
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षाच्या मुलावर गंभीर गुन्हा
न्यूयॉर्क : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतातलं वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. त्यातच अमेरिकेतही (United States) अध्यक्षीय निवडणुकीच्या (Presidential election) प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यासमोर ऐन निवडणुकीच्या तोंडावर एक आव्हान उभं ठाकलं आहे. जो बायडेन यांचे सुपुत्र हंटर बायडेन (Hunter Biden) यांच्यावर बेकायदा शस्त्रखरेदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या निवडणुकीत त्यांच्या विरोधकांकडून या मुद्द्याचं भांडवल केलं जाण्याची शक्यता आहे.
हंटर बायडेन यांनी कोल्टा कोब्रा गन खरेदी केली होती. मात्र आपण बेकायदा अंमली पदार्थ घेत असल्याचं त्यांनी शस्त्रविक्रेत्यापासून लपवून शस्त्र मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे हा प्रकार २०१८च्या ऑक्टोबरमध्ये घडला होता, मात्र या प्रकरणी जवळजवळ पाच वर्षांच्या फरकाने निवडणुका जवळ आलेल्या असताना अमेरिकेच्या डेलवेअर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरू लागला आहे.
अमेरिकेतील एखाद्या राष्ट्राध्यक्षाच्या मुलावर अशा प्रकारे गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच गुन्हा दाखल झाल्याचं समोर आलं होतं. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर आधीच महाभियोग चौकशीची टांगती तलवार आहे. त्यातच आता त्यांच्या मुलावरही गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी त्यांच्यासमोर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारतीय वंशाचे रिपब्लिक पक्षाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांचं आव्हान आहे.