा आपल्या स्वरांच्या सहाय्याने जबाबदाऱ्यांचे आभाळ पेलते, हे मला विलक्षण वाटते. गाण्याइतकाच त्यांचा जीवनप्रवासही अद्भुत आहे! या प्रवासाला सुरुवात होऊन नव्वद वर्षे झाली, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण आशाताई या एक चिरतरुण कादंबरीच आहेत, असे नेहमी वाटते.
अनेकदा प्रतिकूलता हीच कलावंताची सखी होते. पूर्ण अनुकूलता मिळाली, तर कलाकाराच्या कलेला खोली येत नाही. आशाताईंच्या बाबतीत हे प्रकर्षाने जाणवते. ताईंसारख्या कलाकारांच्या आयुष्यात नियती वरदान म्हणूनच दुःख देते, असे वाटते. त्याचे रूपांतर नवनिर्मितीमध्ये करणे ही त्या व्यक्तीची जिद्द असते. आशाताई साधक व्यक्तिमत्त्व आहेेत. त्यांच्यामागे मास्टर दीनानाथांची वीणा आहे, लतादीदींचा आणि माई मंगेशकरांचा कृतिशील आशीर्वादही आहे. त्यामुळेच कदाचित त्यांना आयुष्यातील प्रत्येक संकट सकारात्मकतेने पेलण्याची ताकद मिळाली असावी. ‘भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगिले की मज हसावे लागले…’ या कविवर्य सुरेश भटांच्या ओळी आशाताई अक्षरशः जगल्या आहेत. भोगण्यालाही सुख म्हणता येण्यासाठी आवश्यक असणारी सकारात्मता त्यांच्या ठायी कायम होती आणि हीच सकारात्मकता त्यांच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाची ठरली. एस. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले, भावा-बहिणीच्या नात्यावरील गाणे गाताना आशाताईंचा ऊर भरून आला होता. साधारण त्याच वेळी आशाताई घरापासून लांब होत्या. त्यामुळे भाऊ हृदयनाथ मंगेशकर त्यांच्यापासून दूर होते. गाण्याचा मथितार्थच जगत असल्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले होते. पण हेच त्यांचे कौशल्य वाखणण्याजोगे वाटते. व्यक्तिगत आयुष्यामधील दुःख कुरवाळत न बसता, दुःखांची तीव्रता आपल्या कलाकृतीमध्ये मिसळून आशाताईंनी अनेक गाणी अजरामर केली, म्हणून त्या थोर आहेत. एकाच वेळी शास्त्रीय संगीत आणि अभिजात संगीताचा मेळ घालणे हे आशाताईंचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे, असे मला वाटते. प्रत्येक गानप्रकारामध्ये त्यांनी लीलया संचार केला. लावणीपासून कॅब्रेपर्यंत सगळ्या प्रकारची गाणी आशाताईंनी गायली. कारकिर्दीच्या सुरुवातीला पाश्चिमात्य ढंगाच्या गाण्यांना प्रतिष्ठा नव्हती. दुय्यम दर्जाच्या चित्रपटांमध्ये अशा प्रकारची गाणी असत. पण चित्रपटाचा दर्जा कसाही असला तरी गाण्यांचा दर्जा ठरवणे कलाकाराच्या हातात असते, हे आशाताईंनी दाखवून दिले. त्यांनी दुय्यम दर्जाच्या चित्रपटामधील गाण्यांना सर्वोच्च दर्जा मिळवून दिला. कोणता चित्रपट मिळावा, त्यातील नायक-नायिका कोण असावेत हे गायकाच्या हातात नसते; परंतु मिळालेल्या संधीचे सोने करणे हे त्या गायकाच्या हातात असते. खूप चांगले चित्रपट मिळूनही मेहनतीअभावी संधीचे सोने न करू शकलेले अनेक गायक आहेत. पण आशाताईंनी अप्रतिम आवाजासोबतच इतरही अनेक कौशल्यांच्या साथीने कारकीर्द गाजवली.
सर्वच मंगेशकर भावंडांचा सहवास लाभण्याइतका मी भाग्यशाली आहे. त्यामुळे जवळून पाहताना त्यांच्या अनेक कौशल्यांनी मी भारावून गेलो. मंगेशकर भावंडांची निरीक्षणशक्ती कायमच थक्क करणारी होती. या भावंडांनी जगाचे निरीक्षण केले, त्याप्रमाणे मी त्यांचे निरीक्षण केले. माझ्या छोट्याशा कलापटात मंगेशकर कुटुंब वेगळ्या जगासारखेच वाटते. त्यांच्यामधील प्रत्येकजणच निराळा विचार करतो. मंगेशकर कुटुंबीय केवळ गायक नाहीत, तर तत्त्वचिंतकही आहेत. याची प्रचिती त्यांच्या कलाकृतीमधून दिसून येते. आशाताईंचे सूक्ष्म निरीक्षण हे एक महत्त्वाचे कौशल्य जवळून निरखण्याचा योग अनेकदा आला. आशाताईंनी विविध भाषांमध्ये गाणी गायली. त्यासाठी अनेक भाषा आत्मसात केल्या. भाषा आत्मसात करण्यापूर्वी त्या प्रदेशाचे सण, समारंभ, परंपरा, वस्त्र नेसण्याची पद्धत यांच्यामध्ये मिसळून जायच्या. गाण्यातून भाषेचा लहेजा, भाषेचा विचार श्रोत्यापर्यंत पोहोचवावा लागतो. त्यासाठी आशाताई ती भाषा बोलणाऱ्या अनेकांशी संवाद साधतात. भाषा जाणून घेतात. केवळ उच्चारण म्हणजे भाषा नव्हे हे जाणून इतर भाषांमधील गाण्यांसाठी सूक्ष्म निरीक्षण करून आशाताईंनी प्रत्येक कलाकृतीला न्याय दिला.
आशाताई लावणी म्हणतात, तेव्हा अस्सल कोल्हापुरी वाटतात; परंतु ‘दम मारो दम’ गाताना लावणी गायिका त्यात दिसत नाही. याबाबत त्यांना एकदा विचारले, “तुम्ही गाताना वय कसे लपवता?” तेव्हा आशाताईंनी दिलेले उत्तर साधे पण विलक्षण होते. त्या म्हणाल्या, “मी ज्या नायिकेसाठी गाते, तिच्या वयाची होते!” हे आपल्याला ऐकताना-वाचताना सोपे वाटते. पण कवी परकाया प्रवेश करतो, त्याप्रमाणे दुसऱ्याच्या आयुष्यात प्रवेश करून नायिकेची सुखदुःखं जणू दत्तक घेऊन कलाकृतीमध्ये हुबेहूब उतरवणे, ही एक वेगळीच प्रतिभा आहे. आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर केलेले सूक्ष्म निरीक्षण, भाषेचा रंग आणि मातीचा गंध याच्याशी त्या एकरूप झाल्या. कदाचित यामुळेच आजही गायला आल्यावर त्या विद्यार्थिनीसारख्या बसतात. अहंकाराचा अंशही त्यांच्याकडे नाही. “मला गाण्यातले एवढे समजते, तुम्ही कोण मला सांगणार?” असा आविर्भाव त्यांना माहीत नाही. अखंड वाचन आणि चिंतनासोबतच सतत ‘ऐकणेही’ सुरू असते. त्यामुळे त्यांचे प्रत्येक गाणे अभ्यासपूर्ण असल्याचे सदोदित जाणवते.
‘जिवलगा’ चित्रपटाच्या वेळी मी लिहिलेली गाणी आशाताईंनी गायली. आपले शब्द आशाताईंनी गायले हा अनुभव अभूतपूर्व होताच. पण त्याच वेळी त्या काव्याकडे कसे बघतात, शब्दांचा अभ्यास कसा करतात, हे खूप जवळून बघता आले. ‘जिवलगाऽऽऽ’ हे गाणे रेकॉर्ड करण्याच्या आधी आशाताईंनी चित्रपटाच्या नायिकेला भेटायला बोलावले. तिला चार-पाच वेळा ‘जिवलगाऽऽऽ’ असे म्हणायला लावले. ते म्हणताना तिच्या ओठांच्या हालचालीचे सूक्ष्म निरीक्षण केले. तिच्या ओठांच्या हालचालीला शोभेल अशाच पद्धतीने ‘जिवलगाऽऽऽ’ म्हणण्याचा आशाताईंचा अट्टहास होता. चित्रिकरणात सूर आणि चेहऱ्यामध्ये विसंगती दिसू नये यासाठी त्यांनी एवढे कष्ट घेतले!
आशाताईंच्या संगीतकौशल्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे, पण त्यांच्या पाककलेविषयीही आवर्जून लिहावेसे वाटते. उत्तम स्वयंपाक जमणाऱ्या व्यक्तीला कलाकृतीही उत्तम जमते, असे माझे ठाम म्हणणे आहे. कारण स्वयंपाक हीसुद्धा एक कलाच आहे. आशाताई पाकललेबद्दल प्रचंड आसक्त आहेत. वेगवेगळ्या पाककृती तयार करणे हा त्यांचा छंद आहे. एका महान गायिकेचा पाककलेतील हातखंडा ही कौतुकास्पद बाब आहे. पण याविषयी नम्रतेने बोलताना त्या म्हणतात, “आजही परळच्या मसाला मार्केटमध्ये मी आवर्जून जाते. तिथली हळद, तिखट याचा दर्जा पाहते आणि खरेदी करते. तेव्हा मी गायिका आशा नसते, तर गृहिणी आशा असते.” बोलता बोलता स्वरयंत्रापाशी हात नेत म्हणाल्या, “ही एवढीच एक इंच ‘आशा’ गायिका आहे. इतर वेळी मी एक आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रसिकांची मी जवळची मैत्रीण आहे!” एका कलाकारासाठी हे भान अतिशय महत्त्वाचे असते.
कित्येकदा ही समजच कलाकाराला मोठं करते. म्हणूनच ‘आशाताई केवळ गायिका नाहीत’ हे विधान करावेसे वाटते. त्या तत्त्वचिंतक आहेत, साधक आहेत, योगिनी आहेत! संगीतक्षेत्रामधील देवदूत आहेत. आमच्या आयुष्यातील सांगितिक जीवनवाहिनी आहेत. त्यांच्या कारकिर्दीला आणि जीवनप्रवासाला लाख लाख शुभेच्छा!
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…