सेवाव्रती: शिबानी जोशी
कल्याणमध्ये संघ विचाराने काम करणारे अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारची लोककल्याणची कामे आपापल्या परीने करत होते. ही कामे करत असताना स्वतःची एक संस्था काढून कामांना सुरुवात करावी म्हणजे त्या कार्यक्रमांना एक ठोस संस्थारूपी अनुष्ठान लाभेल असा विचार केला आणि त्यातील काहींनी ‘लोकमंगलम सेवा संस्था’ या संस्थेची २०१७ साली स्थापना केली. शिक्षण, आरोग्य, संस्कार, जनजागर, ग्रामविकास आणि स्वावलंबन हीच सहा उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून लोकांचं मंगल करणारी सेवा संस्था सुरू करण्यात आली. त्यांचे प्रेरणास्थान किंवा आधारस्तंभ विश्वास धारप. आज धारप यांचे वय ८४ च्या घरात असले तरीही ते समाजकार्यात या वयातही हिरीरीने सहभाग घेत असतात. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बिनीवाले, संस्थेचे कार्यवाह संदीप कुलकर्णी इतर कार्यकर्त्यांच्या मदतीने संस्थेच्या कार्यात नवे नवे आयाम जोडत आहेत. ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ म्हणून आपला वेळ संस्थेचे सर्व कार्यकर्ते वेचत असतात.
संस्थेच्या कार्याची अगदी पहिली सुरुवात रुग्ण सहाय्यक केंद्र सुरू करून झाली. रुग्णांना तात्पुरत्या वापरासाठी बऱ्याच वस्तू लागत असतात, त्या खर्चिक असतात शिवाय त्यांची कायमस्वरूपी गरज नसते. त्या उपलब्ध करून देण्याचे काम सुरुवातीला सुरू झाले. रुग्णांना ही सामग्री विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते आणि गरजू रुग्ण मोठ्या प्रमाणावर ही साधनसामग्री संस्थेकडून घेत आहेत. सुरुवातीला २५ उपकरणे होती, आता जवळजवळ दीडशे उपकरणे उपलब्ध असून दररोज तीन ते चार रुग्ण या उपकरणांचा लाभ घेत असतात. बेड, व्हील चेअर, कमोड अन्य मशिन्स अशी सर्व सामग्री ठेवण्यासाठी डॉक्टर सोमानी यांनी त्यांच्या क्लिनिक समोरची थोडी जागा संस्थेला उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर आता संस्थेने स्वतःची भाड्याची जागा घेतली आहे. लोकांची गरज लक्षात घेऊन कल्याणमध्येच आणखी एक केंद्र आता सुरू करण्यात आले आहे आणि त्या केंद्राला श्री गुरुजी यांचं नाव देण्यात आलं आहे. हे केंद्र कल्याणमधल्या सहजीवन सेवा मंडळाच्या सहकार्याने सुरू करण्यात आलं आहे. त्यानंतर लगेचच ग्रामीण भागातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी फिरती प्रयोगशाळा सुरू केली आहे. शाळांमध्ये ठरावीक दिवशीही फिरती प्रयोगशाळा जाऊन वैज्ञानिक प्रयोग दाखवून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याचं काम करते.
आरोग्य रक्षक योजने अंतर्गत गावातल्या सुशिक्षित तरुणांना प्रथमोपचाराचं शिक्षण देऊन जिल्ह्यातल्या अति ग्रामीण भागातल्या गावांमध्ये प्रथमोपचार देण्याचे सुरू केलंय. या सर्व कामांसाठी संस्थेचे कार्यकर्ते भिवंडी, शहापूर, मुरबाड तालुक्यातल्या ग्रामीण भागात स्वतः जाऊन तिथल्या गरजा जाणून घेत असतात. शहापूर, भिवंडी आणि मुरबाड तालुक्यातील ग्रामीण शाळा तसेच कल्याण महापालिकेच्या अशा एकूण ५५ शाळांमध्ये ही प्रयोगशाळा जाते. आज-काल एकाकी वृद्धांची संख्या खूप वाढू लागली आहे. काहींची मुलं परदेशी जातात, तर काहींची वेगळी राहतात. वयपरत्वे अशा ज्येष्ठ नागरिकांना स्वतःची दैनंदिन कामं करायला सुद्धा अडचण भासते अशावेळी संस्थेचे कार्यकर्ते तर पंधरा दिवसांनी किंवा एक महिन्यांनी अशा ज्येष्ठ नागरिकांकडे जाऊन त्यांची विचारपूस करतात. त्यांची काही किरकोळ, बारीक सारीक कामं असतील तर ती करायलाही मदत करतात.संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्नील चौधरी हे कायद्याचे पदवीधर असून विधी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. ते संस्थेसाठी मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र चालवतात.
त्याशिवाय कल्याणमधील इतर सामाजिक संस्थांना काही कार्य करायचं असेल तर त्यांनाही सहकार्य “लोकमंगलम सेवा संस्थे”मार्फत केलं जातं. नुकतेच कल्याणमधल्या एका महिला मंडळान काहीतरी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. संस्थेचे एक कार्यकर्ते ग्रामीण भागात शिक्षक असून त्यांनी तिथल्या एका शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहांची अवस्था बिकट आहे असं सांगितलं. ती शाळा पाहायला संस्थेचे आणि महिला मंडळाचे कार्यकर्ते स्वतः जाऊन आले. आता त्या शाळेला विद्यार्थिनींसाठी चांगलं स्वच्छतागृह बांधून देण्याची ही योजना आहे. अशा रीतीने गेली सहा वर्षं संस्थेच सुरुवातीपासून सुरू केलेलं कार्य वाढतच आहे त्याशिवाय नवे नवे आयाम जोडले जात आहेत.
joshishibani@yahoo. com