शिवकुमार आडे
आधुनिक भारतीय जडणघडणीमध्ये व अभियांत्रिकी क्षेत्रात कामाचा ठसा उमटविणारे भारतरत्न सर विश्वेश्वरैया यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यांनी केलेले कार्य याबाबत पाहिजे तशी माहिती अभियांत्रिकी क्षेत्रात व सार्वजनिक क्षेत्रात पोहोचली नाही. एक उत्तम प्रशासक, दूरदृष्टी असलेला उद्योगपती, उद्योगाला लागणारा अर्थ पुरवठा याबाबत सखोल चिंतन करणारा अर्थतज्ज्ञ, राष्ट्राला शिक्षणाची गरज समजावून घेणारा शिक्षणतज्ज्ञ, लोकभाषामधून जगण्याचे ज्ञान देण्यासाठी सांगणारा विचारवंत, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हाताळण्यासाठी लोकाभिमुख प्रयोग करून सिंचनाची सुविधा निर्माण करणारा कृषितज्ज्ञ. देशाच्या विकासाची नाळ ओळखून मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी अहोरात्र झटणारा एक महान अभियंता. असे अनेक पैलू एकाच माणसात दडलेले सर विश्वेश्वरैया!
अशा या महान अभियंत्याचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी म्हैसूर राज्यातील मुद्देनहळी इथे झाला. त्यांचे वडील श्रीनिवास शास्त्री व आई व्यंकटलक्ष्मी आंध्र प्रदेशात कर्नल जिल्ह्यातील मोक्षगुंडममध्ये वास्तव्याला होते. त्यांचा व्यवसाय ज्योतिषाचा होता; परंतु कालांतराने म्हैसूर राज्यात मुद्देनहळी इथे स्थलांतर झाले. सर तेरा वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले, त्यामुळे त्यांच्या मामाने शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांचे प्राथमिक शिक्षण विल्सन हायस्कूल बंगलोर येथे झाले. बुद्धीने तल्लख असल्यामुळे ते प्रावीण्यासहित पास झाले होते. हायस्कूलच्या शिक्षणानंतर त्यांनी सेंट्रल कॉलेजमध्ये प्रा. चार्ल्स वॉटर्स यांच्या शिफारसपत्राच्या आधारे प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर कष्टाळू वृत्तीने, बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगल्या वाचण्याच्या सवयीमुळे ते वॉटर्स सरांचे आवडते विद्यार्थी बनले.
सन १८८१ मध्ये त्यांनी बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर पुढे काय करावे. याबाबत प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यांना अभियंता व्हायचे होते; परंतु म्हैसूर राज्यात कुठे अभियांत्रिकी महाविद्यालय नव्हते. घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे ते शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकत नव्हते. म्हैसूर राज्याचे दिवाण श्री रंगाचारू यांनी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली होती. प्राचार्य वॉटर्स यांनी शिफारसपत्र दिवाणला देऊन सरांच्या शिक्षणाची दारे मोकळी केली. मुंबई विद्यापीठातील पुणे येथील कॉलेज ऑफ सायन्स (आताचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग) मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. या शिक्षणाच्या कालखंडात त्यांना पुण्याची अर्थात महाराष्ट्राची मराठी भाषा बोलता वाचता येत नव्हती. ती त्यांनी आत्मसात करून शिकून घेतली. यादरम्यान त्यांना व्याख्यानमालेचा छंद जडला. पुणे राजकीय चळवळीने ढवळून निघाले होते. न्या. रानडे, न्या. गोखले, लो, टिळक, आगरकर, भांडारकर यांच्या व्याख्यानाला ते आवर्जून उपस्थित राहत. त्यामुळे या मान्यवरांची ओळख झाली. या माध्यमातून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा त्यांचा अभ्यास झाला. तसेच भारतातील राजकीय, सामाजिक चळवळीविषयक जाणिव त्यांच्यामध्ये निर्माण झाली.
कॉलेज ऑफ सायन्समधून त्यांनी आपले इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यावेळेस त्यांना “जेम्स बर्कले” पारितोषक मिळाले होते. कॉलेजच्या अंतिम वर्षाला असताना त्यांची सहाय्यक अभियंता म्हणून निवड करण्यात आली. या पदावर सन १८८४ मध्ये नाशिक विभागातील धुळेच्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयात ते रूजू झाले. धुळे शहराच्या अवतीभोवती असणारा भाग दुष्काळी होता; परंतु धुळेपासून काही अंतरावर डोंगराळ भाग असल्यामुळे पाण्याचा साठा तयार करण्यात आला. ‘ब्लॉक सिस्टम’ ही शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची पद्धत विकसित करण्याचे भरीव काम केले. त्यामूळे ३०% पाणी शेतीला मिळाले. आजही सहकारी तत्त्वावर ही पद्धत चालू आहे. पुढे स्वकर्तृत्वाने ते कार्यकारी अभियंता व अधिक्षक अभियंता झाले. त्या काळी मुंबई राज्यात मुख्य अभियंताच्या जागी फक्त इंग्रज अभियंत्याची नेमणूक होत असे. या कारणामुळे त्यांनी सन १९०८ मध्ये नोकरीचा राजीनामा दिला.
स्वयंचलित दरवाजे या सिस्टिमचे जनक डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा वाटतो. पुण्याच्या खडकवासला धरणावर त्यांनी हा पहिला प्रयोग केला. धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी व त्याला नियंत्रित करण्यासाठी स्वयंचलित दरवाजे ही प्रणाली विकसित केली. याचा उपयोग कृष्णराजसागर व तिगरा धरणावर (मध्य प्रदेश) करण्यात आला आहे. या कार्याचा गौरव देशभर झाला, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा दबदबा संपूर्ण भारतभर झाला होता. हैद्राबादमध्ये त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. हैद्राबाद शहर मुसा नदीवर वसलेले आहे. सन १९०८ मध्ये मुसा नदीला प्रचंड पूर आला. या पुरात ३ कोटींची मालमत्ता नष्ट झाली. १५००० लोक मेले होते व काही लोक पुरात वाहून गेले होते, तर काही बेपत्ता झाले. ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्याकरिता हैदराबादचे दिवाण मि. अकबर अहमदी यांनी सरांना मुख्य अभियंता पदावर रूजू होण्यासाठी कळविले. ते मान्य करून मुख्य अभियंतापदाचा कार्यभार स्विकारला. त्यांनी मुसा नदीचे पाणी अडवून तलावाची निर्मिती केली. हैद्राबाद आणि सिकंदराबाद या शहराकरिता सांडपाण्याचा निचरा (ड्रेनेज ) करण्याची योजना आखली व ती पूर्ण केली. तलावामुळे हैदराबाद व सिकंदराबादमध्ये बागबगीचे तयार करण्यात आले. शेतीला पाणीपुरवठा करण्यात आला.
हैदराबादचे मुख्य अभियंतापद सोडल्यानंतर म्हैसूरचे राजे कृष्णराज वडियार व टी. आनंदराव यांच्या आग्रहामुळे सरांनी १५ नोव्हेंबर १९०९ मध्ये म्हैसूरचे मुख्य अभियंत्याचे पद स्विकारले. या पदावर रूजू होताच म्हैसूर राज्याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. कोलार येथे सोन्याची खान ब्रिटिश कंपनीतर्फे चालविण्यात येत असे; परंतु तिथे विजेचा पुरवठा कमी होता. त्यामुळे उत्पादन क्षमता कमी होती. उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी विजेची गरज आहे, हे लक्षात येतातच मोठे धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. कावेरी नदीवर म्हैसूर शहराजवळ कृष्णराजसागर धरण बांधले. त्यामुळे धरणाचा उपयोग कोलार येथील सोन्याची खाण चालविण्यासाठी झालाच; परंतु शेतीच्या सिंचनाकरिता मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले.
म्हैसूर संस्थान इतर भूप्रदेशाने वेढलेले संस्थान आहे. स्वतःच्या मालकीचे बंदर असावे, असे त्यांना वाटत होते. कारण, राज्यात निर्माण होणारे पोलाद, लोखंड, कोलार खाणीतून मिळणारे सोने परदेशात पोहचवायचे असेल, तर बंदराची आवश्यकता होती. भटकळ बंदराचे नियोजन व आराखडा तयार केला. काही कारणास्तव ते त्यावेळेस बांधता आले नाही; परंतु सन १९२६ मध्ये हे बंदर पूर्ण करण्यात आले. म्हैसूर राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल सरांनी उचलले होते. त्यांनी मूलभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. ज्या राज्यात दळणवळणाची साधने उपलब्ध नाही, ते राज्य प्रगती करू शकत नाही. रस्त्याची कामे योग्य तऱ्हेनी हाताळली जावी, याकरिता त्यांनी नियमावली बनवली. नियमावलीप्रमाणे म्हैसूर राज्याचे रस्ते तयार करण्यात आले. सन १९९२मध्ये टी. आनंदराव यांनी दिवाणपदावर सरांची नियुक्ती केली. साधारण कुटुंबात, एका खेड्यात जन्मलेला मुलगा आपल्या ज्ञानाच्या बळावर व प्रशासकीय पात्रतेच्या जोरावर म्हैसूर राज्याच्या दिवाणपदावर विराजमान झाले. कदाचित ही पहिली घटना जगभरातील असावी की, एक अभियंता दिवाणपदावर (पंतप्रधान) विराजमान झालेला असावा. या पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांनी काही महत्त्वपूर्ण कामे केली आहे ती कामे अधोरेखित करण्यासारखी आहेत.
भाषा संवाद साधनेचे माध्यम असले तरी ती राष्ट्राच्या प्रगतीचे एक माध्यम आहे. आपल्या बोलीभाषेमधून लोकांपर्यंत पोहोचून त्यांना देशाच्या प्रगतीत सामील करून घेणे महत्त्वाचे असते, हे सरांनी ओळखून इंग्रजीमधून व्यवहार चालत होता, तो आपल्या भाषेत मांडण्यासाठी पहिला प्रयोग केला. अंदाजपत्रक त्यांनी कन्नड भाषेत छापून प्रती उपलब्ध करून दिल्या. सन १९१२-१३ ला कन्नड भाषेचा राजदरबारात वापर सुरू करण्याची परवानगी दिली. त्यामुळे स्थानिक भाषेला महत्त्वाचे स्थान मिळाले. प्रशासन चालविण्यासाठी व काही सुधारणा करण्यासाठी होतकरू व हुशार तथा कार्यक्षम अधिकाऱ्याची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी स्पर्धा परीक्षा सुरू केल्या. म्हैसूर सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेला अधिक कार्याभिमूख केले. अधिकाऱ्यासाठी ध्येय-धोरणे ठरविणारी मार्गदर्शक तत्त्वे निर्माण करण्याचे कार्य केले.
गावांतील प्रश्न गावातच सुटले पाहिजे. गांवाचा विकास त्यामधूनच घडविता येईल, याकरिता लोकल बोर्डाना बैठक घेऊन चर्चा करणे व निर्णय घेण्याचे अधिकार दिले. म्हैसूर राज्यात ग्रामपंचायतीची स्थापना केली. गावातील मूलभूत सुविधेला चालना दिली. गावाला वीजपुरवठा करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. शहरांच्या विकासाकरिता त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. शहरांचा आराखडा मुख्य अभियंता असताना तयार केला. शहरातील सांडपाणी, दिवाबत्ती, वाहतूक व इतरत्र सेवा योग्य पद्धतीने हाताळण्याकरिता नियम केले. शहराबाहेर रिंगरोड असावा, जेणेकरून बाहेरील वाहतूक नियंत्रित करता येईल यासाठी नियोजन केले. शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी केली. शिक्षण म्हणजे केवळ पोटभरण्याचे साधन असू शकत नाही. गावांच्या तथा राष्ट्राच्या उभारणीसाठी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता शिक्षणाची गरज आहे हा विचार जनसामान्यापर्यंत रुजविण्यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहित केले. १ जूलै १९१६ ला म्हैसूरमध्ये भारतातील पहिले विद्यापिठ सुरू करण्याचा मान सरांना जातो. सरांनी कन्नड साहित्य परिषदेची स्थापना केली बंगलोर, म्हैसूरमध्ये वाचनालये उभारली. शेतकऱ्यांसाठी शेतीबद्दलचे आधूनिक ज्ञान अवगत करण्यासाठी शेतकी शाळा काढल्या. भद्रावतीला ‘भद्रावती ऑयर्न ॲण्ड स्टिल फॅक्टरी’ उघडण्याचे महत्त्वाचे कार्य केले. यामध्ये प्रचंड प्रमाणात रोजगार निर्माण करण्यात आला. पोलाद व लोखंडाचे उत्पादन तयार करण्यात आले. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर सन १९६०मध्ये याच फॅक्टरीचे ‘विश्वेश्वरैया आयर्न ॲण्ड स्टिल इंडस्ट्री’ असे नामकरण करण्यात आले.
नैसर्गिक आपत्ती आल्यास विद्युत निर्मितीचा दुसरा टप्पा शिवसमुद्रम येथे सुरू केला. जोग धबधब्यावर वीजनिर्मिती सुरू केली. शेतीवरील अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी उद्योगधंद्याकरिता प्रोत्साहित केले. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी व मेंढी पालन व्यवसाय स्वतःच्या क्षमतेवर करण्यासाठी सांगितले. समूहातून व्यवसाय निर्माण करण्यासाठी सहकार तत्त्वाची जोड देऊन रेशमाच्या किड्याचे उत्पादन तयार करणे, त्यामधून रेशीम निर्मिती करणे. मधमाशी पालन करून मध निर्माण करणे, दुधाच्या व्यवसायामधून दूध डेअरी निर्माण करणे यावर त्यांनी भर दिला. या उद्योगातून येणाऱ्या पैशांवर मोठे उद्योग निर्माण करण्यासाठी म्हैसूर राज्यात रेशम निर्मितीचे कारखाने काढले. रेशमी साड्या तयार करण्यासाठी कारखान्याचा विकास केला. चंदनाच्या झाडापासून चंदनाचे तेल काढण्यासाठी कारखाने राज्यात काढले. चंदनाचे साबण तयार करण्याचे कारखाने उभारले. एकेकाळी ‘म्हैसूर सॅण्डल सोफ’ फार मोठ्या प्रमाणात विकले जाणारे साबण होते. विमान उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बंगलोरमध्ये सन १९४०ला ३००० विमाने २०,००० बॉम्बर्स बनविण्याची योजना सुरू करण्यात आली; परंतु ब्रिटिश शासनाने कारखाना ताब्यात घेतला व राष्ट्रीयीकरण केले.
स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर भारत सरकारने राष्ट्रीयीकरणातून संस्थान क्षेत्रात सुरू केलेला हा पहिला मोठा उद्योग ठरला. सरांनी उद्योगासंदर्भातील माहिती सर्वत्र रुजली पाहिजे, याकरिता इंडस्ट्रियल म्यूझियम उभारले. जिल्हा पातळीवर उद्योग केंद्र उभारले. दिवाणपदावरून मुक्त झाल्यानंतर त्यांनी लिखाणावर भर दिला. रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया, प्लॅन्ड इकानॉमी फॉर इंडिया, मेमरीज ऑफ वर्किंग लाइफ ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. पंचवार्षिक योजनेची कल्पना जगात त्यांनी पहिल्यांदा मांडली. त्यांच्या या महान कार्याबद्दल ऑनर पदव्या देऊन त्यांना भूषविण्यात आले. गौरवशाली भारताचे स्वप्न पाहणाऱ्या या महामेरू अभियंत्याला भारत सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित केले. कदाचित सर विश्वेश्वरैया हे पहिले अभियंते असतील की, ज्यांच्या वयाला शंभर वर्ष झाल्यानंतर भारतभर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वृद्धापकाळाने १४ एप्रिल १९६२ मध्ये या महान व्यक्तीचे निधन झाले. अशा द्रष्ट्या अभियंत्याला शतशः कोटी कोटी प्रणाम!
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…