
आज बैठकीला कोण राहणार उपस्थित?
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) चालू असलेलं आंदोलन दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चाललं आहे. आज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा चौदावा दिवस असून त्यांनी पाणी घेणं बंद केलं आहे, शिवाय सलाईनही काढून टाकलं आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. तर दुसरीकडे या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचेही शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हा प्रश्न निकालात काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक (All Party Meeting) बोलावली आहे. विरोधी पक्षांनीही या बैठकीला पाठिंबा देत उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे.
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीसाठी शरद पवार गटाकडून राजेश टोपे तर ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत निर्णय होणार का? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
कोणाकोणाला आहे निमंत्रण?
१) अशोक चव्हाण, काँग्रेस
२) अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता (ठाकरे गट)
३) विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेता (काँग्रेस)
४) उदयनराजे भोसले, खासदार (भाजप )
५) नाना पटोले, काँग्रेस
६) बाळासाहेब थोरात (काँग्रेस )
७) जयंत पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार)
८) राजेश टोपे, राष्ट्रवादी (शरद पवार)
९) चंद्रशेखर बावनकुळे , भाजप
१०) जयंत पाटील , शेकाप
११) हितेंद्र ठाकूर,बहुजन विकास आघाडी
१२) कपिल पाटील, लोकभारती पक्ष
१३) विनय कोरे, जनसुराज्य पक्ष
१४) महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्ष
१५) बच्चू कडू, प्रहार जनशक्ती पक्ष
१६) राजू पाटील, मनसे
१७) रवी राणा, आमदार
१८) विनोद निकोले, मार्क्सवादी कम्युनिष्पक्ष
१९) संभाजी राजे भोसले, माजी खासदार
२०) प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी
२१) सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटना
२२) जोगेंद्र कवाडे, पीपल्स रिपब्लिकन पक्ष
२३) राजेंद्र गवई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
२४) मुख्य सचिव
२५) प्रधान सचिव , विधी व न्याय विभाग
मनोज जरांगेंची मागणी कायम
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात गेल्या १३ दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत असून, कालपासून त्यांनी उपचार आणि पाणी घेणं देखील बंद केलं आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर ते ठाम आहेत. यामुळेच त्यांनी राज्य सरकारचा दुसरा जीआर देखील फेटाळला आहे. मराठा समाजाने गावोगावी शांततेनं साखळी उपोषण करावं, असं आवाहन देखील जरांगेंनी केलं आहे.