
कोरोनापेक्षाही खतरनाक आहे निपाह व्हायरस; सरकारने दिला धोक्याचा इशारा
आयसीएमआरकडून चिंता व्यक्त
नवी दिल्ली : निपाह व्हायरसमुळे देशाची चिंता वाढली आहे. दिवसागणिक निपाह व्हायरसचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. केरळच्या कोझिकोडमध्ये आणखी एक निपाह बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) निपाह व्हायरसबाबत चिंता व्यक्त केली आहे. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी सांगितले की, निपाह विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. राजीव बहल यांनी १५ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की, निपाह व्हायरसचा उद्रेक रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. आतापर्यंत केरळच्या कोझिकोडमधून निपाह व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. पहिल्या निपाह संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्याने इतरांना त्याची लागण झाली. निपाह संक्रमित रुग्णांमध्ये मृत्यूदर जास्त आहे, त्यामुळे ही चिंतेची बाब आहे.
निपाह व्हायरसमुळे मृत्यूचा धोका अधिक आहे. कारण, याचा मृत्यूदर ४० ते ७० टक्के आहे. हा मृत्यूदर कोविडच्या मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. कोविड रुग्णांचा मृत्यूदर २ ते ३ टक्के होता. शुक्रवारी केरळमध्ये सहाव्या रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे निपाह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
आरोग्य राज्यमंत्री कार्यालयाने शुक्रवारी सांगितलं की, ३९ वर्षीय पुरुषाला निपाह व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरु असून निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. ही व्यक्ती ३० ऑगस्ट रोजी संसर्गामुळे मरण पावलेल्या संक्रमित निपाह रुग्णाच्या थेट संपर्कात आली होती.
एका निवेदनात म्हटले आहे की त्या व्यक्तीने एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. कोझिकोडमध्ये निपाह संक्रमित रुग्णांची एकूण संख्या सहा झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, राज्य सरकारने संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणि ज्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे, अशा सर्वांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला.
केरळमध्ये २०१८ साली पहिल्यांदा निपाह व्हायरसचा संसर्ग लागण झाला होता. त्यावेळी १८ जणांना निपाहचा संसर्ग झाला होता. त्यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २०१९ आणि २०२१ मध्येही हा व्हायरस पसरला होता.