Thursday, June 12, 2025

Asia cup 2023: कुलदीपची कमाल, लंकेला हरवत भारत आशिया चषकच्या अंतिम फेरीत

Asia cup 2023: कुलदीपची कमाल, लंकेला हरवत भारत आशिया चषकच्या अंतिम फेरीत

कोलंबो: कुलदीप यादवच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने आशिया चषक २०२३मधील(asia cup 2023) सुपर ४ फेरीत श्रीलंकेला ४१ धावांनी हरवले आहे. भारताने विजयासाठी ठेवलेले २१४ धावांचे माफक आव्हानही श्रीलंकेला पूर्ण करता आले नाही.


श्रीलंकेचा संपूर्ण डाव ४१.३ षटकांत १७२ धावांवर आटोपला. पाकिस्तानविरुद्ध पाच बळी घेणाऱ्या कुलदीप यादवने चार गडी बाद करत श्रीलंकेच्या संघाला सुरूंग लावला. जसप्रीत बुमराहने या सामन्यात २ गडी बाद केले. तर रवींद्र जडेजाने २ विकेट घेतल्या.


याआधी टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारता आली नाही. श्रीलंकेच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर भारताच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने केवळ सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.


शुभमन गिलने १९ धावा केल्या तर इशान किशन ३३ धावांवर बाद झाला. के एल राहुल ३९ धावा करू शकला. अक्षर पटेलने २६ धावा केल्या. बाकी फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. यामुळे भारताने ४९.१ षटकांत केवळ २१३ धावा केल्या.श्रीलंकेकडून २० वर्षीय दुनिथ वेलालगेने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.


इतके लहान आव्हान असताना श्रीलंका हा सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली आणि श्रीलंकेचा डाव हाणून पाडला. श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने ४१ तर दुनिथ वेलालगेने नाबाद ४२ धावा केल्या.


Comments
Add Comment