मुंबई: सनी देओलच्या ‘गदर २’ नंतर आता बॉक्स ऑफिसवर सध्या शाहरूख खानच्या (shah rukh khan) ‘जवान’चा बोलबाला आहे. जवान या सिनेमाने सहा दिवसांत वर्ल्ड वाईड तब्बल ६०० कोटींची कमाई केली आहे.
जवानच्या या ब्लॉकबस्टर यशानंतर शाहरूख खानसह सिनेनिर्माता, दिग्दर्शक यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. spotboye च्या रिपोर्टनुसार जवानच्या यशानंतर शाहरूखने आपल्या मानधनात वाढ केली आहे. त्याने हे मानधन वाढवून १०० कोटी इतके केले आहे.
आपल्या आगामी डंकी या सिनेमासाठी तो ६० टक्के नफ्यासह १०० कोटी रूपये इतके मानधन घेणार आहे. दरम्यान याबाबत अद्याप सिनेनिर्माता तसेच किंग खानकडून कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.
डंकी सिनेमाबाबत बोलायचे झाल्यास या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. या सिनेमात शाहरूखसोबत तापसी पन्नू दिसणार आहे. डंकी हा सिनेमा या वर्षी २२ डिसेंबरला रिलीज होत आहे. या सिनेमाची निर्मिती गौरी खान करत आहे. आधी पठाण, नंतर जवान आणि त्यानंतर आता डंकीची प्रतीक्षा शाहरूखच्या चाहत्यांना आहे.