
विभाग, उपविभाग, तालुका, गाव या सर्वच पातळींवर बदल
मुंबई : राज्यात जिल्ह्यांच्या नामांतराची प्रक्रिया अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यात आले. मात्र, राज्यातील दोन शहरे औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Usmanabad) यांच्या नामांतराचा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. राज्य सरकारने (State Government) या दोन शहरांची नावे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि धाराशिव (Dharashiv) करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला काही प्रमाणात विरोध झाला. दरम्यान औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने याबद्दल काल रात्री नोटिफिकेशन काढलं आहे.
नामंतरासंदर्भात मुंबई हायकोर्टात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान अनेक आक्षेप आले होते. त्या आक्षेपांची पडताळणी झाली नसल्याने औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचं नामांतर फक्त शहरापुरतं झालं आहे, जिल्हा आणि तालुका पातळीवर कोणताही बदल झाला नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. मात्र, काल रात्री सरकारने नोटिफिकेशन काढून या दोन्ही जिल्ह्यांचं नामांतर 'छत्रपती संभाजीनगर' आणि 'धाराशिव' असं केलं आहे.
सरकारने काढलेल्या नोटिफिकेशननुसार, औरंगाबाद जिल्हा आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा तर उस्मानाबाद जिल्हा आता धाराशिव जिल्हा म्हणून ओळखला जाईल. याचसोबत औरंगाबाद विभाग, उपविभाग, तालुका, गाव छत्रपती संभाजीनगर विभाग, उपविभाग, तालुका, गाव नावाने ओळखले जाणार आहे. हाच बदल उस्मानाबादच्या बाबतीतही धाराशिव या नावाने असणार आहे.