- गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण
या आठवड्याची सुरुवात वाढीसह झाली आणि त्यानंतर संपूर्ण आठवडा निर्देशांक तेजीत राहिले. माझ्या या सदरातील १७ जुलैच्या लेखातच मध्यम मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हीमध्ये तेजी सांगणारी विशेष रचना तयार झालेली असून या विशेष रचनेनुसार निर्देशांक सेन्सेक्समध्ये आणि निफ्टीमध्ये मोठी वाढ होणे अपेक्षित आहे, हे सांगितलेले आहे. तसेच निर्देशांकात होणारी घसरण ही खरेदीची संधी असेल, हेही सांगितलेले आहे.
गेल्या काही आठवड्यात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर ‘बाउन्स बॅक’ देत या आठवड्यात निर्देशांकामध्ये जोरदार तेजी झाली. शेअर बाजारात तेजीनंतर मंदी येणे किंवा मंदीनंतर तेजी येणे हे स्वाभाविक आहे आणि शेअर बाजाराचा हाच गुणधर्म आहे. गुंतवणूक करीत असताना या तेजी किंवा मंदीत सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे मार्केटची दिशा ओळखणे. बहुतेक नवीन गुंतवणूकदार हे मार्केटमधील या छोट्या करेक्शनलाच शेअर बाजाराची मुख्य दिशा समजतात. त्यामुळे बहुतेक वेळा त्यांना शेअर्स खरेदी किंवा विक्रीत नुकसान सहन करावे लागते.
मध्यम मुदतीसाठी निर्देशांकाची दिशा तेजीची आहे. या आठवड्यात निर्देशांकाने केलेल्या बाऊन्सनंतर अल्पमुदतीसाठी निर्देशांकाची गती देखील तेजीची झालेली आहे. पुढील आठवड्यासाठी निर्देशांक निफ्टीची १९४०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. निर्देशांक जोपर्यंत या पातळीच्या वर आहेत तोपर्यंत आता निर्देशांकात घसरण होणार नाही. अल्पमुदतीच्या चार्टनुसार आता निर्देशांक निफ्टीची १९९९१ ही महत्त्वाची विक्री पातळी असून जर ही पातळी तोडत निफ्टी स्थिरावली, तर मात्र निफ्टी आणखी मोठ्या वाढीसाठी तयार होईल. अल्पमुदतीसाठी निर्देशांकाची गती ही तेजीची झालेली असल्याने अल्पमुदतीचा विचार करता तेजीचा कल दाखवत असलेल्या शेअर्समध्ये अल्पमुदतीसाठी तेजीचा व्यवहार करता येईल. अल्पमुदतीसाठी आरव्हीएनएल, हेमाद्री स्पेशालिटी, आयआरएफसी यासह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे.
‘एमसीएक्स’ या शेअरमध्ये मध्यम मुदतीच्या चार्टनुसार तेजी सांगणारी विशेष रचना तयार झालेली असून आज १८०७ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये १५७९ रुपये किमतीचा बंद पद्धतीने स्टॉपलॉस लावून तेजीचा व्यवहार केल्यास मध्यम मुदतीत चांगला फायदा होऊ शकेल. कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसिसनुसार अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची गती ही तेजीची असून दिशा रेंज बाऊंड आहे. जोपर्यंत सोने ५८५०० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत सोन्यामधील तेजी कायम राहील. मात्र रेंज बाऊंड स्थितीमुळे सोन्यामध्ये होणारी वाढ ही देखील मर्यादित असेल. ज्यावेळी सोने ६०००० ही पातळी ओलांडेल, त्याच वेळी सोन्यामध्ये मोठी वाढ होईल. दोन आठवड्यांपासूनच कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. या आठवड्यात देखील ही वाढ कायम राहिली. पुढील काळात जोपर्यंत कच्चे तेल ७००० रुपये किमतीच्या वर आहे, तोपर्यंत कच्च्या तेलातील तेजी कायम राहील. ७४०० ही आता कच्च्या तेलाची अत्यंत महत्त्वाची विक्री पातळी असून या पातळीपासून कच्च्या तेलात करेक्शन येणे अपेक्षित आहे. मात्र आता जोपर्यंत कच्चे तेल दिशा बदलत नाही, तोपर्यंत कच्च्या तेलात विक्री करणे टाळायला हवे.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)