गणेशमूर्तिकारांच्या क्षेत्रात खातू या नावाभोवती वलय आहे. हे वलय पित्याचा वारसा अविरत चालवणाऱ्या तरुण तडफदार रेश्मा खातू यांनी टिकवून ठेवले आहे. त्यांचा पिंड हा फिल्म मेकिंगचा असतानाही त्यांच्यासाठी अगदी नवख्या असलेल्या क्षेत्रात रेश्मा यांनी दिग्गज मूर्तिकारांच्या प्रभावळीत ‘स्टुडिओ विजय आर. खातू’चे वेगळेपण विजय खातू यांच्या पश्चातही टिकवून ठेवले आहे. मूर्तिकार हे क्षेत्र आपल्यासाठी नवखे असले तरी ते वडिलोपार्जित असून त्यात रेश्मा यांचा जम बसल्याचे मूर्त्यांकडे पाहून जाणवते. भव्यदिव्य व तितक्याच विलोभनीय गणेशमूर्ती जेव्हा या स्टुडिओमधून बाहेर पडतात, तेव्हा डोळ्यांतून आनंदाश्रू तरळू लागतात. ती वेळ समाधानाची असल्याचे भावनिक उद्गार रेश्मा यांनी काढले. दै. ‘प्रहार’ने घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्या उत्स्फूर्त व्यक्त झाल्या.
जयाचें आठवितां ध्यान। वाटे परम समाधान।
नेत्रीं रिघोनियां मन। पांगुळें सर्वांगी।
सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की, आपलं मन आपसूकच वळू लागतं ते मुंबईच्या झगमगत्या गणेशोत्सवाकडे. लालबाग-परळ म्हणजे गणेशोत्सवाची पंढरी. थोर संतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राला शिल्पकलेचा पुरातन असा वारसा लाभला आहे. ही कला जोपासणारे अनेक कलाकार महाराष्ट्राच्या मातीने जन्माला घातले. ज्यांनी ही शिल्पकला मूर्तिरूपात जिवंत ठेवण्यात मोलाचे योगदान दिले, अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे ५२ वर्षांची कलासक्त कारकीर्द लाभलेले प्रसिद्ध गणेश मूर्तिकार विजय खातू. जगभरात विजय खातू यांच्या मूर्त्यांची एक खास अशी ओळख आहे. वडिलांच्या आकस्मित निधनानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी त्यांची कन्या रेश्मा खातू यांनी वडिलांच्या कर्तृत्वाच्या जाणिवेपोटी जाहिरात क्षेत्र सांभाळत ही जबाबदारी स्वीकारली. पहिली महिला मूर्तिकार म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या रेश्मा विजय खातू यांचा वडिलांचा हा वारसा अविरतपणे पुढे चालू ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजतागायत सुरू आहे. काही मंडळांच्या गणेशमूर्तींचे मुखकमल ही त्या मंडळाची एक स्वतंत्र अशी ओळख आहे आणि हीच खासियत टिकवून ठेवण्याचे कार्य रेश्मा खातू करीत आहेत. अनेक आव्हाने, टीकांना झेलून हितशत्रूंना न जुमानता पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात त्या जिद्दीने आपला ठसा उमटवत आहेत.
कुशल मूर्तिकार म्हणून घडणं तेवढं सोपं नसतं कारण या प्रवासात खूप साऱ्या गोष्टी नव्याने आत्मसात कराव्या लागतात. लोकांच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला मूर्त्या साकारायच्या असतात. “विजय खातू यांची मुलगी असल्याने लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसाधारण मूर्तिकारांपेक्षा प्रचंड वेगळा आहे. खातू या नावातच वलय आहे, त्यामुळे ‘खातू’ आडनाव असूनसुद्धा हा प्रवास माझ्यासाठी तितका सुलभ नव्हता; परंतु वडिलांनी दिलेले संस्कार आणि अनुभवांमुळे हा प्रवास नक्कीच समाधानवर्धक आहे. बाबांनी माणसं पारखण्याच्या बाबतीत दिलेले सल्ले प्रत्येक अनुभवात प्रकर्षाने जाणवत आले. माझे बाबा हे एका झाडाचं मूळ आहेत आणि त्यांनी घडविलेले मूर्तिकार म्हणजे या झाडाच्या अनेक पारंब्या आहेत. म्हणून हे मूळ मला टिकवायचंय.” वडिलांविषयी हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळतात.
मास्तर दीनानाथ वेलिंग यांच्याकडून चिंचपोकळीचा चिंतामणीचा वारसा वडिलांकडे आला. वडिलांचे गुरू असणाऱ्या मास्तरांच्या या मानाच्या मूर्तीला आपल्या घरचा बाप्पा म्हणूनच खातू कारखाना बघतो आणि त्या पद्धतीनेच साकारतो. मग्न्हॉटर्नला बाप्पाची होणारी परदेशवारी, जागेवरच बनवला जाणारा उपनगरचा राजा, ताडदेवचा राजा अशा मानाच्या गणपती घडवण्यामागे सगळ्यात मोठा वाटा असतो तो म्हणजे मंडळाचा. मंडळाच्या वातावरणनिर्मितीमुळे, त्यांच्या विश्वासामुळेच ती मूर्ती अतिशय सुबक आकार घेत असते.
आजोबा रामकृष्ण खातू यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी या व्यवसायाची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर विजय खातू आणि आता तिसरी पिढी हा डोलारा यशस्वीरीत्या सांभाळत आहे. २५ वर्षे सोबत कार्यरत असणारे खातू कुटुंबाचे निकटवर्तिय रणजित सोनी तसेच त्यांचे कारागीर यांचाही मोलाचा वाटा आहे. “आम्हाला या मूर्त्यांमध्ये विजय खातू दिसत आहेत” ही लोकांकडून येणारी कौतुकाची थाप म्हणजेच आमच्या कामाची पोहोचपावती आहे. “गणपतीचा कारखाना ही अशी गोष्ट आहे जिथे तुम्हाला कौटुंबिक जबाबदाऱ्यांना फारसं प्राधान्य देता येत नाही. त्यामुळे दोन्ही जबाबदाऱ्यांची सांगड घालताना माझ्या कुटुंबाने मला खूप साथ दिली”, असं सांगताना एक वेगळेच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. एक मूर्तिकार आणि सुजाण नागरिक म्हणून मूर्तीच्या उंचीबद्दल त्या प्रांजळपणे म्हणतात की, अर्थातच उंचीवर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत बंधन असायला हवे. कारण प्रवासाच्या दृष्टिकोनातून ते सोयीस्कर असते तसेच दुखापत होण्याची संभाव्यता नसते. सुबकता ही फक्त उंची या घटकामध्ये नसून, तर लहान आकाराच्या मूर्त्यांमध्ये ही ती साकारली जाते.
मूर्ती क्षेत्रात अजूनही मराठी माणसाचं वर्चस्व आहे, याबाबत आपले विचार मांडताना त्या म्हणतात, “कला हे असं क्षेत्र आहे की, या क्षेत्रात ना जाती-धर्माचे बंधन आहे ना स्त्रीपुरुष; परंतु एखादा समाज फक्त व्यवसाय म्हणून या क्षेत्राकडे बघत असेल, तर त्यांच्यासाठी हे क्षेत्र नाही. मराठी माणूस हा भावनिक असतो आणि अगदीच भक्ती केली, तर तीही मनापासूनच आणि मैत्री वा दुश्मनी केली, तर तीही मनापासूनच, त्यामुळे भावनेच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी हे क्षेत्र योग्य आहे, त्यामुळे इथे तोलमोल होत नाही.”
“गणपती आपले आराध्यदैवत आणि अख्ख्या जगताचं दैवत माझ्या अवतीभोवती असणे हे माझ्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे. गणपती ही बुद्धीची देवता तर आहेच. त्याचबरोबर अनेक तत्त्व या गणेशामध्ये समाविष्ट आहेत. ती तत्त्व प्रत्येकाने आपल्यामध्ये अंगीकारावी” अशी इच्छा त्या व्यक्त करतात. रेश्माताईंकडून अशाच सुबक आणि विलोभनीय मूर्त्यांची परंपरा ‘खातू पॅटर्न’मध्ये अविरतपणे जपली जाईल, यात शंकाच नाही.
ऐसा सर्वांगें सुंदरू। सकळ विद्यांचा आगरू।
त्यासी माझा नमस्कारू। साष्टांग भावें॥
अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या बाप्पाच्या आगमनाला अख्खी मुंबापुरी सज्ज झालेली आहे. ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत होणाऱ्या गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहवर्धक वातावरण दिसून येत आहे.
मुंबईची सांस्कृतिक ओळख म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव अवघ्या आठवड्याभरावर आला आहे. विविध रंगरूपातील, सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश देणाऱ्या गणेशमूर्त्या भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडून टाकतात. कधी एकदा बाप्पाचे रूप डोळ्यांत साठवून ठेवतोय, अशी भावना भाविकांची असते. मंडप परिसरातील लाइटिंगची आरास, सजावट यांसह विलोभनीय मूर्ती हा मुंबईच्या गणेशोत्सवाचा थाट आहे. मुंबईतील या सुबक गणेशमूर्त्यांचा परदेशांतही बोलबाला आहे. सध्या गणेशोत्सवाचा काऊंटडाऊन सुरू झाल्याने गणेश कारखान्यांमध्ये गणेशमूर्तींना शेवटचा हात मारण्याच्या कामांना वेग आला आहे. गणेशमूर्ती कारखाना म्हटला की, सर्वात आधी डोळ्यांसमोर येते, ते ‘विजय खातू’ यांचे नाव. नाव म्हणण्यापेक्षा हा ब्रँडच म्हटला तरी हरकत नाही. खातू घराण्याची तिसरी पिढी आज या क्षेत्रात आहे. सात वर्षांपूर्वी विजय खातू यांचे अकाली निधन झाले. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर बाबांच्या अचानक जाण्याने कारखाना सांभाळण्याची जबाबदारी रेश्मा खातू या त्यांच्या मुलीवर येऊन पडली. रेश्मा यांचे तोवर कारखान्यात क्वचितच येणे-जाणे होते. त्यामुळे या कामात त्या अननुभवी. पण खातू हा लोकांच्या मनात बसलेला ब्रँड, कोहिनूर हिरा असून त्याला टिकवून ठेवण्याचा मानस त्यांनी मनोमनी बाळगला. दिवस-रात्र मेहनत घेतली (त्या कायम कारखान्यात उपस्थित राहून कारागिरांकडून आपल्याला हवे तसे काम करून घेतात). विजय खातू यांनी जोडलेली मंडळे आजतागायत या कारखान्यातूनच साकारलेली बाप्पाची मूर्ती घेतात, हे त्याला आलेले यश म्हणावे लागेल. अॅनाटॉमी म्हणजे शरीरबद्धता, बॅलन्सिंग, रंगकाम, शेडिंग हे खातूंच्या गणेशमूर्तींचे वेगळेपण होय. काही मूर्त्या केवळ दिसायला सुंदर असतात. त्याउलट खातूंच्या मूर्त्या देखण्या तर असतातच, त्याबरोबर या मूर्त्यांमध्ये भारदस्तपणा असतो. अशा प्रकारचे काम आम्ही पूर्वापार देत आलो असून आजतागायत कायम असल्याचे रेश्मा सांगतात. मूर्तिकाम हे रेश्मा यांचे क्षेत्र नव्हे. त्या मूळच्या फिल्म मेकिंग क्षेत्रातल्या आहेत. पण “वडिलांच्या आकस्मित निधनानंतर जी रिकामी झालेली पोकळी आहे ती भरून काढण्याचा, कारखान्याचे नाव टिकवून ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. ते करणे माझे कर्तव्य असून हे काम मी मनापासून करते. गणेशोत्सवातील ३ महिन्यांनंतर फिल्म मेकिंगची कामे सुरूच असतात”, असे रेश्मा आवर्जून सांगतात.
विजय खातू हे नाव या व्यवसायातला कोहिनूर हिरा आहे. त्या बेंचमार्कला मॅच करायचे आजतागायत कोणत्याही मूर्तिकाराला जमलेले नाही; परंतु विजय खातू यांच्या हाताखाली काम करून अनेकांनी आपले कारखाने सुरू केले आहेत. त्यांच्या गणेशमूर्तींमध्ये विजय खातूंच्या कामांची छबी दिसेल; परंतु चावी आपल्याकडेच आहे. त्यामुळे गणेशमूर्तींचा चेहरा, काम करण्याची पद्धत किंवा ज्या प्रकारे आपण काम करून घेतो, जे विजय खातूंना अपेक्षित होते. ते आजही या कारखान्यात घडताना दिसत असल्याने मनाला समाधान मिळत असल्याचे रेश्मा सांगतात. अल्प अनुभव असला तरी मूर्त्यांबाबतची जाण रेश्मा यांना उपजतच आहे. यामुळे त्यांनी कमी कालावधीत या क्षेत्रात जम बसवला आहे. त्यांच्या बोलण्यातून मूर्त्यांबाबतची जाण उघड होते. हे लक्षण त्यांच्यातल्या प्रगल्भ मूर्तिकाराचे निदर्शक आहे. बाप्पाची उंची तितकीच असावी जी विलोभनीय वाटेल व भक्तिरस भाविकांच्या मनात उतरेल. तसाचा आपला प्रयत्न असल्याचे रेश्मा आवर्जून सांगतात.
केवळ मूर्ती घडविणे म्हणजे कारखाना चालवणे असे नाही. कारखाना चालविण्यासाठी माणसे जोडावी लागतात. त्यांना टिकवून ठेवावे लागते. विश्वासातली माणसे पकडून ठेवली की, आपल्याला हवे तसे काम करून घेता येते. शिवाय पुढच्या वर्षी त्या कामगाराने पुन्हा यायला हवे. कारण शेवटी मंडळांना आपले काम आवडायला हवे, असे सांगत कारागिरांबद्दल बोलताना रेश्मा पुढे म्हणाल्या की, कारखान्यातील कारागीर वर्ग हा उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेला आहे. हे कामगार अनेक वर्षांपासून येत आहेत. शेडिंग, लिखाई, क्रिएटिव्हिटी करणारे आर्टिस्ट मराठी आहेत. या सर्वांना सांधण्याचे काम करणे महत्त्वाचे असते. कारण हा कारागीर टिकून राहिला, तरच काम करणे सोपे जाईल. पुढे रेश्मा म्हणाल्या की, “मूर्तीचे डोळे बोलके हवेत, बाबा जेव्हा डोळ्यांची आखणी करायचे, तेव्हा त्यांची खासियत अशी होती की, ते कलरची मिक्सिंग योग्य करायचे. डोळ्यांची मजा ही कलर मिक्सिंगमध्ये आहे. त्यात बाबांचा हातखंडा होता. आमच्याकडे जे लिखाई कलाकार आहेत त्यांच्याकडून असे बोलके डोळे करून घेतले जातात. या कलाकारांना खातू पॅटर्नमध्ये बसवून, तसे काम करून घेण्याचा आपला प्रयत्न असतो.”
उपनगरचा राजा एकता सार्वजनिक उत्सव मंडळ बोरिवली, चिंचपोकळीचा चिंतामणी, ताडदेवचा राजा यांसह अनेक गणेशमूर्ती स्टुडिओ विजय आर. खातू कारखान्यात साकारल्या जातात. विजय खातू यांच्या आकस्मित निधनानंतर रेश्मा यांनी आजतागायत हा स्टुडिओ समर्थपणे सांभाळला आहे. गणेशमूर्ती क्षेत्रात त्या करत असलेले काम अनेकांसाठी प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…