
अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत
लखनऊ : राज्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असला तरी तो नियमित नाही. काही जिल्ह्यांत अजूनही पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. एकीकडे राज्यात अशी परिस्थिती असताना उत्तर प्रदेशात मात्र पावसाने (Uttar Pradesh rain) हाहाकार माजवला आहे. उत्तर प्रदेशच्या मध्यवर्ती भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने काही ठिकाणी शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत अतिपावसामुळे १९ जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील बहुतांश भागात संततधार पावसाने (Rain) नागरिकांना उष्णतेपासून दिलासा दिला असतानाच काही ठिकाणी मुसळधार पावसाने कहर केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या २४ तासांत सरासरी ३१.८ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा ६.४ मिमी आणि ४९७ टक्के जास्त आहे. राज्यात १ जून २०२३ पासून आतापर्यंत ५७७.४ मिमी पाऊस झाला आहे. सरासरी ६६५.२ मिमी पाऊस पडला, जो सामान्य पावसापेक्षा जास्त होता. गेल्या २४ तासांत उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये ३० मिमी आणि त्याहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, कोणतीही नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत नसल्याचे सांगण्यात आले आहे. १० जिल्ह्यातील १६८ गावांना पुराचा फटका बसला आहे.
राजधानी लखनऊमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील घरं पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याने रस्त्याचंही नुकसान झालं आहे. नाले तुंबल्याने रस्ते पूर्णपणे पाण्याने भरुन गेले आहेत आणि वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्याने रेल्वे सेवा देखील ठप्प आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान होत आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात १५ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नंतर १७ सप्टेंबरपर्यंत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा फटका?
अतिवृष्टीमुळे राज्यातील १० जिल्ह्यांतील १९ तालुक्यांना पुराचा तडाखा बसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. राजधानी लखनऊसह बरेली, कानपूर, शाहजहांपूर, फतेहपूर, सीतापूर, लखीमपूर खेरी, फारुखाबाद, फिरोजाबाद, बाराबंकी, हाथरस, रामपूर, कन्नौज, संभल, बिजनौर आणि मुरादाबाद या जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. यामुळे आतापर्यंत १९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हरदोईमध्ये चार, बाराबंकीमध्ये तीन, प्रतापगड आणि कन्नौजमध्ये प्रत्येकी दोन आणि अमेठी, देवरिया, जालौन, कानपूर, उन्नाव, संभल, रामपूर आणि मुझफ्फरनगर जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
बचावकार्य सुरु
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) पथकांकडून अनेक गावांत बचावकार्य सुरू आहे. लोकांना दिलासा देण्यासाठी एकूण ६९ हजार ६७४ रेशन किट, ४ लाख ४८ हजार ६७० जेवणाची पाकिटे आणि ३ हजार १५० डिग्निटी किटचे वाटप करण्यात आले आहे. यासोबतच गुरांसाठी चारा आणि लसीकरण करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.