
जळगावच्या विकासासाठी अजित पवारांनी उघडली तिजोरी
जळगाव : महाराष्ट्र सरकार 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) हा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबवत सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. आज जळगाव (Jalgaon) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी नागरिकांना संबोधित केले.
अजित पवार म्हणाले, केंद्राच्या आणि राज्याच्या योजना तुमच्यापर्यंत आणण्याचे काम 'शासन आपल्या दारी'तर्फे सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी सांगतात हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. शासन सर्वांच्या पाठीशी आहे. प्रशासन आणि नागरिक जोडावा, म्हणून हा कार्यक्रम राज्य सरकार राबवत आहे. लोकांची कामे लवकर व्हावी यासाठी शासन आपल्या दारी आले आहे. जळगाव जिल्ह्यात काही तालुक्यात पाऊस कमी पडला. त्या तालुक्यात पाऊस पडावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं अजित पवार म्हणाले.
महायुतीच्या सरकारमध्ये जळगाव जिल्ह्याला चांगलं मंत्रीपद दिलं आहे. गिरीश महाजन यांना देखील ग्रामविकास मंत्रिपद आहे. त्यांनी याचा फायदा जळगाव जिल्ह्याला करुन द्यावा. जिल्ह्यातील १५ तालुक्यांचा विकास झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे अर्थ व नियोजन खात्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे निधीची कमतरता पडू देणार नाही, असं अजित पवार म्हणाले.