Saturday, September 21, 2024
HomeदेशSamudra Yaan Mission : चंद्रस्वारीनंतर आता भारत जाणार समुद्राच्या खोलात...

Samudra Yaan Mission : चंद्रस्वारीनंतर आता भारत जाणार समुद्राच्या खोलात…

विकसित राष्ट्राच्या दृष्टीने वाटचाल… काय आहे समुद्रयान मोहिम?

चेन्नई : भारताने चांद्रयान ३ मोहिम (Chandrayaan-3 mission) यशस्वी करत जगासमोर एक नवा आदर्श घालून ठेवला आहे. भारताने अवकाशभरारी तर घेतलीच पण आता भारत जमिनीच्या खोलात जाऊन तपासणी करण्यासाठीही सज्ज आहे. यासाठी भारत ‘समुद्रयान’ (Samudrayaan) या आपल्या नव्या मोहिमेची तयारी करत आहे. यामध्ये सबमर्सिबलच्या (Submersible) साहाय्याने मानवाला समुद्राच्या आत ६००० मीटर तळाशी नेण्याची तयारी सुरू आहे. यामुळे सागरी संपत्तीची पाहणी करण्याची संधी तर मिळणार आहेच, शिवाय सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

भारताच्या २०४७ म्हणजेच स्वातंत्र्यानंतर १०० वर्षांच्या आत विकसित राष्ट्र बनण्याच्या स्वप्नाच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची वाटचाल आहे. पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी समुद्रयान मोहिमेविषयी सोशल मीडिया X वर पोस्टद्वारे माहिती दिली आहे. भारत सरकार ‘मत्स्य ६०००’ (Mastya 6000) नावाचं एक सबमर्सिबल बनवत आहे, ज्याचा उद्देश समुद्रात ६००० मीटर खोलवर शोध घेण्याचा आहे. हे सबमर्सिबल ३ लोकांना समुद्रात नेण्यास सक्षम असेल. याआधी भारताने ७००० मीटर खोलीपर्यंत मानवरहित पाणबुडी पाठवण्याचे मिशन पूर्ण केले आहे. आता मानवयुक्त मोहीम पूर्ण करण्याचे काम सुरू आहे.

चेन्नई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (National Institute of Ocean Technology at Chennai) येथे ‘मत्स्य ६०००’ निर्माण केली जात आहे. भारताची पहिली मानवयुक्त डीप ओशन मिशन (Deep Ocean Mission) ‘समुद्रयान’ खोल समुद्रातील संसाधने आणि जैवविविधता मूल्यांकनाचा अभ्यास करण्यासाठी आखण्यात आली आहे. ३ मानवांना समुद्रात ६ किमी खोलीत पाठवण्याची तयारी चालू आहे. डीप ओशन मिशन पंतप्रधानांच्या ‘ब्लू इकॉनॉमी’ धोरणाचे समर्थन करते. त्यामुळे या प्रकल्पामुळे सागरी परिसंस्थेला त्रास होणार नाही. देशाच्या आर्थिक वाढीसाठी, उपजीविका आणि नोकऱ्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि सागरी परिसंस्थेचे आरोग्य जतन करण्यासाठी ही मोहिम आखण्यात आली आहे.

कशी असणार ही अत्याधुनिक पाणबुडी?

मिळालेल्या माहितीनुसार, ही पाणबुडी टायटॅनियम मिश्र धातुपासून बनवली जात आहे. ज्यामध्ये ३ लोक बसू शकतील. समुद्राच्या तळातून उठणाऱ्या भूकंपाच्या लाटा शोधण्यासाठी यात सेन्सर बसवला जाणार आहे. याचा संपूर्ण प्रवास १२ कॅमेऱ्यांच्या मदतीने रेकॉर्ड केला जाणार आहे. ‘मत्स्य ६०००’ या सबमर्सिबलची पूर्ण तयारी आणि चाचणी करण्याचे काम २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असं सांगण्यात येत आहे. २०२६ मध्ये ती समुद्राच्या खोलवर उतरवली जाईल.

कसे होते भारताच्या पाणबुडीचे टप्पे?

ही पाणबुडी टप्प्याटप्प्याने तयार केली जात आहे. पहिल्यांदाच ५०० मीटर खोलीपर्यंत जाण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी तयार करण्यात आली. यानंतर, भारताने मानवरहित रोबोटिक पाणबुडी समुद्राखाली ६०००-७००० मीटर खोलीपर्यंत उतरवली. आता समुद्राची खोली मोजण्याचे काम मानवयुक्त सबमर्सिबलकडे सोपविण्याची तयारी सुरू आहे.

मोहिमेमुळे काय फायदा होणार?

या मोहिमेच्या यशामुळे सागरी संपत्तीची पाहणी करण्याची संधी तर मिळणार आहेच, शिवाय सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. ६ किमी खोलीपर्यंत मानवयुक्त सबमर्सिबलसह समुद्राखाली जाणे म्हणजे कोबाल्ट, दुर्मिळ पृथ्वीचे घटक, मँगनीज इत्यादी समुद्रातून बाहेर पडणारी खनिजे मानव स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकणार आहे. त्यांचे वेगळे नमुने गोळा केल्यानंतर ते विश्लेषणासाठी देखील वापरले जाऊ शकतात. सबमर्सिबल ‘मत्स्या ६०००’ ची सामान्य ऑपरेटिंग क्षमता १२ तासांची असेल, परंतु आपत्कालीन परिस्थितीत त्याची कार्य क्षमता ९६ तासांपर्यंत वाढवता येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -