Monday, July 1, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखएसटीचे आंदोलन मागे; गणपती बाप्पा पावला

एसटीचे आंदोलन मागे; गणपती बाप्पा पावला

श्रीगणरायाचे आगमन येत्या १९ सप्टेंबर रोजी होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळही तयारीला लागले होते. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा १४ ते १९ सप्टेंबर दरम्यान तीन हजारांपेक्षा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी १७०० बसेसचे गट आरक्षण पूर्ण झाले आहे. आवश्यक वाटल्यास आणखी काही गाड्या सोडण्याची तयारी एसटी महामंडळाने दाखवली आहे. या जादा बसेस मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत. मात्र एका बाजूला एसटी महामंडळाकडून इतर डेपोतील गाड्या कोकणाकडे कशा वळविल्या जातील, याचा विचार केला जात असताना, राज्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनेकडून सोमवारपासून एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी संघटनेकडून राज्य सरकारला दोन दिवसांचे अल्टिमेटम देखील दिले होते. मात्र त्यापूर्वीच एसटी कामगार संघटनेकडून तूर्त आंदोलन मागे घेण्यात आल्यामुळे विशेषत: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी निश्वास सोडला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांची सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा दर ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली होती. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर ९ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. तरीही कर्मचारी संघटनेच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, त्यात काहीही नवीन नाही, असा पवित्रा घेत आझाद मैदानात एसटीतील कर्मचारी उपोषणाला बसले होते.

जालना येथील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठाम भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्यामुळे सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्यभर त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे ऐन गणेशोत्सव काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यास सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले असते. मात्र राज्य सरकारने या प्रश्नांवर गांभीर्याने भूमिका घेत, कर्मचारी संघटनेशी सकारात्मक चर्चा केली. मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठकीत झालेल्या निर्णयानुसार एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के देण्यात येईल, असा निर्णय झाला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांची जी थकबाकी आहे, त्यासंदर्भात १५ दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता आणि आर्थिक देणीबाबत समिती नेमून ६० दिवसांत अहवाल देण्याचे सरकारने मान्य केले आहे. एसटी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना तसेच सेवानिवृत्त कामगार व पत्नीस सर्व प्रकारच्या बसमध्ये कुठलाही फरक न आकारता मोफत पास देण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या संचालक मंडळांपुढे सादर करावा, या मागण्या मान्य झाल्याने आपले उपोषण आंदोलन स्थगित करत आहोत, असे संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी जाहीर केल्याने राज्यातील सर्वसामान्य एसटी प्रवासी एका अर्थाने खूश झाला आहे. एक वर्षांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण घेण्याच्या मागणीच्या मुद्द्यावरून ५४ दिवसांपेक्षा अधिक काळ संप केला होता. हा संप मिटविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला होता.

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत ठरावीक मुदतीत पूर्ण करू, असे आश्वासन दिले होते. तसेच जे कर्मचारी कामावर रुजू होणार आहेत, त्यांच्यावर कारवाई करू नये, असेही निर्देश खंडपीठाने महामंडळाला दिले. मात्र खूप दिवस चाललेल्या या संपाची दाहकता ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेने सहन केली. एसटीच्या संपामुळे खासगी वाहनांकडून प्रवाशांची लुटमार होत होती. सवलतीच्या तिकिटावर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. राज्य सरकारकडून एसटीमध्ये महिलांना ५० टक्के तिकिटांची सवलत जाहीर करण्यात आल्यानंतर एसटीमधील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे गौरी-गणपतीच्या सणात एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनेने गणेशभक्त आणि सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी तूर्त आंदोलन मागे घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो खरोखरंच स्वागतार्ह आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -