ओदिशा : बॉलिवूडचा सदाबहार, लोकप्रिय अभिनेता गोविंदाची १००० कोटींच्या एका घोटाळ्यात चौकशी होणार आहे. ओदिशा आर्थिक गुन्हे शाखा (EOW) ने १३ सप्टेंबरला सांगितले की, ते भारतातील १००० कोटी रुपयांच्या ऑनलाइन पोंझी घोटाळ्या संदर्भात गोविंदाची चौकशी करतील.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक देशांमध्ये ऑनलाइन उपस्थिती असलेली सोलर टेक्नो अलायन्स (STA-Token) बेकायदेशीरपणे क्रिप्टो गुंतवणुकीत घोटाळा करत असल्याचे उघड झाले आहे.
गोविंदाने काही प्रमोशनल व्हिडिओंमध्ये क्रिप्टो-पोंझी कंपनीच्या ऑपरेशन्सचे समर्थन केले होते.
ईओडब्ल्यूचे महानिरीक्षक जे एन पंकज यांनी सांगितले की, "जुलैमध्ये गोव्यात सोलर टेक्नो अलायन्सच्या भव्य समारंभात सहभागी झालेल्या आणि काही व्हिडिओंमध्ये कंपनीची जाहिरात करणाऱ्या फिल्मस्टार गोविंदाची चौकशी करण्यासाठी आम्ही लवकरच एक टीम मुंबईला पाठवू."
गोविंदा या प्रकरणात संशयित किंवा आरोपी नाही. गोविंदाची नेमकी भूमिका तपासानंतरच स्पष्ट होईल. जर आम्हाला आढळले की त्यांची भूमिका त्यांच्या व्यावसायिक करारानुसार केवळ उत्पादनाच्या (STAToken ब्रँड) समर्थनापुरती मर्यादित होती, तर आम्ही त्याला आमच्या खटल्यात सरकारी साक्षीदार बनवू, असे अधिकारी पंकज म्हणाले.
भद्रक, केओंझार, बालासोर, मयूरभंज आणि भुवनेश्वरमधील दहा हजार लोकांकडून या कंपनीने ३० कोटी रुपये गोळा केले. त्यामुळे आता या प्रकरणाला कोणते वळण येणार हे पाहायचे आहे.