उपोषणाचा आज चौदावा दिवस…
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) चालू असलेलं आंदोलन दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चाललं आहे. आज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा चौदावा दिवस असून त्यांनी पाणी घेणं बंद केलं आहे, शिवाय सलाईनही काढून टाकलं आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. तर दुसरीकडे या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचेही शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हा प्रश्न निकालात काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक (All Party Meeting) बोलावली आहे. विरोधी पक्षांनीही या बैठकीला पाठिंबा देत उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात गेल्या १३ दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत असून, कालपासून त्यांनी उपचार आणि पाणी घेणं देखील बंद केलं आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर ते ठाम आहेत. यामुळेच त्यांनी राज्य सरकारचा दुसरा जीआर देखील फेटाळला आहे. मराठा समाजाने गावोगावी शांततेनं साखळी उपोषण करावं, असं आवाहन देखील जरांगेंनी केलं आहे.
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीसाठी शरद पवार गटाकडून राजेश टोपे तर ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत निर्णय होणार का? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.