Friday, July 19, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यभावी जोडीदाराच्या आर्थिक संकल्पना

भावी जोडीदाराच्या आर्थिक संकल्पना

उदय पिंगळे: मुंबई ग्राहक पंचायत

एक काळ असा होता की, विवाह हे घरातील जाणकार व्यक्ती ठरवत असत, त्यामध्ये ज्याचा विवाह ठरवला होता, त्यांना कोणताही संमती पर्याय उपलब्ध नसे. काळानुरूप यात अनेक बदल झाले आहेत. परस्परांची संमती विचारली जाऊ लागली. आता त्याहीपुढे जाऊन विवाह करण्याऐवजी काहीजणांना लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्यायही हवाहवासा वाटत आहे. एखादी व्यक्ती आपण आपला भावी जोडीदार म्हणून पाहत असाल तर विवाहापूर्वी किंवा त्यासोबत लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी त्याला जाणून अधिक जाणून घेण्यासाठी त्याबरोबर आपला जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणं आता सर्वमान्य झालं आहे. अशा भेटीचा होणारा खर्च पुरुषाने करावा असा सर्वसाधारण संकेत असला तरी निश्चित काही ठरेपर्यंत ज्याने त्याने आपापला खर्च करावा (याला टीटीएमएम असे म्हणतात) किंवा केवळ स्त्रीनेच सर्व खर्च केला अशा स्वरूपाच्या अपवादात्मक घटनाही घडत आहेत.

प्रेमाच्या गोष्टी करताना खर्च तर होणारच. ती व्यक्ती आपली जोडीदार होईल न होईल पण वारंवार भेटत असताना यानिमित्ताने एकमेकांचे आर्थिक विचार जाणून घेणे आवश्यक आहे का? याचे उत्तर निश्चित हो असे आहे. भले तुम्ही लगेचच आपल्या जोडीदाराची स्वप्न ताबडतोब जाणू शकणार नाही. पण त्याची पैशाबाबतची मते नक्की हळूहळू जाणून घेऊ शकता. त्याच्या हाती येणारे उत्पन्न, घेतलेले कर्ज, पैसे खर्च करण्याची बचत करण्याची गुंतवणूक करण्याची पद्धत यावरून त्याच्या मासिक खर्चाचा अंदाज तुम्हाला बांधता येईल. जर तुम्ही अजूनही या विषयावर बोलला नसलात तर हीच वेळ आहे आपण या विषयावर एकमेकांशी बोलायला हवं.

जेव्हा तुम्ही आपल्या खास व्यक्तीस वारंवार भेटता तेव्हा त्यासाठी काहीतरी खर्च हा करावाच लागतो. यानंतर आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या येतील त्याचा आपल्या आर्थिक स्थितीवर बरावाईट परिमाण होणारच. याबाबत खुलेपणाने चर्चा केलीत, तर आपले उत्पन्न खर्च बचत करण्याची पद्धत माहिती झाल्याने एकमेकांची आर्थिक जाणीव समजण्यास मदत होईल. यासाठीच पाया पक्का करा, हाती येणारे उत्पन्न, घेतलेले कर्ज, खर्च करणे आणि शिल्लक ठेवणे या सवयी वेगवेगळ्या असू शकतील, मासिक खर्चाचे अंदाजपत्रक वेगवेगळे असू शकेल. त्याचा आपल्या संबंधावर काय इष्ट अनिष्ट परिणाम होतील हे जाणून त्याचा मध्यममार्ग निवडल्यास एकमेकातील संबंध सुदृढ राहू शकतील.

कोणतीही आर्थिक गोष्ट एकमेपासून लपवू नका, कर्ज असो किंवा गुंतवणूक आपण ती फार काळ लपवू शकणार नाही. कधीतरी ही घटना जोडीदाराला कळणारच. हे नंतर कुणाकडून तरी कळणे म्हणजे ती एक प्रकारची फसवणूकच आहे. त्याचा परिणाम जोडीदार दुरावण्यात होऊ शकतो. एकत्रित नियोजन करा – आपले आर्थिक भवितव्य सुदृढ करण्याचा एकत्रित नियोजन करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यामुळे याबाबत कोणताही पूर्वग्रह न बाळगता चर्चा करावी. मी करेन तेच खरं असा दृष्टिकोन न ठेवता आपलं म्हणणं योग्य कसं आहे हे जोडीदाराचा स्वाभिमान न दुखावता त्याला समजावून सांगता आलं पाहिजे. त्याचबरोबर जर जोडीदाराच्या क्षमतेविषयी जाणीव झाली तर त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायलाही काहीच हरकत नाही.

खर्च करण्याच्या पद्धतीतून आर्थिक सुसंगती जाणून घ्या – आपल्या खर्च करण्याच्या पद्धतीतूनच आपण पैशांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो याची खरी ओळख होते. एकत्र आल्यावर कदाचित सढळपणे खर्च करण्यावर मर्यादा येऊ शकतील, याची जाणीव ठेऊन खर्च करण्याच्या पद्धतीत आवश्यक ते बदल करण्याची तयारी असली पाहिजे. जाणकार व्हा – एकमेकांत विश्वास निर्माण होण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. तुमची आर्थिक धेय्यधोरणे जमणं महत्त्वाचे आहे. यातील कोणतीही घटना नकारात्मक घेऊ नये, तरच तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि पर्यायाने आनंदात राहू शकता.

शांत राहा समजून घ्या – जेव्हा आर्थिक विषयाचा प्रश्न येतो तेव्हा सावधगिरी बाळगा. या विषयावर चर्चेस सुरुवात करणं सोपं असलं तरी यावरील चर्चा ही नेहमीच समजून घेऊन शांतपणे होयला हवी.

विवाह करण्याचे ठरवल्यास – विवाहानंतर आवश्यक आणि शक्य असलेली सर्व खाती एकाच्या सहीने वापरता येतील अशी संयुक्त करून घ्या.
– पुरेसा टर्म इन्शुरन्स आणि आरोग्यविमा सर्व कुटुंबासाठी घ्या.
– एकमेकांना न सांगता मोठी खरेदी करू नका.
– आवश्यक तेथे नॉमिनी म्हणून जोडीदाराला ठेवा.
– आपले राहणीमान आणि आवड यावर एकत्रित चर्चा करा. मतभेद चर्चेने सोडवा, जोडीदाराच्या स्वाभिमानास धक्का लागणार नाही याची काळजी घ्या.

विवाहास पर्याय म्हणून लिव्ह इनमध्येच राहणे पसंत असल्यास
शक्यतो लिव्ह इन रिलेशनशिपचा करार करावा.
एकत्रित बचत खाते काढणे टाळावे, नियमित खर्च कोणी कसे करायचे ते ठरवावे.
– मालमत्ता संयुक्त नावे खरेदी करू नये.
– जोखीम रक्षणासाठी आवश्यक टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम घ्यावा. विमा कंपन्या रक्ताच्या नातेवाईक नवरा-बायको याशिवाय अन्य व्यक्तीस नॉमिनी म्हणून स्वीकार करत नाहीत.
– आपल्या निवृत्तीची योजना बनवा
– काही मालमत्ता जोडीदारासच मिळावी अशी अपेक्षा असल्यास मृत्यूपत्र बनवा. लग्न न झालेल्या जोडीदारास मालमत्ता मिळण्यात अडचणी आहेत. काही निर्णय संबंधित व्यक्ती किती वर्षे एकत्रितपणे राहत होत्या. त्याचा विचार करून न्यायालयाने दिले असले तरी ही प्रक्रिया सोपी नाही.
– अशी नाती दीर्घकाळ निभावणे हेच एक आव्हान आहे म्हणून प्रेम सुद्धा डोळसपणे करावे. एखादा मुलगा किंवा मुलगी आपल्याला आवडली तरी व्यावहारिक अडचणींचा विचार करावा त्यावर मार्ग काढावा आणि स्थिरस्थावर झाल्यावर अवश्य लग्न करावे.
आपले प्रेमप्रकरण आकार घेत असताना प्रेमाच्या गोष्टी करण्याऐवजी वैयक्तिक आर्थिक विषयांवर चर्चा करणं हा खरंतर अत्यंत नाजूक विषय आहे. पैसा नाती निर्माण करू शकतो किंवा तोडण्यासाठी कारणीभूत होऊ शकत असल्याने तुमच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. पैसा साध्य नसून साधन असल्यामुळे याविषयी तुमचे विचार स्पष्ट आणि पारदर्शक असतील, तर एक टिकाऊ नातं त्यातून निर्माण होऊ शकेल.

mgpshikshan@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -