
चतुर्थीच्या सणाक रव्हले फक्त दोन दिवस
गणेशोत्सव म्हटलं की चाकरमान्यांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. पटापटा रजा टाकून गावच्या बॅगा भरल्या जातात. कोकणात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु होते आणि मुंबईत असलेल्या आपल्या नातेवाईकांची अख्खं कोकण आतुरतेने वाट पाहू लागतं. गावच्या ओढीने मुंबईत चाकरमानीही अस्वस्थ झालेला असतो. मात्र, या चाकरमान्यांच्या अस्वस्थतेत भर टाकण्याचीच कामे केली जातात. याचे कारण म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरुन जाण्यासाठी देण्यात येणारे टोलमाफीचे पासेस अजून दिलेले नाहीत. त्यामुळे आता जायचे कधी, तयारी कधी करायची आणि खर्च कसा सांभाळायचा या सर्वच गोष्टींमुळे चाकरमानी पार वैतागून गेला आहे.
मुंबई गोवा महामार्गाची दुर्दशा आता नव्याने सांगायची गरजच नाही. अनेकदा बांधकाम मंत्र्यांनी पाहणी केल्यावरही गणेशोत्सवाच्या आधी महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षीही कोकणात जाताना महामार्गावरील खड्ड्यांमुळे चाकरमान्यांची पाठ, मान आणि कंबर चांगलीच मोडणार आहे. आता हे दुखणं कमी होतं की काय म्हणून आता टोलमाफीसाठी दिेले जाणारे पासेसही अजून मिळालेले नाहीत.
पोलिसांना या पासेसबाबत विचारले असता आम्हाला कोणतेही आदेश आलेले नाहीत, त्यामुळे काही सांगू शकत नाही अशी उत्तरे मिळत आहेत. गणेशोत्सवाला अवघे दोनच दिवस राहिलेले असताना आता चाकरमान्यांनी टोलमाफीचे पासेस आणायचे तरी कुठून आणि कसे? कोकणात जाणार्या रेल्वेही फुल्ल झाल्या आहेत. विमानसेवेतही अनेक अडचणी निर्माण झाल्याने ती बंद झाली आहे. त्यामुळे आता रस्तेमार्गाशिवाय पर्याय नाही. अनेकजण खाजगी वाहनांनी कोल्हापूरमार्गे गावी जाण्याचा बेत आखत आहेत, मात्र टोलनाक्यांवर प्रचंड टोल आकारला जातो, यावेळेस गरजेचे असणारे टोलमाफीचे पासेस कधी मिळणार या चिंतेने कोकणवासी मुंबईकर ग्रासला आहे. त्याच्या या चिंता लवकरात लवकर पळान जाऊ देत आणि त्याका तुज्या दर्शनाक कोकणात येऊक मिळान दे रे म्हाराजा!