Wednesday, July 17, 2024

Satsang : सत्संग

  • प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

सत्संग म्हणजे काय? तर सत् म्हणजे ईश्वर किंवा ब्रह्मतत्त्व आणि संग म्हणजे सहवास! सत्संग म्हणजे ईश्वराच्या किंवा ब्रह्मतत्त्वाच्या अनुभूतीच्या दृष्टीने अनुकूल असे वातावरण! सत्संग आपल्याला कीर्तन, प्रवचन, मंदिर, तीर्थक्षेत्र, संत किंवा गुरूंकडे जाणे अशा वेगवेगळ्या माध्यमांतून मिळू शकतो.

माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीने मला ‘सत्संग’साठी येण्याचा आग्रह केला. खूप पूर्वीपासून ‘सत्संग’ हा काय प्रकार आहे? याविषयी माझ्या मनामध्ये खूपच शंका होत्या. तिच्यासोबत मुद्दाम गेले, तेव्हा एक उच्चशिक्षित दीदी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत सकारात्मकता शिकवत होती. त्यासाठी अनेक उदाहरणे देत होती. त्यातील एक उदाहरण सहज आठवले म्हणून देते –

आपण आपल्या लहानग्या मुलाला शाळाप्रवेशापूर्वी काही गोष्टी शिकवतो. उदाहरणार्थ स्वतःचे पूर्ण नाव, आई-वडिलांचे नाव, पत्ता, शरीर अवयवांची ओळख, रंग-वस्तू ओळखणे, कमीत कमी एक ते दहा आकडे, थोडीशी अक्षर ओळख, एखाद-दुसरी कविता इत्यादी. कितीही वेळा विचारले तरी खणखणीतपणे ते मूल आपल्याला अचूक माहिती देते. आपण खूप आत्मविश्वासाने त्याला मुलाखतीसाठी घेऊन जातो. त्या शाळेच्या शिक्षिका अत्यंत गोड आवाजामध्ये आणि प्रेमाने त्या मुलाला काही प्रश्न विचारतात आणि ते मूल कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देत नाही. आपण अवाक होतो. दुःखी होतो. विचार करतो की असे कसे काय झाले? ‘मुलाखतीमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं दे, तुला चॉकलेट दिले जाईल’ वगैरे अमिषे दाखवलेली असतात, त्याचाही काही उपयोग होत नाही. हे सांगून त्या दीदीने सांगितले की, आपण शिक्षणाद्वारे किंवा अनेक इतर साधनांद्वारे खूप सारे ज्ञान मिळवतो. पण ते ज्ञान वापरण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा आपल्याला स्मृतिभ्रंश होतो किंवा आपण सुन्न होतो, तर सत्संग म्हणजे कोणतेही चांगले ज्ञान परत परत ऐकणे, जेणेकरून ते आपल्या डोक्यात पक्के होते आणि योग्य वेळी आपण ते वापरू शकतो!

दीदी सांगत असताना मला एक उदाहरण डोक्यात आले ते असे की, एखाद्या सिनेमाचे नवे गाणे सातत्याने कानावर पडते. कधी टीव्ही लावल्यावर गीतमालेमध्ये असेल, कोणत्या मोबाइलची कॉलरट्यून असेल वा जाता येता कोणत्यातरी लग्नाच्या हॉलमधून ते कानावर पडत असेल, तर ते आपल्याला पाठ होऊन जाते आणि आपल्याही नकळत आपण ते गुणगुणतो. माझ्या मनात हे जे काही आले ते मी दीदीला सांगितले नाही. पण कुठेतरी दीदीने सांगितलेले मनात खोलवर रुजले. थोडा शोध घेत गेले तेव्हा लक्षात आले – सत्संग म्हणजे काय? तर सत् म्हणजे ईश्वर किंवा ब्रह्मतत्त्व आणि संग म्हणजे सहवास! प्रत्यक्ष ईश्वराचा सहवास आपल्याला मिळणे अशक्य आहे; म्हणून संत ज्यांना ईश्वराचे सगुण रूप असे म्हणतात, त्यांचा सहवास हा सर्वश्रेष्ठ सत्संग असतो. त्यामुळे सत्संग आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांतून मिळू शकतो.

कीर्तन किंवा प्रवचनाला जाणे, देवळात जाणे, तीर्थक्षेत्री राहणे, संतलिखित आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करणे, इतर साधकांच्या सान्निध्यात येणे, संत वा गुरूंकडे जाणे ही सगळी सत्संगाचीच वेगळी माध्यमे आहेत, तर हे ज्ञान सनातन संस्थाद्वारे गुगल गुरूकडून मिळाले. हे वाचल्यावर मला एक प्रसंग आठवला. आमच्या शेजारी एक कुटुंब राहत होते. सासू-सून या दोघीही देवभक्त होत्या. सासू सकाळी ५ वाजता उठून देवळात जायची. एकदा तिला विचारले, तर म्हणाली की सत्संगाला जाते. संध्याकाळी ५ वाजता सून घराबाहेर पडायची. तिला विचारले, तर सांगायची की सत्संगाला जाते. दोघी आपआपल्या वेळेने सत्संगासाठी नियमित जायच्या. एकदा त्यांच्या घरातून खूप आरडाओरडा ऐकू आला म्हणून मी गेले, तर सुनेने सासूला हातातली चावी फेकून मारली होती. त्याने तिचे कपाळ फुटले होते. मोठ्या मुश्किलीने दोघींना शांत केले. त्यानंतर अनेकदा त्या दोघींची भांडणे सोडवण्याची वेळ माझ्यावरच यायची आणि का कुणास ठाऊक त्या दोघेही सत्संगाला जायच्या म्हणून ‘सत्संग’ या विषयी माझ्या मनामध्ये वेगळ्याच भावना जागृत झालेल्या होत्या, त्या काही प्रमाणात का होईना माझ्या डॉक्टर मैत्रिणीसोबत सत्संगाला गेल्यावर कमी झाल्या.

एकंदरीतच काय, आईने, एकाच प्रकारे वाढवलेल्या एकाच घरातल्या तीन बहिणी कशा वेगवेगळ्या स्वभावाच्या, विचाराच्या होतात त्याचप्रमाणे ‘सत्संग’ला जाऊनही प्रत्येक माणूस ‘साधक’ होऊ शकत नाही, तो वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीचा बनतो. साधनेद्वारे अध्यात्मिक उंची गाठणे असो वा कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती करणे असो जोपर्यंत नैपुण्य प्राप्त होत नाही तोपर्यंत साधना करणे, सातत्य टिकवून ठेवणे, प्रामाणिकपणे साध्याकडे प्रवास करणे महत्त्वाचे असते.

त्यामुळे ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ याप्रमाणे वर्षातून एकदा येणाऱ्या शिक्षक दिनाला ‘शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!’ यांत्रिकपणे देणे, चुकीचे आहे. या संदेशापेक्षा ज्यांचा सत्संग (चांगल्या माणसाचा सहवास) आपल्याला लाभला आहे त्या सर्व शिक्षकांची, आई-वडिलांची, मित्र-मैत्रिणींची आवर्जून आठवण काढून त्यांच्याकडून नेमके काय शिकलो (अर्थातच चांगले) हे आठवायचा प्रयत्न जरी केला तरी, अप्रत्यक्षपणे त्या-त्या व्यक्तींपर्यंत आपल्या शुभेच्छा पोहोचतीलच, असे मला वाटते!

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -