Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीSambhaji Bhide : संभाजी भिडे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी गावात...

Sambhaji Bhide : संभाजी भिडे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी गावात…

जरांगेंचा हात हातात घेतला आणि काय म्हणाले भिडे?

जालना : मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे. काल सर्वपक्षीय बैठक होऊनही त्यातील निर्णयावर मनोज जरांगेंचं (Manoj Jaranage) समाधान झालेलं नाही. आज त्यांच्या उपोषणाचा पंधरावा दिवस आहे. मनोज यांना भेटण्यासाठी अनेक लोकांच्या रांगा लागत आहेत. आज शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी देखील मनोज जरांगेंची अंतरवाली सराटी गावात जाऊन भेट घेतली. भिडेंनी यावेळेस मराठा आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शवला.

संभाजी भिडे यांनी जरांगेंचा हात हातात घेऊन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. भिडे म्हणाले, मनोज जे उपोषण करत आहेत, ते कौतुकास्पद, अभिमानास्पद आणि स्तुत्य आहे. त्यांच्या उपोषणाला आज ना उद्या १०१ टक्के यश येणार याबद्दल दुमत नाही. याचा निर्णय राज्य सरकारवर अवलंबून असला तरी मला विश्वास आहे की, राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ही तिन्ही मंडळी धुरंधर आहेत. मनोज जरांगे यांना जे हवंय ते घडवल्याशिवाय ते थांबणार नाहीत.

पुढे एका अभंगाचे उदाहरण देत भिडे म्हणाले, ‘मातेचिये चित्ती ।अवघी बाळकाची व्याप्ति ॥ देह विसरे आपुला । जवळीं घेतां सीण गेला ॥ दावी प्रेमभातें। आणि अंगावरि चढतें ॥ तुका संतापुढें । पायीं झोंबे लाडें कोडें॥’ काया, वाचा, मनाने मनोजदादा जे करत आहेत ते स्तुत्य आहे. लवकरात लवकर याला यश येण्यासाठी, जे पाहिजे तसं करुन घेण्याची जबाबदारी मनोजदादांनी माझ्यावर टाकली आहे. त्यामुळे जीवाचा आकांत करुन आम्ही मनोजदादांच्या बरोबर आहोत. याचा शेवट मराठा समाजाला आरक्षण मिळण्यातच झाला पाहिजे.

भिडेंनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन करताना म्हटले, मनोजदादांनी मोठा लढा उभारला आहे. हवं ते मिळवून देण्याची जबाबदारी मला द्यावी. सरकारमधील तिन्ही नेते आपल्या शब्दाशी प्रामाणिक राहतील. त्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती संभाजी भिडे यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -