
उद्या कोलंबोत पाऊस पडला तर भारताचे काय होईल?
कोलंबो येथे काल भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यातील आशिया कपचा (Asia Cup 2023) सामना उत्तम रंगत आणत होता. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असली तरी त्यांचा निर्णय चुकीचा ठरवत भारतीय संघाने जोरदार फलंदाजी केली. मात्र २४ व्या षटकातच पावसाने मोडता घातला आणि सामना थांबवावा लागला. हा सामना आज खेळवला जाणार आहे. मात्र पावसाची शक्यता कायम आहे. जर आज सामना पूर्ण होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात येणार आहे. पण यात भारताचा फायदा नसून पाकिस्तानला फायदा होणार आहे. शिवाय उद्या खेळवल्या जाणार्या भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या सामन्यातही पावसाची शक्यता वर्तवल्याने भारताचा सुपर ४ मधील प्रवेश कठीण होऊन बसला आहे.
पाकिस्तानने याआधी बांगलादेशचा पराभव केल्याने आजचा सामना झाला नाही तर पाकिस्तान संघाला एक गुण मिळून त्याचे एकूण ३ गुण होतील. याउलट भारताचा हा पहिलाच सामना असल्याने भारताकडे केवळ एकच गुण असेल. त्यामुळे सुपर ४ मध्ये जाण्यासाठी भारताला यापुढे होणार्या श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध सामन्यात काहीही करुन जिंकावेच लागेल. मात्र, उद्या होणार्या श्रीलंका सोबतच्या सामन्यातही मुसळधार ते अतिमुसळधार सामन्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे.
श्रीलंकाविरोधात सामन्यातही पावसाने हजेरी लावली अन् सामना झाला नाही तर दोन्ही संघांना एक एक गुण मिळेल. श्रीलंकेच्या संघाने देखील याआधी एक विजय मिळवला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत श्रीलंकेचेही गुण तीन होतील व भारताकडे दोन गुण होतील (पाकिस्तान विरुद्ध १ + श्रीलंका विरुद्ध १). त्यामुळे भारताला बांगलादेशविरोधात विजय अनिवार्य होतो. या सर्व पार्श्वभूमीवर पावसामुळे भारतीय संघाचे आशिया चषकातील आव्हान संपू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाचा काय अंदाज?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामनाही कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर होणार आहे. मंगळवारी दुपारी सामन्याला सुरुवात होईल. मंगळवारी कोलंबोत दिवसभर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोलंबोमध्ये मंगळवारी ६० टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवसाची सुरुवातच पावसाने होईल. दुपारनंतर पावसाची शक्यता आणखी जास्त आहे. संध्याकाळी ढगाळ वातावरण असल्याचे वर्तवण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता कोलंबोत ९४ टक्के पावसाची शक्यता आहे. तर दुपारी एक वाजता ८५ टक्के पाऊस कोसळेल अशी शक्यता आहे. संध्याकाळी ७ ते १० वाजेपर्यंत ७२ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.