उत्तर प्रदेशचे ढोलकी विक्रेते पेण मध्ये
हिंदूंचे सण खऱ्या अर्थाने श्रावण महिन्यात सुरू होत असतात. मात्र यावर्षी अधिक श्रावण आला आहे. या महिन्यात विविध प्रकारच्या सणांसह खऱ्या अर्थाने लगबग सुरू होते ती गणेशोत्सवाची. गणेशोत्सव हा कोकणातील अति महत्वाचा सण संबोधला जात असल्याने या सणाची तयारी आणि खरेदी ही काही दिवस आधीच गणेशभक्त करीत असतात. त्यामुळे व्यावसायिक देखील गणेशभक्तांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू आपल्या दुकानात आणून बाजारात विक्रीसाठी सज्ज झाले आहेत. त्यातीलच गणेशोत्सवात आरती, भजन, संगीत गाण्यांसाठी लागणारी ढोलकी ही एक महत्वाची बाब आहे. गणेशोत्सव मधील ढोलकीची मागणी लक्षात घेता पेण शहरात उत्तर प्रदेश मधील ढोलकी विक्रेते विक्री साठी दाखल झाले आहेत.
पेण तालुका हा गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध असल्याने शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात जवळपास 60 ते 70 टक्के नागरिकांचे गणपती कारखाने आहेत, आणि हे कारखाने ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणेच जवळपास 90 टक्के गणेशभक्तांच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होत असतो. त्यामुळे बाप्पाची पूजा अर्चा करताना ज्याप्रमाणे टाळ महत्वाचे असतात, त्याप्रमाणे आरती म्हणताना लागणारी ढोलकी आता पेणच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे.
गणेशोत्सव आठ दिवसांवर आला आहे. ढोलकी विक्रेते शहरामध्ये गल्लोगल्ली जाऊन आपल्या गणेशभक्तांसाठी ढोलकी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे आतापासूनच पेणमध्ये ठिकठिकाणी ढोलकीचा नाद घुमू लागला आहे. पेणमध्ये डेरेदाखल झालेल्या या ढोलक्या विक्रेते उत्तर प्रदेशहुन आणून येथे आपला व्यवसाय करत आहेत. साधारणपणे छोट्या ढोलक्यांपासून मोठ्या ढोलक्यांपर्यंत 250 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत या ढोलक्या विकल्या जात आहेत.