Wednesday, July 24, 2024
Homeसाप्ताहिककोलाजShortcut : शॉर्टकट...

Shortcut : शॉर्टकट…

  • संवाद : गुरुनाथ तेंडुलकर

शॉर्टकट हा बहुधा वेळ, पैसे, श्रम वाचवण्यासाठी वापरला जातो. पण बहुतेकदा हे शॉर्टकट अंगाशीच येतात. तरीही परिणामांची तमा न बाळगता माणसं आयुष्यात अनेकदा शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करतात.

अलीकडेच पेपरात एक बातमी वाचली. एका कॉलेजच्या प्राध्यापकाला पोलिसांनी पैशाचा गैरव्यवहार केल्याबद्दल अटक केली होती. एका कॉलेजमध्ये शिकवणारे हे प्राध्यापक महाशय म्हणे विद्यापीठात पेपर तपासण्याच्या कमिटीवर कार्यरत होते. तो माणूस विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रश्नपत्रिका द्यायचा.

“मी देतो त्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि पेपर लिहा असं सांगायचा. तुमचा युनिव्हर्सिटीचा सीट नंबर माझ्याजवळ द्या. काहीतरी खटपट करून मी तुला पास करून देतो.”

तो माणूस विद्यार्थ्यांकडून भरपूर पैसे घ्यायचा. जे विद्यार्थी पैसे देऊनही नापास व्हायचे त्यांचे पैसे तो “सॉरी, काम होऊ शकलं नाही. पुढच्या वेळेला बघूया.” अशी दिलगिरी व्यक्त करून घेतलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायचा. जे पास होतील त्यांचेच पैसे तो घ्यायचा. ही त्याची ‘चालूगिरी’ जवळजवळ दहा-बारा वर्षं बिनबोभाट सुरू होती.

आपल्या परीक्षा पद्धतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे जर एखाद्या मुलाने गेल्या पाच-सहा वर्षांचे पेपर डोळसपणे पाहिले तर दिसून येईल की, अनेक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात. त्या प्राध्यापक महाशयांनी नेमका हाच मुद्दा हेरला होता. गेल्या पाच-सहा वर्षांचे पेपर पाहून त्यातले नियमित विचारले जाणारे प्रश्नच ते ‘अपेक्षित’ म्हणून विद्यार्थ्यांना द्यायचे. त्यांची उत्तरं सांगायचे. विद्यार्थी त्याच प्रश्नांचा अभ्यास करायचे. परीक्षेला महिना, दोन महिने असताना थातूर-मातूर अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी काठावर का होईना पण पास व्हायचे. पास झालेल्या मुलांना वाटायचं की, सरांनी आपलं काम केलं. “आपण सरांमुळे पास झालो.” ही भावना मनात वागवतच ती मुलं सरांचे आभार मानायची आणि जी मुलं नापास व्हायची त्यांचे पैसे परत मिळाल्यानं ते स्वतःच्या नशिबाला दोष द्यायचे, त्याचबरोबर पैसे परत करणाऱ्या सरांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करायचे. पास झालेल्यांकडून आणि नापास झालेल्यांकडून दोघांकडूही कसलीच तक्रार येत नव्हती. अशा प्रकारे हे प्राध्यापक महाशय मात्र वर्षानुवर्षं हा बनवाबनवीचा धंदा करीत होते.

मला मात्र त्या प्राध्यापकाच्या कल्पकतेचं कौतुक वाटलं. त्यानं अलीकडच्या विद्यार्थीवर्गाची दुखरी नस बरोबर पकडली होती. वर्षभर अभ्यास न करता टाइमपास करायचा आणि परीक्षेचं टाइमटेबल जाहीर झालं की नंतर धापवळ करायची हा अलीकडच्या बहुतेक विद्यार्थी वर्गाचा स्वभाव त्या प्राध्यापकाला बरोबर कळला होता. फारसा अभ्यास न करता पास होण्याची इच्छा हा अलीकडच्या विद्यार्थी वर्गाचा स्थायीभाव झाला आहे. शिक्षणातून मिळणारं ज्ञान आणि त्याची उपयुक्तता वगैरे गेली तेल लावत… शॉर्टकटमध्ये अभ्यास करायचा आणि वर्ष वाचवायचं ही बहुसंख्य विद्यार्थीवर्गाची धारणा झालीय आणि विद्यार्थीच कशाला? सर्वसामान्य मोठ्या माणसांना देखील कमी श्रमात अधिक काहीतरी हवं असतं म्हणूनच तर असले शॉर्टकट शोधले जातात. अर्थात हे शॉर्टकट प्रत्येक वेळी वाईट असतात, असं मला अजिबात म्हणायचं नाही.

माणसाचे श्रम आणि वेळ वाचविण्यासाठी शास्त्रज्ञांनी अथक परिश्रम करून निरनिराळे शोध लावले. प्राचिन काळी लोक पायी चालत जात. नंतर पुढे चाकाचा शोध लागल्यानंतर गाडी निर्माण झाली. त्या गाड्यांत अनेकविध बदल करीत आधुनिक मोटारगाड्या, रेल्वेसारखी वाहाने निर्माण झाली. पण विज्ञानाने संशोधन करून शोधलेले उपाय वेगळे आणि कमीत कमी श्रमात जास्तीत-जास्त काम करून घेण्यासाठी लोक जे अनैतिक आणि बेकायदेशीर मार्ग अवलंबतात ते वेगळे. सर्वसामान्यांचे शॉर्टकट हे बहुतेकदा बेकायदेशीर आणि धोकादायक असतात. सरकारने प्रत्येक रेल्वेस्थानकावर पादचाऱ्यांसाठी पूल बांधूनही अनेक माणसं वेळ आणि श्रम वाचविण्यासाठी रेल्वेलाइन क्रॉस करतात. हा शॉर्टकट अनेकांच्या जीवावर बेततो. अनेक माणसं रेल्वे अपघातात मरतात. शॉर्टकट हा बहुधा वेळ, पैसे आणि श्रम वाचवण्यासाठी वापरला जातो. पण बहुतेक वेळा हे शॉर्टकट अंगाशीच येतात. तरीही परिणामांची तमा न बाळगता माणसं आयुष्यात अनेकदा शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करतात. पण बहुतेकदा हे मार्ग बेकायदेशीर आणि बेशिस्तीतूनच जातात. एकदा अशा प्रकारे कायदा मोडण्याची सवय लागली की पुढे त्याचं काही वाटेनासं होतं.

लाल सिग्नल दिसत असूनही माणसं खुशाल वाहनं हाकतात. नो एन्ट्री असलेल्या गल्लीत गाडी घुसवतात. असं केल्याने मिनीटभर वेळ वाचेलही कदाचित पण मिनीटभरचा वेळ वाचवण्याच्या नादात आपण स्वतःबरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालतोय याची जाणीवही अशा माणसांना होत नसते.

नोकरी-व्यवसाय करून पैसे मिळवणं हा राजमार्ग, पण अनेकदा हा मार्ग सोडून झटपट श्रीमंत होण्यासाठी माणसं नको तो मर्ग अनुसरतात. सट्टा जुगारापासून ते लाचलुचपतीपर्यंत सगळे मार्ग चोखाळतात. सुरुवातीला या मार्गाने पैसे मिळतातही. पण अशा अनैतिक पैशांचे दूरगामी परिणाम नेहमीच घातक ठरतात. एकदा सवय झाली की, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अशा प्रकारचे शॉर्टकट शोधले जातात. अलीकडे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे ओबेसिटी म्हणजेच स्थूलता या विकारांनी अनेकजण ग्रासलेले असतात. बऱ्याच स्त्री-पुरुषांचं वजन हे बेसुमार वाढतं. शरीर बेढब होतं. शरीरातला हा बदल कुणालाही नको असतो. पण त्यावर उपाय म्हणजे योग्य आणि नियमित व्यायाम तसंच व्यायामाच्या जोडीला चौरस आहार आणि जीभेवर नियंत्रण… पण नियमित व्यायाम करण्याचे कष्ट घेणं नको असतं आणि जीभेवर ताबा ठेवण्याचा संयम पाळता येत नाही. म्हणून तरुण-तरुणी स्टिरॉइडची इंजेक्शन घेतात. भूक कमी लागण्यासाठी गोळ्या घेतात. वजन कमी करण्यासाठी घातक औषधं घेतात. या उपायांनी तात्पुरता गुण आल्यासारखं भासलं तरी त्याचे शरीरावर होणारे परिणाम भयानक असतात.

म्हणूनच होता होईल तेवढं सरळ मार्गाने चालावं. आडवळणाचा रस्ता शोधण्याच्या प्रयत्नात उगाचच आयुष्य भरकटू देऊ नये. विशेषतः विद्यार्थी वर्गाने तर अभ्यासाच्या वेळी झटपट-शॉर्टकट टाळायलाच हवेत. गाईड आणि अपेक्षित प्रश्नसंच यांच्या वापराने परीक्षेत यश मिळालं तरी ते यश आयुष्यात उपयोगी पडत नाही. मार्क मिळाले तरी ज्ञान मिळत नाही. पेपरातल्या यशाला शॉर्टकट असले तरी अभ्यासाला शॉर्टकट नसतात, नसावेत.

आयुष्यात इतर बाबतीत आपण श्रम आणि वेळ वाचवण्यासाठी काही झटपट मार्ग शोधले तरी ज्याला खरोखरीच विद्या मिळवायची आहे, ज्ञानसंपादन करायचं आहे किंवा एखादी कला प्राप्त करून घ्यायची आहे, त्याला कठोर परिश्रमावाचून पर्यायच नसतो.

सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या जगद् विख्यात क्रिकेटपटूंचं उदाहरण घ्या किंवा लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरी आमोणकर अन् पंडित जसराज यांच्यासारख्या अलौकिक गायकांचं उदाहरण घ्या… उस्ताद झाकिर हुसेन, शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरासिया यांच्यासारख्या वादकांचं उदाहरण घ्या किंवा पंडित बिरजू महाराजांसारख्या नामवंत नर्तकाचं उदाहरणं घ्या. सर बर्नाड शॉ, ऍगाथा खिस्ती सारखे पाश्चात्त्य लेखक काय आणि पु. ल. देशपांडे, व. पू. काळेंपासून ते अलीकडच्या रत्नाकर मतकरी ते मंगला गोडबोलेंसारख्या साहित्यिक काय… आपापल्या क्षेत्रात पराकोटीच्या उंचीवर पोहोचलेली ही मंडळी. या सर्व यशस्वी मंडळींनी आयुष्यात एक निश्चित ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्या मार्गावर वाटचाल केली. मन लावून काम केलं. अतोनात मेहनत घेतली… कला, क्रीडा, साहित्य, अभिनय किंवा जीवनातल्या कोणत्याही क्षेत्रातली उत्तुंग व्यक्तिमत्त्व कधीही शॉर्टकट शोधत नाहीत. त्यांच्यासाठी ते करीत असलेली ज्ञानसाधना हे काम नसून एक आनंदयात्रा असते.

याच विषयासंबंधी एक बोधकथा अलीकडे माझ्या वाचनात आली. एक ब्राह्मणकुमार एका गुरूच्या आश्रमात विद्यार्जनासाठी गेला होता. महिनाभर उलटला. शिष्य बुद्धिमान होता. जिज्ञासू होता. गुरुजींकडून अधाशासारखं ज्ञान घेत होता. तऱ्हतर्हेचे प्रश्न विचारत होता. त्याचबरोबर गुरुजींची सेवादेखील भक्तिभावाने करीत होता.

एका गुरूच्या आश्रमात राहून विद्याभ्यास करणाऱ्या एका शिष्याचा भक्तिभाव पाहून गुरू सुखावले आणि त्याच्या हातात एक फळ देऊन म्हणाले, “हे ज्ञानफळ आहे. हे फळ खाल्लंस की तुला विश्वातलं सारं ज्ञान एका क्षणात प्राप्त होईल. तू माझ्याहून कित्तेक पटीने अधिक ज्ञानी होशील.” शिष्याने ते फळ स्वीकारलं. मस्तकी धारण केलं आणि पुन्हा ते फळ गुरुजींच्या चरणावर ठेवून नम्रपणे म्हणाला, “आचार्य, माफ करा. पण मला माझ्या अभ्यासातून आणि अनुभवातून ज्ञान संपादनसाधना करायची इच्छा आहे. केवळ एक फळ खाऊन त्वरित मिळणारं ज्ञान मला नको आहे. हे फळ देण्याऐवजी अखंड ज्ञानसाधना हा माझा श्वास व्हावा, असा आशीर्वाद तुम्ही मला द्या. माझी ज्ञानतृष्णा कधीही कमी होऊ नये असा मला आशीर्वाद द्या.” गुरुजी हसले. शिष्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता.

इंग्रजीत एक म्हण आहे, There is no elivator to success. You have to climb up the starecase. यशाच्या शिखरावर जाण्यासाठी लिफ्ट नसते. तिथं पायरी पायरीनंच वर चढावं लागतं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -