संभाजी नगर : तब्बल सात वर्षांनी संभाजी नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत तब्बल ५९ हजार कोटींची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री या बैठकीत सहभागी होते.
या बैठकीतून मराठवाड्याला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद संपल्यावर याबाबत माहिती देताना सांगितले की, मराठवाड्यासाठी आज १४ हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पाबाबत निर्णय घेतला आहे. तसेच आजच्या बैठकीत एकूण ५९ हजार कोटींचा निर्णय झाला असून, त्यात नदीजोड प्रकल्पाच्या १४ हजार कोटींचा समावेश आहे.
आजच्या बैठकीबद्दल मोठी चर्चा सुरु होती. मराठवाड्याला न्याय देण्यासाठी आणि ठोस निर्णय घेण्यासाठी ही बैठक झाली. यापूर्वी देखील फडणवीस मुख्यमंत्री असताना ही बैठक झाली होती. राज्यातच नव्हे तर देशात मोठी झेप मराठवाड्याने घेतली आहे. अनेकजण म्हणतात फक्त घोषणा होतात. पण, आतापर्यंत आमच्या मंत्रीमंडळाने सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
बऱ्याच वर्षांनी मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. दरम्यान ही बैठक होऊच नाही यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. मागील बैठकीत आम्ही ३१ निर्णय घेतले होते. २०१७ मध्ये यातील १० विषय मार्गी लागले होते. तर आज घडीला यातील २३ विषय मार्गी लागले असून, ७ विषय प्रगतीपथावर असल्याचे फडणवीस म्हणाले. तर महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात काय केले? असा प्रश्न देखिल फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.