Wednesday, July 3, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीRighteous man : सत्पुरुषाची लक्षणे

Righteous man : सत्पुरुषाची लक्षणे

  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो मनुष्य चांगला; असा मनुष्य अजरामर होतो. तो नि:स्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो. स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडविण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून होणेच शक्य नाही. असा सत्पुरुष म्हाताऱ्याला म्हातारा, पुरुषाला पुरुष, बाईला बाई, मुलाला मुलासारखा दिसतो; म्हणजेच, जो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचे त्याच्याशी वर्तन असते. असा मनुष्य कोणाविषयी काही निंदा किंवा स्तुती बोलत नाही. मान घ्यायला योग्य असूनही मानाची अपेक्षा तो करीत नाही. स्वत:च्या विकारांवर त्याचा पूर्ण ताबा असतो आणि दुसऱ्यांच्या दु:खात तो त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करीत असतो. तो सहजावस्थेत राहतो; म्हणजेच उपाधीमुळे बांधला जात नाही. असा योगी मनुष्य खरोखरच मुक्त समजावा. अशा लोकांनाच संत म्हणतात आणि ते जी जी कर्मे करतात, ती ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे, त्या कर्मांच्यापासून जगाचे कल्याण घडते. संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, नि:स्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील.

अंतरंग ओळखायला स्वत:पासून सुरुवात करावी. माझे चुकते कुठे हे पाहावे. दु:ख भोगण्याची मला पाळी आली, म्हणजे मार्ग चुकला म्हणावे. ज्याला सुखदु:ख बाधत नाही तोच खरा समाधानी. ‘मी रोज नामस्मरण करतो, चार वर्षे माझे भजन नाही चुकले’, असे आपण म्हणतो; पण ‘मी हे सर्व करतो’ अशी सारखी आठवण ठेवली, तर काय उपयोग? मी मेहनत घेतो पण थोडक्यात नासते, ते या अभिमानामुळे. जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचे स्मरण मी करीत नाही तोपर्यंत ते ‘स्मरण’ कसे म्हणावे ? भगवंताशिवाय इतर जाणीव ठेवून, मी त्याच्याशी अनन्यपणे वागतो असे कसे म्हणता येईल? मी तुम्हाला खरेच सांगतो, तुम्ही रामाकडे कर्तेपण द्या आणि त्याच्या इच्छेने वागा, तुमची देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. खुणेने जावे, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे, म्हणजे मार्ग सापडतो. खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. आणि खरी कळकळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण होते. ‘भगवंताने माझी आपत्ती दूर करावी’, हे म्हणणे वेडेपणाचेच आहे.

संकटे, आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरणे हे केव्हाही योग्य नाही. देहबुद्धीचा नाश नामाच्या स्मरणात आहे खास! नामात प्रेम येत नाही याचा विचार करीत राहिलो तर नामाचाच विसर पडतो, हे कुठे ध्यानात येते! उगीच विचार करीत नाही बसू. समुद्र ओलांडून जाण्याकरिता रामाचे नाव घेऊन जी वीट ठेवली ती राहिली, हे लक्षात ठेवा. चमत्कार करणे हे संतलक्षण नव्हे, संत चमत्कार दाखवावा म्हणून चमत्कार करीत नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -