Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडी'तु वेडी आहेस' असे पत्नीला म्हणणे शिवीगाळ ठरत नाही

‘तु वेडी आहेस’ असे पत्नीला म्हणणे शिवीगाळ ठरत नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई : “तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस” असे एखाद्या पतीने आपल्या पत्नीला म्हणणे हे शिवीगाळ किंवा अपमानास्पद ठरत नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. एका जोडप्याच्या घटस्फोटाच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले. यावेळी पत्नीच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे पतीची बदनामी झाली, कुटुंबियांची प्रतिमा मलिन झाली, हा प्रकार एका पद्धतीने हिंदु विवाह कायद्यानुसार क्रूरताच ठरते, असा दावा करत न्यायालयाने पतीची घटस्फोटाची मागणीही मंजूर केली.

न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. “तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस” असं म्हणून पतीने आपल्याला शिवीगाळ केली, आपला अपमान केला. शिवाय, रात्री उशीरा बाहेर फिरायला न्यायला सांगितले म्हणून आपल्यावर ओरडला. आपला मानसिक आणि शारिरीक छळ केला, असे आरोप करत पत्नीने पतीविरोधात तक्रार दाखल केली होती, त्याआधारे पतीविरोधात गुन्हाही दाखल झाला होता.

मात्र पतीने उच्चारलेले वाक्य हे खूपच सामान्य आहे, महाराष्ट्रात मराठी कुटुंबिय कोणत्याही स्तरातील असो सर्वच मराठी घरांमध्ये हे वाक्य सर्रास बोलले जाते. अशा उच्चारांचा उद्देश जोपर्यंत एखाद्याचा अपमान किंवा शिवीगाळ करण्याचा होता, असे सिद्ध होत नाही तोपर्यंत असे वर्तन अपमानास्पद मानले जाऊ शकत नाही. त्यामुळे संदर्भ सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा न देता पतीने असे शब्द वापरून शिवीगाळ केल्याच्या आधारावर पत्नीने पतीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यास ती क्रूरता ठरते, असे न्यायालयाने म्हटले आहे.

यावेळी पतीने युक्तिवाद केला की, आपल्या पत्नीचे वर्तन हे क्रुरतेचे होते. पत्नीने बिनबुडाचे आरोप करून आपल्याविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्याचाही त्यांनी संदर्भ दिला. असे बिनबुडाचे आरोप करून आणि गुन्हा दाखल करून महिलेने समाजात आपली आणि कुटुंबाची प्रतिष्ठा कमी केली, ही तिची क्रूरता आहे. हा युक्तिवाद ग्राह्य धरत पत्नीने केलेले बेजबाबदार, खोटे आणि निराधार आरोप आणि पुराव्यांद्वारे ते सिद्ध करण्यात अयशस्वी होणे हे क्रौर्यच ठरते आणि ते पतीला घटस्फोट घेण्यासाठी पात्र ठरले, असा निष्कर्षही न्यायालयाने काढला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -