काय आहे प्रकरण?
पुणे : पुण्यात हल्ली गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. पण केवळ पुण्यातूनच नव्हे तर राज्यभरातून चित्रविचित्र गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत. मानेवर संशयाचं भूत बसलं असेल तर एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते, हे ऐकून थरकाप उडतो. पुण्याच्या येरवडा भागात घडलेली घटना तर संताप आणणारी आहे. पुण्यात दीड वर्षापूर्वीच लग्न झालेल्या एका पतीने चारित्र्यावरुन संशय घेत आपल्या पत्नीवर चाकूने वार करत तिची हत्या केली आहे. या जोडप्याला सात महिन्यांची एक कोवळी मुलगीदेखील होती. पतीच्या या कृत्यामुळे त्या चिमुरडीलाही बालवयात आपली आई गमवावी लागली आहे.
रुपाली उर्फ बबिता भोसले (वय ३५ वर्षे) असं खून झालेल्या महिलेचं नाव असून आशिष भोसले (वय ३२ वर्षे) असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव आहे. या प्रकरणी स्वप्नी बाळासाहेब खांडवे यांनी विमानतळ पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपी आशिष भोसलेला अटक केली आहे. विमानतळ पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
रुपाली आणि आशिष यांचं लग्न दीड वर्षांपूर्वी झालं होतं. लोहगावमधील संतनगरमध्ये ते भाड्याने घेतलेल्या घरात राहत होते. आशिष हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करतो तर रुपाली धुणे-भांडी करुन घर चालवत होती. त्यांना सात महिन्यांची मुलगी देखील आहे. अशिष हा रुपालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता. त्यातून दोघांमध्ये सतत भांडणे होतं असत. दरम्यान शनिवारी रात्री आशिषने जोरदार भांडण झालं. यावेळी आशिषने रुपालीला शिवीगाळ केली. तसेच आशिषने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून तिला जखमी केले. या घटनेबाबत समजताच शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. उपचारासाठी रुपाली भोसले यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र जखमा अतिशय गंभीर स्वरुपाच्या असल्याने उपचारांआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.