
यंदा दै. प्रहारच्या श्रावण महिन्याची सुरुवात ‘श्रावणसरी’ या अभिनव उपक्रमाने झाली. अधिक आणि श्रावण मासाचे औचित्य साधून ‘प्रहार’ने प्रत्येक सोमवारचे ‘श्रावणसरी’ हे पान वाचकांसाठी बहाल केले. यात लौकिकप्राप्त मंडळींना दै. प्रहारने बोलते केले. यादरम्यान त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य, जीवनप्रवास, कलासाधना उलगडून सांगितल्या. आतापर्यंत या कार्यक्रमात भार्गवी चिरमुले, विसुभाऊ बापट, अदिती सारंगधर, मीनल मोहाडीकर, अच्युत पालव, फुलवा खामकर, पंढरीनाथ कांबळे, डॉ.राजश्री कटके या आठ मान्यवरांनी मनमोकळा संवाद साधला.
असाच ‘श्रावणसरी’च्या या प्रवासातील नवव्या पुष्पात बुधवारी जे. जे. हॉस्पिटलच्या सर्वात तरुण अधिष्ठाता म्हणून लौकिक असलेल्या पल्लवी सापळे यांच्याशी गप्पांचा फड रंगला. तेव्हा विलक्षण नेतृत्व, निर्णयक्षमता, प्रशासकीय चापल्य, मनमोकळेपणा, संवाद कौशल्य अशा त्यांच्यातल्या कलागुणांची अनुभूती आली. डॉ. पल्लवी म्हणजे उत्साहाचा अर्णवच म्हणावा लागेल. यावेळी डॉ. पल्लवी सापळे यांचे स्वागत दैनिक प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर, लेखा विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत यांनी केले.
आरोग्य यंत्रणेची दूरदृष्टी
तेजस वाघमारे
"मी डॉक्टर व्हावे ठरले नव्हते. मी किंग जॉर्ज शाळेत होते, चांगले गुण मिळाले. गुण चांगले मिळाल्यानंतर लोक अक्कल काढतील म्हणून मेडिकलला गेले. ध्येयाने पछाडून किंवा आई-वडील डॉक्टर असे काही नव्हते, पण झाले डॉक्टर!” प्रहार कार्यालयात ‘श्रावणसरी’ उपक्रमानिमित्त दै. प्रहारच्या टीमबरोबर संवाद साधला तेव्हा जे.जे. हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे या अशा रीतीने उत्स्फूर्तपणे व्यक्त झाल्या.
“एमबीबीएसला चांगले गुण मिळाल्यानंतर एमडीसाठी पीडियाट्रिक हा विषय घेतला, हा माझ्या आयुष्यातील खूप चांगला निर्णय होता. तो विषय मला झपाटून टाकतो, खूप आवडतो. मुलांना ट्रीट करणं, मॅनेज करणे आणि विद्यार्थ्यांना पेशंटसोबत कसे वागावे हे शिकवणे खूप आवडते. मी जे.जे. रुग्णालयात शिक्षण घेत असताना मला बॉण्डची एक वर्षाची प्रॅक्टिसही तिथेच मिळाली. बहुतेक लोक बॉण्ड पूर्ण होताच परदेशी किंवा खासगी प्रॅक्टिस करण्याचे ठरवतात. पण बॉण्ड पूर्ण होताच एमपीएससीची परीक्षा आली, मग पुढे एमपीएससी आणि माझे बाँडिंग झाले. असिस्टंट प्रोफेसर झाले. मग असोसिएट प्रोफेसर, त्यानंतर प्रोफेसर झाले. शेवटी या पद्धतीने डीन झाले. जे.जे. रुग्णालयाच्या कार्यकक्षेत सहा रुग्णालये येतात. यात जी.टी., सेंट जॉर्ज, कामा, जे.जे. हॉस्पिटल, वांद्रे पूर्वेकडील अर्बन हेल्थ सेंटर आणि पालघर येथील एका हॉस्पिटलचा समावेश आहे. मी ग्रँड मेडिकल कॉलेजची डीन आहे. जे.जे.मधील माझी दिनचर्या अशी की, दिवसाला माझ्या किमान एक हजार सह्या असतात. डिजिटल सहीऐवजी माझी सही मीच करते. सकाळी मी रोज हॉस्पिटलचा राऊंड घेते. त्यानंतर व्हिजिटर्सना अटेंड करते. टेक्नोसॅव्ही असल्याने मेसेज, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सर्वांशी संवाद सुरू असतो.” माझ्या वाचनात आलेले मॅनेजमेंटचे एक प्रिन्सिपल आहे. ते असे की, कुठल्याही संस्थेतील ८० टक्के काम हे २० टक्के लोक करत असतात. असे तुमचे ८० टक्के काम २० टक्के वेळेत होते, हे अनेकदा अनुभवले आहे. राजकारण हे सगळीकडे आहे. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये, सासू-सुनेत, जावा-जावांत असतं. कॉर्पोरेट सेक्टरमध्येही आर्थिक राजकारण आहे. त्यामुळे आपला दृष्टिकोन व्यापक करून काम केले पाहिजे. बुद्धाचे एक वाक्य आहे “रस्ता स्मूथ नाही होणार, तुम्ही चांगली चप्पल घाला.”
जे.जे. हॉस्पिटल सुपर स्पेशालिस्टी आहे. एकमेव पीडियाट्रिक डिपार्टमेंट इथे होते. आता नायर, केईएम, सायनमध्ये आहे. जे.जे. रुग्णालयात काम करण्याचा माझा आनंदाचा भाग हा की, मी तिथलीच विद्यार्थिनी आहे. एमबीबीएस, एमडी तिथेच केले. त्यावेळीही आमच्याकडे यूपी, बिहारचे बऱ्यापैकी रुग्ण आमच्याकडे यायचे. तसेच रेफरल पेशंटही खूप येतात. जवळपासच्या परिसरातील बहुतांश लोकांचा जे.जे.वरच विश्वास असल्याने ते उपचारासाठी इथेच येतात. पण मी हेही कबूल करेन जी, जी.टी., सेंट जॉर्ज, कामा ही आमची रुग्णालये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून जवळ आहेत. तरीही इथले रुग्ण आता कमी झाले आहेत. त्याला खूप कारणे आहेत. जसे की, दक्षिण मुंबईत नागरिकांचे वास्तव्य खूप कमी झाले आहे. जी.टी. हॉस्पिटलसमोर चाळी होत्या, तिथे आता कमर्शियल इमारती उभ्या आहेत. विविध कारणाने लोक मुंबईबाहेर गेल्याने या हॉस्पिटलमधील पेशंट कमी झाले आहेत. पण जे.जे.चा वर्कलोड अद्याप कमी झालेला नाही. तिथे आजही रुग्णांची गर्दी होते आहे. पेशंटच्या गरजा बघून आता आम्ही जी.टी., कामा, सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये सुधारणा करत आहोत. जी.टी.मध्ये आता ट्रान्सजेंडर वॉर्ड सुरू केला आहे. तसेच डीअॅडिक्शन सेंटर सुरू केले आहे. आता आरोग्य मंत्र्यांच्या मदतीने सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट सेंटर सुरू करण्याचे लक्ष्य आहे. इथे आपण १ ते २ लाखांत लिव्हर ट्रान्सप्लांट करू शकू, तर खासगी रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी स्वस्तात स्वस्त ४० ते ५० लाख रुपये लागतात. खरे तर लिव्हर ट्रान्सप्लांट साधी प्रक्रिया आहे. त्याचे डोनर्स पटकन मिळतात. जो डोनेट करतो, त्याचे लिव्हर नॉर्मल होऊन वाढते.
१९४७ ला जेव्हा आपण स्वतंत्र झालो, तेव्हा अॅवरेज लाइफ स्पाईन ३७ वर्षे होते. आता शहरी भागात तो ७० पर्यंत गेला आहे. त्याच्यामुळे कॅन्सर, डायबेटीस, ब्लडप्रेशर समस्या, किडनी, लिव्हर फेल होणे हे आजार वाढू लागले आहेत. ५०-६० वर्षांपूर्वी टीबी झालेल्या ५० टक्के लोकांचा मृत्यू होत होता. आता टीबीचे प्रमाण १ टक्क्यावर आले आहे. अजून टीबीविरोधात आपल्याला लढायचे आहेच, त्यामुळे नवीन गरजा ओळखून नवीन गोष्टी करण्याचा माझा विचार आहे. यामुळे जी.टी., कामा, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कात टाकतील. कामामध्ये पुढील महिन्यात आयव्हीएफ सेंटर सुरू होईल. खासगी रुग्णालयात ती ट्रीटमेंट काही लाखांत आहे. तीच ट्रिटमेंट २ ते ४ हजारांत करण्याचा आमचा विचार आहे. त्यामधील एक सेंटर कदाचित वांद्रे येथे करू. जे.जे.मध्ये सध्या १०० व्हेंटिलेटर आहेत. तरीही ती अपुरी पडत आहेत. यासोबतच हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड्स वाढवायचे आहेत. नियमाप्रमाणे आमच्याकडे ५० ते ६० आयसीयू बेड्स हवेत. त्या तुलनेत आमच्याकडे दुप्पट तिप्पट बेड्स उपलब्ध आहेत. जे.जे.मध्ये दुसऱ्या शहरांमधून, डॉक्टरांनी रेफर केलेले रुग्ण येतात. तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी हे हॉस्पिटल प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणे आहे. सर्दी, खोकला, झोप येत नाही, असे रुग्णसुद्धा येथे येतात, असे त्या म्हणाल्या.
अशा रीतीने ‘श्रावणसरी’च्या नवव्या पुष्पात दै. प्रहारशी मनमोकळा संंवाद साधत त्यांनी आपला वैद्यकीय प्रवास, तर कथन केलाच; परंतु सोबत रुग्णांना जीवनदान देण्यासाठी नवनव्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा मनोदयही व्यक्त केला.

सेवाव्रती आनंदयात्री
वैष्णवी भोगले
डॉक्टरांचे जीवन हे एक सेवाव्रतच असते. जसे की सैनिक आपल्या भारत देशासाठी सीमेवर लढतात, त्याचप्रमाणे एखादा रुग्ण आजारापासून बरा होईपर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न चालू असतात. अशाच एक सेवाव्रती म्हणजे डॉ. पल्लवी सापळे. तरुण वयातच त्यांनी खासगी रुग्णालयात काम न करता शासकीय दवाखान्यातूनच सेवा करायची आणि तिथे आपले करिअर करायचे ठरवले. २०१६ मध्ये महाराष्ट्रामधील जे. जे. हॉस्पिटलच्या सर्वात तरुण महिला डॉक्टर म्हणून त्यांची नोंद आहे. त्यांची ही आनंदयात्राही प्रेरणादायी आहे.
प्रहारच्या श्रावणसरी कार्यक्रमात डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी गप्पा मारताना डॉक्टरांच्या आयुष्यात किती आव्हानं असतात ते समजलं. त्या म्हणतात, जे. जे.मध्ये आधीच आजाराने आणि आर्थिकदृष्ट्या खचलेले रुग्ण येतात. त्यांच्याशी बोलून, त्यांच्या मनात विश्वास निर्माण करून त्याला धीर दिल्यानंतर जेव्हा त्यांची मानसिक स्थिती सुधारते, तेव्हा मला अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटतं. केवळ पैसा कमावणं हा उद्देश नाही, तर आपल्या समाजासाठी नवीन गोष्टी करण्याचा त्यांचा मानस आहे. आपल्या आयुष्याविषयी सांगताना त्यांनी क्रिकेटर राहुल द्रविडचे उदाहरण दिलं. तो एकापाठोपाठ एक बिनचूक षटकार मारतो तसे काहीसे माझ्या आयुष्यात झाले, असे त्या म्हणतात. त्यांच्या घरात डॉक्टर या पेशाचा समृद्ध वारसा आहे. हुशार मुलांनी डॉक्टरच झालं पाहिजे, अशी आपली मानसिकता नसती, तर मी डॉक्टर न होता इतिहासात करिअर केलं असतं. ९८ टक्के गुण मिळवून जर मी कला शाखेत प्रवेश घेतला असता, तर मला अनेकांनी नावे ठेवली असती. म्हणून मी मेडिकलला प्रवेश घेतला आणि यशस्वीही झाले, असेही त्या म्हणाल्या. ब्रिटिशकालीन वारसा असलेल्या जे. जे. हॉस्पिटलच्या पुरातन इमारतीचे आणि सभोवतालच्या परिसराचे संगोपन करण्याचा, जपण्याचा त्यांचा मानस आहे. त्या म्हणतात, आपण आपले आयुष्य दुसऱ्यांवर विसंबून न जगता मनमुराद आनंद घेत जगलं पाहिजे. आपल्या आयुष्याच्या कुलपाची चावी ही आपल्याकडेच असते. त्यांच्या या वक्तव्याची प्रचिती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून सहज येते. धर्नुधारी नावाचा अंक आपल्या आजाेबांच्या काळापासून प्रसिद्ध होत आहे. पुस्तक प्रकाशनाचा वारसा घरात आहे. लिखाण करावेसे वाटते का? याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “मला लिखाण करावेसे नेहमी वाटते; परंतु सध्या जी जबाबदारी हाती आहे, त्यातून लिखाणाकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. भविष्यात नक्कीच विचार करेन.”
इतिहासाला झळाळी विज्ञानाची
रूपाली केळस्कर
श्रावणातल्या झरझर झरणाऱ्या जलधरांची अनेक रूपे आठवणींच्या कोंदणात साठवून ठेवण्यासारखी, काही सुमधूर संगीत होऊन नाचणारी, काही आठवणींच्या ओंजळीतून भूतकाळात डोकावणारी इतिहासासारखी धीरगंभीर, तर काही कातरवेळी हुरहूर लावणारी, असा हा मयूरपंखी श्रावण भाद्रपदाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला. इतक्यात दैनिक प्रहारच्या कार्यालयात जे.जे.च्या अधिष्ठात्री डॉक्टर पल्लवी सापळे यांचे ‘श्रावणसरी’ या कार्यक्रमासाठी आगमन झाले अन् नकळत इतिहासाची पानं उलगडली गेली.
जे.जे. हाॅस्पिटल ही ऐतिहासिक वास्तू मुंबईतल्या वैभवात भर घालणारी आणि कोट्यवधी रुग्णांना जीवदान देणारी, जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांची पिढी घडवणारी. याच जे.जे.च्या प्रांगणात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून, हाॅस्पिटलचा प्रशासकीय कार्यभार सांभाळण्याचे भाग्य डॉक्टर पल्लवी यांना लाभले. त्या जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्री आहेत. कोणत्याही रुग्णालयाचा अधिष्ठाता हा त्या रुग्णालयाचा चेहरा असतो. इतिहासाची आवड असूनही डॉ. पल्लवी यांनी वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग निवडला; परंतु नियतीने या प्रवासात त्यांना नकळतपणे इतिहासाच्या दारात आणले. पल्लवी यांनी मुंबईसह सांगली, मिरज, अहमदनगर, धुळे या भागातदेखील काम केले. महापूर आणि कोरोनाच्या संकटात त्यांचे योग्य नियोजन पथ्यावर पडले. शिकवणे म्हणजेच डॉक्टर घडवण्याचे काम त्यांना आवडते. तसेच रोज हजारो सह्याही त्या अत्यंत डोळसपणे करतात. सोशल मीडियाचा चांगला वापर करतात. तसेच अचानक येणारे प्रश्नही चुटकीसरशी सोडवतात. शासकीय रुग्णालयात काम करताना अनेक आव्हाने येतात. त्यात जे.जे. रुग्णालयाचे नाव वलयांकित असल्याने सर्व गोष्टींचे तारताम्य बाळगणे आणि नियोजन करणे ही तारेवरची कसरत असते.
मात्र अनुभवातून त्या शिकत गेल्या आणि हसतमुख स्वभावामुळे माणसे जोडली गेली. अचूक निर्णय घेण्याची क्षमता, वक्तशीरपणा, पारदर्शकतेवर भर तसेच येणारी संकटे झेलण्याची कला त्यांनी अवगत केली. या ऐतिहासिक वारशाचे त्यांना जतन करायचे आहे. पुन्हा कात टाकून विद्यार्थी घडवायचे आहेत आणि रुग्णांना जीवनदान देण्यासाठी नव्या तंत्राचा वापर करायचा आहे.
त्यांची भेट झाली, तेव्हा एका कवीच्या ओळी नकळत आठवल्या. ‘इतिहासाचे पाठबळ घेऊन वर्तमानात चालवं वाटतं... आपलं कार्यही कुणाला इतिहासाशी तोलावं वाटतं...’ हीच बहुदा त्यांच्या मनातील सुप्त इच्छा असू शकते.